shri chakradhar swami

४७ ‘भांडारेकारां स्तुति करावेया आनोज्ञा

भांडारेकारांची स्तुति गोसावीं सांघीतली : भटांचीए स्तुतीवरि : सर्वज्ञ म्हणीतलें : का गा : काहीं आपुलें कीं एथिचें?” भटी म्हणीतलें : “जी जी : गोसावीयांचें की : सर्वज्ञ म्हणीतलें : “एथिचेंचि एथ काइ बोलावें असे? स्तुति ऐसी भांडारेकारचि करूं जाणति :” भटी म्हणीतलें : “तें कैसें जी ?”

” सर्वतें म्हणीतलें : “हे भांडारांहुनि नीगाले : भांडारेकार भीक्षा करीति : यांसि आरोगण देति : मग आपण उचीष्ट प्रसादु घेति : स्रष्ट ठाओ तो पहुडावेया यांसि : एथची सेवा करीति : हें नीदवीजे : मग आपण एकाधी एकी कोणटां : कां देउळाबाहीरि एकाधीए देउळी : तेथ नीद्रा करीति :” ऐसें भांडारेकारांसि सोळा वरीखें सन्यधान : गोसावी मार्गे बीजें करीति : एकी’ गावी गोसावीयांसि वस्ति जाली : भांडारेकार गोसावीयांकारणे सयनासन रचुं गेले : तवं भांडारेकारातें वींगुळी खादले : ते थोर दूख व्येथा हों लागली : मग गोसावीयांतें वीनवीलें : “जी जी : मातें वींगुळी खादले : तें मज थोरि दुख वेथा होताए जी : तरि मी गोसावीयांची स्तुति करूं?” सर्वज्ञ म्हणीतलें : करा :” मां एथिची स्तुति करूं लागले : मां जवंजवं स्तुति करीति तवंतवं दुखाची वेथा उणी’ होए : ऐसी वींगुळि उतरली : दंडवतें घातली : श्रीचरणां लागले : मग गोसावीं उदीयांचि तेथौनि बीजें केलें :॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: