गावी एकू वसो असे : तो लींगावरीले फुलें प्रतदीनी खाए : तो एकू दीसू नीगतां सीरकला : तो सरला : ते देवतेसि पूजापूरस्कारू वर्जला : गोसावीयांसि गोमतीएचां तीरी आसन असे : भोपे आणि माहाजन गोसावीयांपासि आले : दंडवतें केली : श्रीचरणां लागले : मग वीनवीलें : “जी जी : वसो देवतेवरीलें फुलें प्रतदीनी खाए : आजि नीगतां सीरकला : तो सरला : देवतेसि पूजापूरस्कारू वर्जले जी :” मग गोसावी तेथ बीजें केलें : गोसावीं खडेन सीतीला’ : आणि उठीला : तो पौळीबाहीरि जाउनि पडीला : लोकांसि आश्चर्ये जालें : ॥
एक गावात एक वळू असतो. तो प्रतिदिनी शिवलिंगावरील फुले खात असे. एक दिवस निघत असतांना तो घसरला आणि मरण पावला. त्यामुळे देवतेची पूजा अर्चा बंद झाली. गोसावीं गोमातीच्या तीरी बसले होते. मंदिराचे भोपे आणि महाजन त्यांच्यापाशी येतात. त्यांना सर्व वृत्तांत कथन करतात. गोसावी त्यांच्यासोबत मंदिराकडे प्रयाण करतात. गोसावींनी त्याला एक खडा फेकून मारला. वळू उठला आणि बाहेर जाऊन निपचित पडला. लोकांना आश्चर्य वाटले.