बोल्हा तो बारी : तो कंदांमुळां’ गेला होता : तेयांसि गोसावीयांचे दरीसन जालें : मग तो मुगुताबाइया बोळवीतु पाठवीला : तो बोळवीतु नीगाला : तेणें श्रीमूर्तिचे कांटे फेडिले : पोतुकें भीजवुनि श्रीमुर्तिचे असुध पुसिलें : मग सर्वज्ञ म्हणीतलें : “बोल्हेया : आतां तुम्हीं राहा ना : मुगुताबाइ अवसरि करील :” राहिले :आणि गोसावीयांपासौनि तेयां स्तीति जाली:॥
बोल्हा नावाचा छत्र धरणारा होता. तो कंदमुळं आणण्यासाठी गेला होता. त्याला श्री चक्रधर स्वामींचे दर्शन झाले. मग मुक्ताबाई तपस्विनी ने त्याला स्वामींची बोळवण करण्यासाठी पाठवला. तो स्वामींच्या सोबत निघाला. त्याने चक्रधर स्वामींच्या शरीरात रुतलेले काटे काढले. वस्त्र भिजवून श्रीमुर्तीच्या अंगावरील सुकलेले रक्तबिंदू साफ केले. मग सर्वज्ञ बोल्ह्यास म्हणाले की आता तुम्ही थांबा. मुक्ताबाई तुमची वाट पाहील. तेंव्हा बोल्हा थांबला. मग श्री चक्रधर स्वामी पासून त्यास स्थिती प्राप्त झाली.