मां ऐसांही जे हेड उरे ते गावीचे वेव्हारे घेति : ऐसां एक वेव्हारे घोडे घेयावेया आले : तेहीं गोसावीयांतें देखिले : गोसावीयांचे सौंदर्य : लावण्य : बरवेपण : चातुर्यता : कुसळता : हातासन देखौनि तोखले :आणि गोसावीयांसि दंडवत घातलें : मां गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : मातें कन्यारत्न एक असे जी : मी तीयाकारणें पाइं कापडे बांधौनि बहुत दीस हीडीनलां जी : परि तीएजोगा वरू’ कव्हणी ठाइं नाहीं जी : गोसावी होति : तरि तें माझें कन्यारत्न स्वीकरावें जी : आपुली दासि करावी जी”: सर्वतें म्हणीतलें : “यांसि जातिकुळ नाही :” तीही म्हणीतलें : “गोसावी इस्वरू : गोसावीयांचां ठाई काइ जातिकुळ पाहावे लागत असे? इस्वरासि काइ जातिकुळ असे? गोसावीचि जाति आणि गोसावीचि कुळ : गोसावी अकुळनाथाचा नाथ कीं :” सर्वज्ञ म्हणीतलें : “तरि एथ खूटुदावें नाहीं :” तीही म्हणीतलें : “तेंही गोसावीचि : जी जी : गोसावीचि खूटु आणि गोसावीचि दावें :” सर्वतें म्हणीतलें : “तरि यांसि करावेया काहींचि वीत नाहीं : ” तीही म्हणीतलें : “दोहींकडुनि व-हाड आम्हींचि करूनि :” तवं अवघे हेडाउ उभे ठेले : तीही म्हणीतलें : “जी जी : इतुलें धनवीत आमते असे : आमचें तें गोसावीयांचे नव्हे? तें अवघे आम्ही करूनि जी : गोसावी वीव्हावो अंगिकरूतु : मा द्रव्य लागेल तें आम्ही वेचुनि :” मग गोसावीं मानिलें : सर्वशैं म्हणीतलें : “नाएको : एथ सकळे असे हो : एथ एक यासि जातिकुळ असे हो : हे लाड सामक : ऐसी साखा सांघीतली : तरि प्रमाण जालें : सर्वज्ञ म्हणीतलें : “एथ सकळे असे हो : नाएको : पाहाति तवं बरवें घटीत असे : मग तेणें वेव्हारेन वीनवीलें : “जी जी : मातें गोत्रिजें : बहुत कुटुंब असे : अस्त्रीया माणुसें : एथ एओं नैए : तरि ते कुटुंबे वरू देखावा : तरि गोसावीं तेयांसि दरीसन देयावें जी :” गोसावीं वीनती स्वीकरिली : मग गोसावीयांतें ” “हेडाउवीं श्रींघारीलें : मग गोसावी हेडाउवांसहीत दांडीए बैसोनि तेथ बीजें केलें : तीएं अवघींचि पाहावेया आली : तीही अवघांचि गोसावीयांतें देखौनि म्हणीतलें : “हे गोसावीयांचेया तळवेयासारिखी नव्हे : हे सदैवं हो : या आपुलें दैवं काढुनि घेतलें :” एकवंद ऐसें जालें : जे हा वरू होए : वीह्वावो प्रव्रतला : सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : वेद्वारेयाची वासना ऐसी में एथिचा कडु तो आम्हींचि करूनि : आणि हेडाउ ऐसें म्हणति : जें गोसांवियांचा कडु तो आम्ही करूनि :” हेडाउवीं गोसावीयांचीए राणीएकारणे अळंकारभूसणे केली : साडेसांखळीया आवचि केलें : मग वेह्वारेनि आपुला कडु केला : आणि गोसावीयांचा कडु तो हेडाउवीं केला : मग गोसावीं वीह्वावो स्वीकरिला : गोधुळीचे लग्न जालें : च्या ही दी वीह्वावो जाला : साडेसांखळीया मुक्षकरूनि अवघे वाइलें : जैसा द्वापरी भीमकें जो सोहळा केला तैसाचि एथही जाला : मग हेडाउवीं गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : दांडी करूं : मग गोसांवी आणि गोसावीयांची राणी ऐसें गोसावी आमचेया देसासि बीजें करावें जी :” वेद्वारेयाची वासना ऐसी : जें गोसावीं एथचि राहावें : तवं गोसावीयांसि तेउतें बीजें करायाची प्रवृति नाही : सर्वतें म्हणीतलें : “आतां हे एथ राहील : तेउतें नए :” मग हेडाउवीं गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : आम्हांसि बहुत दीस लागले : आमची कुटुंबे वाट पाहातें असती : तरि आम्ही आपुलेया देसासि जाओं जी?” सर्वतें म्हणीतलें : “जा : हे एथ असैल :” मग गोसावीं तेयांसि अनोज्ञा दीधली : मग ते आपुलेया देसासि नीगाले : गोसावीयांसि उपरीएवरि अवस्थान जालें११ : मग ते वेद्वारे भलेतेंहीं गोसावीयांतें पुसपुसों करीति : काहीं बाहीरिलाकडुनि वस्तु ए : मां ते वेद्वारे जे वस्तु घेति ते गोसावीयांतें पुसति : मग गोसावी घेया म्हणति तरि घेति : गोसावी नको म्हणति तरि नेघति : मा गोसावी घेया म्हणति तीए वस्तुपाठी थोरू लाभू होए : तो लाभू देखे : गोसावी नको म्हणति ते वस्तु आणीक घेति : तीए वस्तुपाठी तेयांसि हानि ए : ते हानि देखे : ऐसें भलतें गोसावीयांतें पुसपुसों करीति : ऐसें तेया वेह्वारेयासि बहुत द्रव्य जालें :॥ ऐसां असतां एक दीसु२ गोसावी : आणि गोसावीयांची राणी उपरीएवरि बैसौनि दोघे सारी खेळत असति१२ : तवं अवधूतु एकु : माहात्मा अन्यमार्गी : संसारेसी पाठिमोरा जाला ऐसा३ : मार्गे जात देखिला : आणि सर्वज्ञ म्हणीतलें : “आतां एथौनि ऐसेयां होइजैल :” म्हणौनि तेयांकडे ऐसा श्रीकरू करूनि दाविलें : ” जी जी : गोसावी कैसे ऐसें होती ? ” ऐसें आइकौनि मुर्छा एउनि” दडकरि पडली : “हे काइ : हे काइ : “म्हणौनि पडतपडतां गोसावीं वरिचांवरि धरिली१६ : मग फुटेयाचेनि पदरें वारा घालुनि साउपी केली : आंगेसी धरूनि झाडिलीं : सागळेचेनि उदकें नेत्र पुसिले : मग म्हणीतलें : “हे काइ : एथौनि ऐसेयां काइ होइजैल ? तुमतें सांडोनि के जाइजैल हे तुमतें चाळवीताएं” की :” मग गोसांवीं बीजें केलें तेह्वळि तेयांसि सरूपदरीसन वीद्या संक्रमीली : मग गोसावीं तेथौनि बीजें केलें१९ : ।।