३० ओरंगली मालपुजा स्वीकारू

शेअर करा

एकु दीस आउसें जोगवटा घालुनि बैसली होती : सर्वज्ञ म्हणीतलें : “नाएका : येथही एकु जोगवटा होता :” आउसी म्हणीतलें : “तो कैसा जी स्वामी जगन्नाथा ?” सर्वज्ञ म्हणीतलें : “हे ओरंगला गेले होतें : ओरंगली सदर्थ मालु एकु : तेयाखालि पांचसें मालां : तेयातें पुत्रु नाहीं : तेयांसि सैंबनाथाची भगति : अव्हा चौरस तीनि गावें ओरंगल : माझि सैंभनाथाचे देउळ : तो दांडीए बैसला सैंभनाथासि जातु होता : हे मार्गे ऐसें जात होतें : तेणें यातें देखिलें : आणि दांडीए खालुता उतरला : दंडवत घातलें : श्रीचरणां लागला :” मग गोसावीयांतें म्हणीतलें : “माझा सैंभनाथु एथचि भेटला :” ऐसें म्हणौनि यातें वीनवीलें : “जी जी : गोसावी माझेया आवारासि बीजें करावें जी :” गोसावीयांसि प्रवृति : गोसावीं वीनवणी स्वीकरिली : आपण पुढां पाई चालतु : मागां गोसावीयांतें दांडीए बैसोनि आपुलेया आवारासि आणिलें : तेणें गोसावीयांसि आसन घातलें : गोसावी आसनी उपवीष्ट जाले : श्रीचरणक्षाळण जालें : सर्वज्ञ म्हणीतलें : “मग यासि ओलणी दीधली:” मग आणीकु मालु मर्दना देयावेया आले : तवं तेणें तेयांतें म्हणीतलें : “सरा रे : तुम्ही एथ के रीगाल? एसणी आटि काइ तुम्हांकारणे काढिली असे ? गोसावीयांसि मर्दना मीचि देइन :” मग आपण मर्दना दीधली : जेतुलीं मालवीयेची अंगें तेतुली गोसावीयांचां ठाइं ओळगविली : गोसावी तीएतीए कळेसि रूप करीति जाति : मग मादणें जालें : पुजाअवस्वरू जाला : धुपार्ती मंगळार्ती जाली : सैंबनाथाची भगति ते गोसावीयांचां ठाइं अपीली : आरोगण जाली : गुळुळा जाला : वीडा ओळगविला : मग दंडवत घालुनि यातें वीनवीलें : “जी जी : मज संपति असे : परि संतति नाहीं जी :” सर्वज्ञ म्हणीतलें : “होइल हो :” मग तेणें पोटींचि ऐसें म्हणीतलें : “जरि मज पुत्रु होइल तरि मी गोसावीयांचां ठाइं पांचां सहस्रां सोनेयांची पुजा करीन :” ऐसें म्हणीतलें : गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : गोसावी एथ असती तवं गोसावीं एथचि आरोगण करावी जी : आणि देव्हारचौकीयेसि पहुडु करावा जी : माझी राणी गोसावीयांची सेवा करील जी :” गोसावीं मानिलें : देव्हारचौकीयेसि अवस्थान जालें : तेयाची राणी गोसावीयांची सेवा करी : गोसावी वीहरणौनि बीजें करीति : मां तीएं आसन रचीति : गोसावीयांसि आरोगण : गुळुळा : वीडा : पहुडू होए : चरणसह्वान करूनि मग तीएं जेवीति : उचीष्ट प्रसादु : चरणोदक : ऐसें प्रत्यहीं करीति : मग तेयांसि तेणेंचि दीसें : मासें : वडिली राणीसि गर्भसंभूति जाली : त्याउपरि दोघांहीं गोसावीयांची अधीक श्रद्धा जाली : गोसावीयांसि आधी आरोगण जालेयांवीन तयाची स्त्री जेवि ना : मग गोसावीही उसीरू न लविती : मां गोसावीं बीजें करूं आदरिलें : तेव्हळि तेणें वीनवीलें : “जी जी : आपचार्ये होइल : मग गोसावीं बीजें करावें :” “हो कां :” म्हणौनि मानिलें : मग वीहरणौनि सकाळीचि बीजें करीति : गोसावीयांसि आरोगण होए : मग तीएं जेविति : ऐसें अपचारीएं जालें : मग गोसावीं बीजें करूं आदरिलें : मग तेणें वीनवीलें: ‘ना जी : आठांगुळे होइल : मग गोसावीं बीजें करावें :” तेंहीं गोसावीं मानिलें : ऐसां आठांगुळे जालें : मां गोसावीं बीजें करूं आदरिलें : “ना जी बारसें होइल : मग गोसावीं बीजें करावें जी :” तेंहीं गोसावीं मानिलें : ऐसां प्रसुति जाली : पुत्रु जाला : बारसें जालें : मग गोसावीं बीजें करूं आदरिलें : तेणें म्हणीतलें : “ना जी : गोसावीं उष्टवनवरि राहावें : उष्टवन होइल : मग गोसावीं बीजें करावें जी :” तेंहीं गोसावीं मानिलें : ऐसां उष्टवन जालें : मग गोसावीं बीजें करूं आदरिलें : “जी जी : गोसावीं चोळेवरि राहावें जी :” तेंहीं गोसावीं मानिलें : ऐसां चोळें जालें : ऐसें पन्हरा मास तेथ गोसावीयांसि अवस्थान जालें : मग गोसावीं बीजें करूं आदरिलें : तेह्वळि तेणें वीनवीलें : “ना जी : मीयां गोसावीयांसि पांचा सहस्रां सोनेयांची पुजा करावी : ऐसा मनोधैं केला जी : तरि मी गोसावीयांसि पुजा करीन : मग गोसावीं बीजें करावें जी :  मग तेणें वीचारिलें : “गोसावीयांसि काही लागे ना : गोसावी दाम काइ करिती ? माहात्मे : तरि गोसावीयांकारणे जोगवटा करूं११ :” म्हणौनि पाटाउवांचा जोगवटा केला : तेयांसि ठीक : माणीकें : मोतीएं : रत्ने : पांचां सहस्रांची खीवणीली : मग यासि मर्दना : मादने : पुजा : केली : वस्त्रे ओळगविली : आणि तो जोगवटा ओळगविला : दंडवत घातलें : श्रीचरणां लागले : मग आरोगण : गुळुळा : वीडा ओळगविला३ : मग हे तेथौनि नीगालें : आउसी म्हणीतलें : “मग तो जोगवटा काइ केला : स्वामी जगनाथा?” सर्वतें म्हणीतलें : “वाटे एकु ब्राम्हणु भेटला : तो दीधला तेया ब्राम्हणासि :” “हें काइ जी स्वामी जगनाथा : एसना जोगवटा कैसा ब्राम्हणासि देवविला जी?” सर्वज्ञ म्हणीतलें : “नाएका : तुम्ही असतीति तरि तुम्हां देइजता.” ॥


शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: