shri chakrapani prabhu

२ सैहाद्री व्याघ्रवेखें दरीसन Shri Dattatrey Prabhu did shaktipat to Shri Changdev Raul (Gosavi)

‘गोसावीयांसि जीव उधरावयाची प्रवृति : मग फलेठानी कऱ्हाडेया ब्राह्मणाचां घरी अवतारू स्वीकरिला : तो गर्भिचा अवतारू : श्रीचांगदेओराउळ गोसावी हे नावं स्वीकरिलें : जनकनायेकु पीता : जनकाइसें माता : मग तेथ केतीएक दीस राज्य केलें : ग्रहस्तधर्म स्वीकरिले :

पुढील कथा श्री चक्रधर स्वामी सांगतात-     

श्री गोसावी यांना जीव उद्धार करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्यांनी मग फलटण नगरीमध्ये एका कराडे ब्राह्मणाच्या घरी अवतार घेतला. हा गर्भिचा अवतार होता. श्री चांगदेव राऊळ असे नाव ठेवण्यात आले. पित्याचे नाव जनक नायक तर मातेचे नाव जानकाई होते. मग असे कित्येक दिवस गेले नंतर त्यांनी गृहस्थ धर्म स्वीकारला म्हणजेच त्यांचा विवाह झाला. 

गोसावीयांसि सानेयाचि वेव्हाराची प्रवृति : मातापीता दोन्हीं अपरोक्ष जाली : मातेयापीतेयाचे श्राध आलें : ब्राह्मणा क्षेणु देउनि आले : मग वोटेयावरि भूमिसएन : वांगनेमू : ब्रह्मचरीयें एं तीन्हीं स्वीकरिली’ : श्राध केलें : अखवा लोकु जेवीला : मग गोसावीयांसि आरोगण जाली : पहुड जाला : गोसावीयांची राणी पुफवंती जाली होती : तीये ते दीसोंचि न्हाली : मग वीडा घेउनि आली : वीडा वोळगविला : आणि रति मागों आदरीली : गोसावी रति नेदीति : तेही आग्रहो थोरू घेतला: गोसावीं बहुत नीराकरिलें : परि तीयें नीराकरितीचि ना : मग तेही म्हणीतलें : “रति नेदा तरि प्राणिया एकु वाट पाहातु असे : तेयाचा प्रतिवावो घडेल :” मग सर्वजें म्हणीतलें : “हुं : आतां काइ?” ऐसें म्हणौनि रति दीधली : मग गोसावीं उदास्य स्वीकरिलें : तेयाचे पोटीं अनुचीत घेतलें :   

वांगनेमू = वाङ्नियम, वाचे वर नियंत्रण, मौन. 

प्रतिवावो = प्रत्यवाय, पाप, दोष.     

साने = थोडे.     

काही दिवसांनी माता पिता स्वर्गवासी झाले. त्यांचे श्राद्ध आले. त्यावेळी श्रीचांगदेव राऊळांनी भूमिशयन, मौन आणि ब्रह्मचर्य असे तीनही नियम स्वीकारले. श्राद्ध झाले. सगळ्या लोकांना जेऊ घातले. नंतर स्वतः गोसावी यांनी आरोगण केले. पहुड झाला. त्याच वेळी गोसावी यांची पत्नी ही पुष्पवंती झाली (न्हाती धुती झाली). ती विडा घेऊन आली. विडा खाऊ घातला. मग तिने रातिक्रीडेची इच्छा जाहीर केली. गोसावींनी नकार दिला. पण तिनेही खूप आग्रह करणे चालू ठेवले. गोसावींनी समजावून सांगण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ती समजून घेईना. मग तीही म्हणाली की रातिक्रीडा करत नाही परंतु जीव वाट बघतो आहे त्याचा प्रतिवाव (पाप) घडेल. मग सर्वज्ञ म्हणाले  “हूं. आता काय.” आणि मग त्यांनी तिची रतीची इच्छा पूर्ण केली. परंतु या प्रसंगानंतर त्यांनी उदास्य स्वीकारले.   

मग केतुलयां एकां दीसां कार्तीक मासा मातापुरा पव्हा नीगाला : मग गोसावीं तेण्हेंचि नीमीत्ये पव्हेयासरिसें बीजें केलें: पेणोवेणा पव्हा मातापूर पावला : आवघां लोकी पेणीसि मात्रास्नाने केली : तेहीं पेणीसि मात्रास्नान केलें : आवघा’ लोकु घाटावरि नीगाला : तेही घाटावरि नीगाले : मेरूवाळां स्नान जालें : आवघेनि लोकें सर्वतीर्थी स्नाने केली : तेही सर्वतीर्थी स्नान केलें : आवघा लोकु पर्वतावरि नीगाला : तेही पर्वतावरि नीगाले : गोसावी उवासंगें धोत्र : खांदी मात्रा : मोकळे केसकळाप दोहो भागी : स्याम श्रीमुर्ति : देवगीरीवरि बीजें करिताति : ऐसें जात असति तवं पर्वताचां अधोपरी वेळुवाचीये” जाळीआंतुनि हाक देउनि वाघु नीगाला : जाळीआंतुनि श्रीदत्तात्रयप्रभू व्याघ्रवेखू धरूनि बीजें केलें: पुढां उभे ठाकले : हाक देउनि चपेट उचलुनि श्रीमुगुटावरि चवडा ठेविला : श्रीमुखा श्रीमुख लाविलें : तेथ प्रकासु पडिला” : तेथौनि पर आणि अवर एं दोन्हीं स्वीकरिली: पर आछादिलें : अवर प्रकटियें केलें : ‘वाघु वाघु’ म्हणौनि मागीलु लोकू मागां पळाला पुढील लोकू पूढां पळाला५: मग श्रीदत्तात्रयप्रभू अद्रीस्य जाले :       

पव्हा = यात्रेकरूंचा समूह.       

कार्तिक महिन्यातल्या कोणे एके दिवशी मातापुरास (माहुरास) पव्हा निघाला. मग गोसावींनी त्याचे निमित्त करून त्या पव्ह्या सोबत प्रयाण केले. पव्हा मातापुरास पोहोचला. तिथे सर्व लोकांनी पेणे मध्ये मात्रास्नान केले, नंतर ते घाटावर निघाले, सर्व तीर्थांवर स्नान केले. सगळे लोक पर्वतावर निघाले. गोसाविदेखील पर्वतावर निघाले. मोकळे केस, मधोमध भांग, श्याम श्रीमुर्ती, अशा वेशात ते देवगिरी वर प्रयाण करतात. त्याचवेळी वेळूच्या जाळीतून गर्जना करत वाघ बाहेर पडतो. श्री दत्तात्रय प्रभू वाघाचा वेष धारण करून येतात. पुढे येऊन उभे ठाकतात. हाक देऊन आपला चवडा उचलून श्रीमुकुटावर म्हणजे चांगदेव राऊळांच्या डोक्यावर ठेवतात. श्रीमुखासी श्रीमुख लावले. तेथे प्रकाश पडला. व्याघ्ररूपी श्री दत्तात्रयांकडून पर आणि अवर हे दोन्ही स्वीकारले. पर अच्छादिले म्हणजे झाकून ठेवले. आणि अवर प्रकट केले. वाघ! वाघ! असे म्हणत मागचे लोक मागे पळाले, पुढचे लोक पुढे पळाले. मग श्री दत्तात्रय प्रभू अदृश्य झाले.         

मग गोसावी नगराआंतु बीजें करीति : पुडी करीति : देवदेवेस्वरी पहुडु स्वौकरीति : ऐसें केतुले एक दीस श्रीचांगदेओराउळी मातापुरीं राज्य केलें: मग वैसाखीयेसि द्वारावतीये पव्हा नीगाला : तेया लोकासरिसे” श्रीचांगदेओराउळीं द्वारावतीएसि बीजें केलें : मग द्वारावतीये” अवस्थान जालें :     

मग पुढे गोसावी नगरामध्ये प्रयाण करतात. मातापुरास (माहूरला) ते कित्येक दिवस राहतात. मग वैशाखामध्ये कोणे एके दिवशी पव्हा द्वारावतीस निघाला. त्या लोकांसोबत श्री चांगदेव राऊळ द्वारावतीला प्रयाण करतात. मग ते तिथे राहतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: