shri chakradhar swami

१८ जुतक्रीडा

शेअर करा

गोसावीयांसि सारी जुं खेळावेयाची प्रवृति : मग गोसावी प्रतदीनीं जूआंठेयासि बीजें करीति : सारी जुं खेळावेयाचें वेसन स्वीकरीति : गोसावी प्रतदीनीं सारी जुं खेळति : जीतुकाही जीणा ए तीतुका दानासि देति : एकु दीं गोसावीं हारिची प्रवृति स्वीकरिली : बहुत जुं हारवीलें : मग पाउगीयें पायांवरि हात ठेउनि वीनवीलें : “जी जी : आंखू पाहिजो : मग पुढारें खेळिजो जी :” गोसावीं आंखू पाहिला : तवं बहुत हारविलें असे : ‘जी जी : देवा कीजो : मग पुढारें खेळिजो जी : जुइचें जुइं : भूइचें भूइं : आमचें देयावें : मग बीजें करावें :” मग गोसावीं हडपीयाजवळि होतें तें दीधलें : तवं न पुरे : तेव्हळि श्रीमुर्तीवहील अळंकारभूसणें दीधलीं : तन्हीं न पुरेचि : मग गोसावीं गुळुळा केला : वीडा घेतला : मग गोसावीं आवारासि बीजें केलें * : जुआरी दारवठावरि सरिसे आले : तेथ श्रीचरणांवरि माथा ठेवुनि मोचेयाचा पुडा धरिला : मग वीनवीलें : “ जी जी : गोसावी भीतरि बीजें करिती : आणि ते आमतें धरिती : मां गोसावीयांतें कवणें बोलवावें? गोसावीयांतें कवणें वीनवावें ? तरि आमचें देयावें : मग भीतरि बीजें करावें :” तेव्हळि गोसावीं म्हणीतलें : “हें तुमचें दीधलेयांवीन स्नान देपुजा करी : आरोगण करी तरी गोपाळनी आण :” येतुलेनि गोसावीं भीतरि बीजें केलें : तवं कमळा नावं राणी मंचकावरि बैसली होती : गोसावीयांतें बीजें करितां देखिलें : आणि झडकरि उठौनि उभी ठेलीं: गोसावीयांसि मांचेयावरि आसन जालें : मग कमळाआउसी म्हणीतलें : “हें काइ जी ? आझुनि गोसावियांसि गुळुळा नाहीं: वीडा नाहीं : आरोगणेसि उसीरू जाला : तो बडुवा के गेला ?” तवं सर्वज्ञ म्हणीतलें : “एथौनि जुं बहुत हारविलें: तेयांचें दीधलेयांवांचौनि आरोगण कीजे तरि गोपाळनी आण वाइली असे: तुमचीं अळंकारभूसणें असति तीएं आरूतीं घेउनि या : मां तेयांचें फेडिजैल :” तवं तेहीं म्हणीतलें : “आम्हीं आपुले अळंकार नेदूं : आम्हांसि बाबाचें कोपणें होइल : ” तवं सर्वज्ञे म्हणीतलें: “देया: मां एथौनि तुम्हांसि दूणा अळंकारभूसणें कीजैल : ” तवं तेहीं म्हणीतलें : “आम्ही आपुलें अळंकार नेदूं :” सर्वज्ञे म्हणीतलें : “तुमचे देइजति ना तरि गोपाळनी’ आणः” तवं तेहीं म्हणीतलें : ‘आम्हीं आपुले अळंकार देओं तरि आम्हांही गोपाळनी’ आण :

मग गोसावीं उदास्य स्वीकरिलें : गोसावीं उपरियेवरि बीजें केलें : माचेयावरि पहुडु स्वीकरिला : गोसावीयांचेया माता तेहीं मर्दनीया पाठविला : तो आला : वीनउं लागला : गोसावी पडदणी नेघति : मग उलंगीया पाठविला : तो वीनउं लागला : गोसावी वीनती न स्वीकरीति : तेयातें म्हणीतलें : “क्षुधा नसे:” मग आपण आली : तीएं उठउं लागली : परि गोसावी उपहुडु न स्वीकरीतिः मग कमळाआउसांतें पुसिलें : तीही म्हणीतलें : “आजि जुं खेळीनले : तेयांसि आपुला आवघा अळंकारू हारवीला : माझा अळंकारू मागत होते : तो मी नेदींचि : तरि रूसले असति : आणि काइ?”     

मग मात्र गोसावी उदास झाले. त्यांनी उपरियावर प्रस्थान केले आणि माचेयवर निजले. त्यावर गोसावींच्या आईंनी माणसे पाठवली. परंतु क्षुधा नाही असे सांगून गोसावींनी त्यांची विनंती नाकारली. मग स्वतः आई बोलवायला आल्या. त्यांनी गोसावींना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तू गोसावी उठेनात. मग आईंनी कमळाईसाला  विचारले तेव्हा त्यांनी सांगितले कि आज हे द्यूत  खेळले. त्यामध्ये त्यांनी आपले सगळे अलंकार गमावले. माझे देखील अलंकार मागत होते. तेव्हा मी त्यांना दिले नाही. त्यामुळेच रुसले असतील. आणखी काय?        उपरिय = माडी, वरचा मजला.   

रायाची वोळग वीसर्जली : मग केतुलेया येका वेळा राउळीहुनि प्रधानु आला : तेणें एतक्षेणी राणीएतें पुसिलें : “हरिपाळदेयासि आरोगण जाली?” ऐसें तो प्रतदीनी पुसे : तवं तेही म्हणीतलें : “ना : नाहीं जाली :” तवं तेही म्हणीतलें : “कांनाहीं जाली?” राणीयां तेयांपुढे अवघेचि मागील वृतांत सांघीतलें : प्रधाने आवघे वृतांत आइकिले : तैसाचि तो उपरीयेवरि आला :

मग काही एक वेळाने रावळाहून प्रधान परत आला. त्याने आल्या आल्या राणीला विचारले “हरपाल देवांनी भोजन केले?” सर्वज्ञांची अशी विचारपूस तो रोज करत असे. त्याही दिवशी केली. त्यावर राणीने त्यांना सर्व मागील वृत्तांत सांगितला. प्रधानाने सर्व वृत्तांत ऐकला आणि तसाच तो उपरीयेवर आला.     

“कां गा बा : आझुइंआरोगण नाहीं?” सर्वतें म्हणीतलें : “एथौनि जुं हारविले असे : तेयांतें म्हणीतले असे : ‘तुमचें दीधलेयांवीन आरोगण कीजे तरि गोपाळनी आन :'” मग तेणें म्हणीतलें :“तूमचें दीधलें : बा रे : हे आवघे तुझें नव्हे ? हे कोणालागि जोडिलें असे? हे राज्य कोणाचें? हे आवघे तुझें : नव्हे?” ऐसें म्हणौनि डावा हातु तळि घालुनि उपंगळीये घेउनि उठविलें : मग मांडीएवरि बैसौनि आवळिलें : पोटळिलें : स्रीमुख चुंबिलें : मग भांडारियाकरवि बाहीरवाहिरें तेथचि तेयांची पांचसें आसु फेडविलीया :       

प्रधान म्हणाला,  “का रे बाबा अजून जेवण केले नाही?” त्यावर सर्वज्ञ म्हणाले “आज मी द्यूतामध्ये हरलो. आणि ज्यांचे मी देणे लागतो त्यांना मी वचन दिले आहे की तुमचे देणे दिल्याशिवाय मी भोजन केले तर मला गोपाळाची आन.” मग प्रधान म्हणाले,  “तुझे सर्व कर्ज फेडले. हे अवघे तुझेच नाही का? हे सर्व कोणासाठी जोडले आहे आम्ही? असे म्हणून त्यांनी सर्वज्ञाना हात धरून उठवले मांडीवर बसवले.  गोंजारले, कपाळाचे अवघ्राण  केले आणि भांडाराच्या प्रमुखाकरवी बाहेरच्या बाहेर पाचशे आसू (तत्कालीन नाणे) देऊन सर्वज्ञ यांचे कर्ज फेडले.       

मग गोसावीयांचे उदास्य परीहरलें : तीये दीसी गोसावीयांसि मर्दने उसीरू लागला. मग गोसावीयांसि नसुधेन पाणीयें स्नान : देपुजा : आरोगण प्रधानाचां आवारी जाली : ते दीसी गोसावीयांची पांति प्रधानासि जाली : आणि अवघेयांसि पांती जेवण जालें : गोसावीयांसि आरोगण जाली : परि क्रमळाआउसांवरील उदास्य न परीहरेचि : ।।       

मग गोसावींचे औदासिन्य दूर झाले. त्यादिवशी गोसावींना मर्दन करण्यास उशीर झाला. गोसावींनी स्नान केले, देवपूजा केली. जेवण प्रधानाच्या महालातच झाले. त्यादिवशी गोसावी, प्रधान, सोबत  सगळेजण पंगतीत बसून जेवले. गोसावींचे जेवण तर झाले परंतु कमळा आऊसावरील नाराजी काही दूर झाली नाही.


शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: