तें निमीत्य करूनि गोसावीं उदास्य स्वीकरिलें : मग एककू दीसु गोसावी येककू पदार्थे वर्जीते जाले : गोसावीयांसि रामयाः बीजें करावेयाची प्रवृति : परि प्रधानु गोसावीयांतें न पठवी : मग येकू दीं मर्दनामादने वर्जीलें : एककू दी एककू पदायूँ वर्जीति : ऐसे अवघेचि पदार्थ वर्जीले : पुसति तरि गोसावी ऐसें म्हणति : “रामयात्रे जाउनि : मग आरोगुनि :” ऐसा गोसावी हळुहळु एकू दी अलणी : अतेली : मग गोसावी नसुधा अलणी ताकभातु आरोगण करीति : ऐसें गोसावी राणीएवरि उदास्य स्वीकरिलें :॥
अलणी = अळणी, मीठ नसलेले; अतेली = तेल नसलेले; नसुधा = नुसता; आरोगण = सेवन, जेवण
मग हे निमित्त करून गोसावींनी उदास्य स्वीकारले. त्यांनी एकेक दिवशी एकेक पदार्थ वर्ज्य करण्यास सुरुवात केली. गोसाविंना रामटेकास जाण्याची प्रवृत्ती (इच्छा) झाली. परंतु प्रधान (श्री चक्रधरांचे वडील) त्यांना पाठवत नसत. मग एक दिवस मर्दना मार्जन सोडले. असे करत करत सर्व पदार्थ वर्ज्य केले. कुणी याचे कारण विचारल्यास गोसावी सांगत की एकदा रामयात्रेहून जाऊन आलो की मग सेवन करिन. गोसावींनी हळूहळू अळणी अन्न खाण्यास सुरुवात केली. अळणी ताकभात ते सेवन करीत. असे त्यांनी राणीवरती औदास्य स्वीकारले.