३४ तैल्यकारयुगमा स्तीती How Shri Chakradhar Swami gave Sthiti to Teli Couple

गोसावीयांसि कटिप्रदेसी सुडा : श्रीमुगुटप्रदेसी सुडा : गोसावी एका गावांसि बीजें केलें : गोसावी उभीया हाटवटीया बीजें करीत असति : दोहीं वोळी तेलीयांची घरें: दोही ओळी तेलिणी तेल वीकीती बैसलीया असति : त्यांतु एकी गोसावीयांतें देखिलें : ते उठिली : अवघा पसारा माथां घेतला : त्या येउनि यातें श्रीकरि धरिलें : मग म्हणीतलें : ‘एइ गा बरवेया देवा : माझेया घरा जाओं:” ऐसें म्हणौनि यातें श्रीकरी धरूनि आपुलेया घरासि नेलें : उंबरेयापासि श्रीकरू सोडिले : पसारा उतरिला’ : आपण भीतरि जाउनि उतरडीकडे गेली : गोसावी दोन्ही दारसंका दोहीं श्रीकरी धरूनि उभे ठेले : तवं तेली घाणा खेटीत होता : मग तेयातें गोसावी म्हणीतलें : “आगा ए मेहरा : या तुझीया मेहरी यातें कां बोलाविलें?” तेणें ऐसे पाहिलें : आणि गोसावीयांतें देखिले : पाहार सांडिली : घाणेयाखालुती उडी घातली : श्रीचरणांवरि माथा ठेविला: मग तेणें म्हणीतलें : “जी जी: मी तीळमारा तेली : ते माझेया पापा क्षेओ करावेया कारणे बोलाविलें जी:” ऐसें म्हणौनि बाजसुपवती घातली : गोसावीयांसि आसन जालें : श्रीचरण प्रक्षाळिले : मग तेणें आपुलीए स्त्रीएसि नीरोपु दीधला : “आजि जेतुकें तुं रांळू जाणसि तेतुकें रांधि हो :” मग तो श्रीचरणां लागौनी घाणा खेटुं गेला : ते सुप घेउनि उतरडीसि गहुं : तांदुळ : काढुं गेली : गोसावी तीयेतें अवळोकिलें : आणि तेयातेंहिं अवळोकिलें : आणि दोघांहिं स्तीति जाली : एतुलेनि तेथौनि बीजें केलें : मग तीएं दोघे अद्यापि झाडिमंडळी देओ आणि देवि होउनि वर्ततें असति : हे तेयांसि भेटलें : मुगुटें मुडुप झगटुनि : परि यातें तीएं ओळखतीचि ना : ओळखिचाही पाडु नाही:

हे गोष्टि रावंसगावी आबाइसां वाएनाएकाउपरि : संगमेस्वरी सांघीतलीः

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: