५ कऱ्हे कुचकी आसन

कव्हणी एकू ब्राम्हणू द्वारावतीएसि नीगाला : तवं काबा वाट घेतली : आवघे गेलें: बैलू गेलाः बाइला भवरी तोंडी घातली होती:तेवांचलीः द्वारावतीये सहश्रभोजन करीन म्हणौनि नीगाला होता : द्वारावती पावला : सप्ततीर्थीया केलिया : एरी दीसी ब्राम्हणां नीमंत्रण दिधलें : इतुलेनि तो म्हणों लागला : “वेचू नाहीं : वेचैवीन काइ करूं?” मग ब्राम्हणीं भवरि दाखवीली : “वेचेंवीन गडबडु नको :” तवं तेणें म्हणीतलें : “हे कैची?” ‘ना हे मीयां तोंडी घातली होती : तरि वांचली :” “हो कां : तुं अन नीफजवि : मी गोसावीयांसि नीमंत्रण देईन :” तेया पुसीलें : “गोसावी कवण?” “मां श्रीचांगदेओराउळासि: ‘ना ते कोण? ‘ना ते कन्हेयाचीये करवडीमध्ये बसले होते ते :” “मां तेया कैसी अक्षेत द्याल?” “ना ते पूरूख आहाति :” इतुकेन तो गेला : गोसावीयासि नीमंत्रण दीधलें : तीया अन नीफजवीलें : तेणें संध्यास्नान केलें : तवं गोसावीं बीजें केलें : तवं तेणें म्हणीतलें : “आधीं गोसावीयांसि आरोगणा देओं : मग एरांसि देओं :”

कुणी एक ब्राम्हण द्वारकेस निघाला. रस्त्यात लुटारूंनी त्याचे सर्व काही लुटले. त्याच्या पत्नी ने तोंडात भवरी लपवली. तेवढी वाचली. द्वारकेला जाऊन सहस्त्र भोजन घालीन असा संकल्प करून तो निघाला होता. तो द्वारावतीस पोचला. सप्ततीर्थ केले. मग तो विचार करू लागला. जवळ द्रव्य नाही. सहस्त्रभोजन कसे घालावे? ब्राह्मणीने भवरी दाखवली. म्हणाली, द्रव्यावाचून गडबडू नकोस. तेंव्हा तो म्हणाला, हे कसे वाचले? ती म्हणाली, मी तोंडात लपवली होती. म्हणून वाचली. तो म्हणाला हो का! तू अन्न शिजव. मी गोसावींना निमंत्रण देऊन येतो. ती म्हणाली, गोसावी कोण? श्री चांगदेव राऊळ चांगदेव राऊळ कोणते ते जे कन्हैया च्या समूहामध्ये बसलेले होते. ब्राह्मणी म्हणाली त्यांना अक्षेत कसे द्याल? ब्राम्हण म्हणाला की ते सिद्ध पुरुष आहेत. इतके बोलून तो गेला. गोसावींना निमंत्रण दिले. तिनेही अन्न बनवले. ब्राम्हणाने स्नान संध्या केली. तेव्हा श्री चांगदेव राऊळ तिथे आले. त्याने पत्नीस म्हटले. आधी चांगदेव राऊळांना जेऊ घालू.  मग इतरांना.   

गोसावीयांसि आसन रचीलें : गोसावी आसनीं उपवीष्ट जाले : श्रीचरणक्षाळण केलें : टीळा जाला : पातळी वाढीलें : मग आरोगणा करूं लागले : अस्त्रीया म्हणीतलें : “जी जी : वाढू ?” गोसावी उगेचि : “आंणि आंणि :” म्हणौनि वाढीति : ऐसें पांचांसेयांचें अन गोसावी जेवीले : तवं तीयां पोटीं भावीलें : “इतुकें अन एहींचि खादले :” म्हणौनि : आणि गोसावीं श्रीकरु आखूडिला’ : गोसावीयांसि गुळुळा जाला : वीडा जाला : आणि गोसावीं बीजें केलें : सर्वज्ञ म्हणीतलें : “मग तीया पातळी काढीलीया : तवं पांचसें पातळी नीगालीया : मग तेणें ब्राह्मणे म्हणीतलें : “मर मर पापीणी : ऐसें काइ केलें ? सहश्रा ब्राम्हणाचें अन एथचि देतो तरि यांचांचि ठाइं सहश्र ब्राम्हणां पूरतें :॥

गोसावी साठी आसन मांडण्यात आले. गोसावी त्यावर बसले. श्रीचरण प्रक्षालन(धुतले). टिळा लावला. पत्रावळी वाढली. तेंव्हा भोजन करू लागले. ती (ब्राह्मणी) विचारी, अजून वाढू का? गोसावी शांत बसलेले. अजून? अजून? विचारी. आणि मग वाढी. असे पाचशे सहाशे जणांचे जेवण गोसावी जेवले. तिच्या मनी विकल्प आला. एवढे सारे यानेच खाल्ले. म्हणून  मग गोसविंनी हात आखडता घेतला. जेवण संपवले. विडा घेतला. मग गोसावी निघाले. सर्वज्ञ म्हणतात, “मग तिने पत्रावळ्या उचलण्यास सुरुवात केली. एक उचलली की एक अश्या पाचशे पत्रावळ्या निघाल्या. मग ब्राम्हण तिला म्हणाला. अगं पापिणी हे काय केले? सहस्त्र ब्राम्हणाचे अन्न यांनाच देती तरी चालले असते.           

काबा = गुजरात प्रांतातील चोर, ओखा प्रदेशातील लुटारू वेचे = खर्चण्यासाठी द्रव्य अस्त्रीया = स्त्री करवडिये = समूहातपूरूख = सिद्ध पुरुष

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: