shri chakradhar swami

२१ अवस्थास्वीकारू

मग गोसावी अवस्था स्वीकरिली : श्रीमूर्तीवरि उदास्य स्वीकरिलें : गोसावीयांची घणीं पीटिली ऐसी श्रीमूर्ति : गोसावीयांसि वाटे जावेयाची प्रवृति तरि वाटे बीजें करीति : वाटे बीजें करावेयाची प्रवृति नाही तेव्हळि अरण्यामध्ये बीजें करीति : गोसावीयांचे वस्त्र कांटीयेसि गूंपे : तें फाटौनि’ कांटीयांसींचि जाये : ऐसें अवघे वस्त्र फाटौनि कांटीयांसींचि लागे : मां उघडीयाचि श्रीमूर्ती बीजें करीति : गोसावीयांचां वाहेप्रदेसी कांटीयांचे ओरखंडे जाति : तेथ असुधाचे बींदु नीगति : ते श्रीमूर्तीवरि वाळति : जैसी कां माणिकें : मोतीयें : रत्ने खेवणिली असति : तैसी बाहुप्रदेसीं मीरवति : जैसी पन्हरेयावरि टीक ऐसी मीरवति : गोसावीयांचे केसकळाप झाडी गुपति : ते गोसावीयांसि सोडवावेयाचि प्रवृति नाहीं : तवं गोसावी तैसेंचि उभे असति : मां वारेन उकलति तेव्हळि गोसावी बीजें करीति : कां कव्हणि एकाधा एकु वाटे जातु असे तो देखे : तो उगवी तेव्हळि गोसावी बीजें करीति : ऐसीया उघडीया श्रीमूर्ती खडेयांगोटेयांवरि पहुडु स्वीकरीति : ऐसीयापरी गोसावीं पर्वतासि बीजें केलें : ।।

यानंतर श्री चक्रधर स्वामींनी (गोसावी) अवस्था स्वीकारली. औदासिन्य स्वीकारले. जर त्यांना वाटेने जावे असे वाटले तर वाटेने जात. नाही तर अरण्यामधून जात. त्यांचे वस्त्र काट्यांमध्ये अडकत असे. फाटून जात असे. असे सर्व वस्त्र फाटून गेले. गोसावी उघडेच फिरत. त्यांच्या अंगावर काट्यांनी ओरखडे निघत. त्यातून रुधिराचे थेंब निघे. ते शरीरावरच वाळत. या लाल रक्ताबिंदूंमुळे स्वामींचे शरीर माणिक मोत्यांनी जणू सजवले आहे असे भासे. त्यांचे केसदेखील झाडांत, काट्यात गुंतत असे. परंतु ते आपले केस सोडवत नसत. गोसावी तसेच निश्चेष्ट उभे राहत. जर वाऱ्याने त्यांचे केस सुटले तर ते पुढे निघत. किंवा रस्त्याने कुणी आला आणि त्याने जर हे केस सोडवले तरच गोसावी पुढे निघत. अशी ही उघडी श्रीमुर्ती दगड गोट्यांवरच विश्राम करत असे. नंतर त्यांनी पर्वतावर प्रयाण केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: