लेखक – नरहर कुरूंदकर
मराठवाडा या शब्दाला एका बाजूने पाहिले, तर फार अर्थ आहे. दुसऱ्या बाजूने पाहिले, तर या शब्दाला काहीच अर्थ नाही.आम्ही मंडळी हा शब्द सार्थ म्हणून शिल्लक उरावा या मताची नाही. हा शब्द निरर्थक व्हावा या मताची आहोत. जन्मभर आमच्या नेत्यांनी जी धडपड केली ती हा शब्द सार्थ असावा म्हणून नाही तर तो शब्द निरर्थक व्हावा म्हणून! पण अजून नियतीची इच्छा हा शब्द निरर्थक व्हावा, अशी दिसत नाही. ठीक आहे. मराठवाडा शब्द अर्थपूर्ण असणेही आम्हांला मान्य आहे. कारण आम्ही त्या शब्दाला अस्मितेचा अर्थ दिला आहे.
मराठवाड्याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले आणि पुढे पेशव्यांनी टिकविलेले, वाढविलेले मराठी राज्य नसते, तर मग मराठी बोलणारा सगळा भाग हा मोगलांच्या दक्षिण सुभ्याचाच भाग झाला असता. त्याचा वेगळा मराठवाडा म्हणून उल्लेख करण्याची गरज नव्हती. पेशव्यांना जर वेळोवेळी मिळालेले विजय पचविण्याची क्षमता असती, तरी मराठवाडा निर्माण झाला नसता. पेशवाईचा पाडाव झाल्यानंतर आणि फौजांच्या खर्चासाठी जो वऱ्हाड इंग्रजांनी तोडून घेतला तो देऊन झाल्यानंतर, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हैदराबाद संस्थानला एक दिवाण सालारजंग म्हणून मिळाले. जेवढे राज्य निर्माण करण्याची पहिल्या निजामाची इच्छा होती आणि मागोमाग जेवढे राज्य निर्माण करण्यात नंतरचे निजाम गुंग होते त्या साऱ्याचा नाद सोडून सालारजंगांनी हैदराबादचे जे संस्थान शिल्लक उरले होते, त्याची व्यवस्था लावली. जाता जाता सर्वांचे लचके तोडून झाल्यावर जे संस्थान शिल्लक उरले होते, तेही भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते.
सालारजंगांनी या संस्थानात नवीन व्यवस्था लावली. पूर्वीचे वसूल करणारे गुत्तेदार बाद करून पगारी नोकर निर्माण केले. हैदराबाद संस्थानची एकूण सोळा जिल्ह्यांत विभागणी करून प्रत्येक जिल्ह्यावर एक एक पगारी कलेक्टर नेमला. या सोळा जिल्ह्यांचे त्यांनी मराठी बोलणारे, कानडी बोलणारे असे एक एक व तेलगू बोलणारे दोन असे एकूण चार सुभे केले. या प्रयत्नात हैदराबाद संस्थानातील मराठी बोलणारा प्रदेश एक सुभा म्हणून बनला. हा सुभा म्हणजे मराठवाडा. मूळ मुसलमानी पद्धतीने उच्चार करायचा तर मऱ्हेटवाडी. मराठी लोकांचा प्रदेश. आम्ही निजाम राजा राहावा याला विरोधी होतो. राजेशाहीच्याच विरोधी होतो. मोगली साम्राज्याचा हा शेवटचा अवशेष शिल्लक राहावा, हेही आम्हांला नको होते. आम्हांला भारताचा एक प्रांत म्हणून हैदराबाद संस्थान शिल्लक राहावे हे नकोच होते. हैदराबादने भारतीय संघराज्यात विलीन व्हावे हा आमच्या मागणीचा फक्त पहिला टप्पा होता. या संस्थानचे तीन भाषावार तुकडे करून मराठवाडा महाराष्ट्राला जोडावा आणि संपूर्णपणे एकात्म महाराष्ट्र निर्माण व्हावा ही आमची आकांक्षा. ही आकांक्षा पूर्ण व्हायची म्हटल्यानंतर मराठवाडा या वेगळ्या अस्तित्वाची तरी गरज काय? आम्ही महाराष्ट्रात बिनशर्त सामील होणाऱ्यांपैकी आहोत. तेव्हा ‘मराठवाडा’ हा शब्द निरर्थक व्हावा, ही आमची आकांक्षा आहे. महाराष्ट्र राज्य बनले. पण ते ज्या पद्धतीने चालले त्या पद्धतीमुळे मराठवाडा हा शब्द निरर्थक व्हावा ही जी आमची इच्छा ती मात्र पूर्ण झालेली नाही. लवकर पूर्ण होईल, असे दिसतही नाही. मराठवाडा हा शब्द निरर्थक झाला पाहिजे, असे आम्ही म्हणतो, त्या वेळी एकात्म महाराष्ट्र निर्माण व्हावा आणि महाराष्ट्राच्या सर्व विभागांत असा एकजीवपणा निर्माण व्हावा की वेगळेपणा सांगण्याची गरजच वाटू नये, असे आम्हांला अभिप्रेत असते. मराठवाडा शब्द निरर्थक व्हावा, ही आमची इच्छा महाराष्ट्र एकजीव या ध्येयवादाशी निगडीत आहे. आपले पृथक अस्तित्व टिकवून धरण्यासाठी झटणारी वेगळिकीची भावना इथे प्रबल नाही. इच्छा नसताना आम्ही महाराष्ट्रात आलेलो नाही. इच्छा नसताना महाराष्ट्रात अडकून पडलेलो नाही. आम्ही स्वेच्छेने, आग्रहाने व हट्टाने महाराष्ट्रात आलो. कारण आम्ही महाराष्ट्रातच आहो, ही आमची उत्कट जाणीव आहे.
जनतेच्या स्मृती फार अल्पकालीन असतात, नाही तर आमच्या हट्टामुळे महाराष्ट्र झाला, एरवी तो अस्तित्वात आला नसता याची आठवण लोक विसरले नसते. मराठवाडा या शब्दाची आम्हांला लाज वाटत नाही. वाटतो तो अभिमान. अभिमानाने आणि गर्वाने सांगावे असे आमच्या जवळ किती तरी आहे. मराठवाडा नावाचे काही लांच्छन आहे व ते आम्ही विसरू इच्छितो, अशी मुळीच गोष्ट नाही. मराठवाडा हा अभिमान व गौरवाचा भाग आहे, पण महाराष्ट्रात तो आम्ही विलीन करू इच्छितो असे आमचे म्हणणे आहे. मात्र, ही क्रिया प्रेमानेच होणार. तुम्ही मराठवाड्याचा पराभव करून हे घडवून आणू शकणार नाही. पराभव करण्याचे प्रयत्न फक्त कटुता वाढवतात, वेगळेपणाची जाणीव बळकट करतात.
मराठवाड्याजवळ अभिमान बाळगण्याजोगे खूप आहे. आद्यकवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यावर अजून वाद चालू आहेत, ते जरूर चालू द्या. पण नामदेव, जनाबाई, गोराकुंभार, एकनाथ, मुक्तेश्वर, रामदास हे तर आमचे आहेत. महानुभाव पंडित नरेंद्र भास्कर तर मराठवाड्याचे आहेत. सातवाहनाची राजधानी पैठण आणि यादवांची राजधानी देवगिरी ही ठिकाणे तर मराठवाड्यात आहेत. पुष्कळ वेळेला ठळक बाबींची नोंद मुद्दाम करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे वेरूळच्या पाटलांचे. महाराजांच्या मागे आपले पुण्य उभा करणारा रामदास जांबेचा. महाराजांना क्षत्रिय ठरवून राज्याभिषेक करणारा गागाभट्ट पैठणचा. महाराजांचे उपपंतप्रधान अण्णाजी दत्तो मराठवाड्याचे, पंतप्रधान मोरोपंत पिंगळे हे बिलोलीजवळ नांदेड जिल्ह्यातले म्हणजे मराठवाड्याचे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरवासिनी आणि तीन ज्योतिर्लिंगे – वेरूळ, औंढा नागनाथ, परळी- मराठवाड्यात, वेरूळचे कैलास लेणे व अजिंठ्याची चित्रकला इथली. साहित्याचा, संस्कृतीचा केवढा तरी गौरवशाली अभिमानास्पद वारसा मराठवाड्याचा आहे. त्या वारसाचा रास्त अभिमानही आम्हांला आहे. पण आमचा शिवाजी सर्व महाराष्ट्र आपला मानणारा आहे. तो मराठवाड्याचे वेगळेपण सांगणारा नाही, याचा अभिमान आम्हांला जास्त आहे.
फार जुन्या इतिहासातल्या गोष्टी सांगण्याने वर्तमानकाळात निभाव लागणार नाही हे मलाही कळते. शिवाजीने निर्माण केलेल्या मराठी राज्याचे लाभ तर महाराष्ट्राला झालेच. पण पेशवाई बुडाली आणि इंग्रजांचे राज्य आले, याचेही लाभ महाराष्ट्राला मिळाले. हे लाभ आम्हांला मिळाले नाहीत. निजामाच्या राजवटीत आम्ही दडपलेले राहिलो. हे आमचे ऐतिहासिक कारणामुळे निर्माण झालेले मागासलेपण आहे. तेही आम्ही नाकारत नाही आणि या आमच्या ऐतिहासिक मागासलेपणाला इतर कुणी जबाबदार आहे असे आम्ही समजत नाही. वर्तमानाचे भान आमच्या मनात आहे; पण ते आकसशून्य आहे. निजामाच्या राजवटीत आम्हांला अडकून पडावे लागले याबद्दल पुण्या- मुंबईला आम्ही गुन्हेगार ठरविलेले नाही.
सगळे हैदराबाद संस्थान मागासलेलेच होते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या हैदराबाद संस्थानात धर्मवेडी जातीय राजवट नांदत होती. कधी तरी हा अंधार संपणार होता. सर्व भारतभर पेटलेल्या स्वातंत्र्य आकांक्षेने हैदराबाद संस्थानसुद्धा पेटून उठणारच होते. हैदराबाद संस्थानात जागृतीचे अग्रदूत कोण होते? कुणी वामन नाईकांचे नाव घेतील, कुणी केशवराव कोरटकरांचे नाव घेतील. दोघेही मराठीभाषिक होते. मराठवाडाच हैदराबादच्या स्वातंत्र्य आंदोलनात अग्रभागी होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ जन्माने कानडी पण मराठवाडा त्यांची कर्मभूमी. हे मराठवाड्याचे नेते. सगळ्या सशस्त्र आंदोलनाचे म्हणजे कृती समितीचे अध्यक्ष दिगंबरराव बिंदू मराठवाड्याचे. कृती समितीचे चिटणीस गोविंदभाई श्रॉफ हे तर आजही मराठवाड्याचे सर्वांत आदरणीय नेते मानले जातात. हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य लढ्यात मराठवाडा अग्रेसर होता. जागृतीतही आणि पुढे सशस्त्र आंदोलनातही. हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्याचा अर्थ पुष्कळदा लोकांना कळत नाही. तो केवळ संस्थानाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचाच तो लढा होता. ज्या संख्येने इथे सत्याग्रह झाले, ज्या संख्येने सशस्त्र आंदोलनात लोक सहभागी झाले ते प्रमाण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च प्रमाण आहे आणि जनतेवर जे अत्याचार झाले त्याचे प्रमाणही फार मोठे आहे. उठसूठ कोणत्याही छोट्यामोठ्या घटनेच्या वेळी रझाकारांची आठवण काढणारे लोक आहेत. त्यांना रझाकारांचे अत्याचार म्हणजे काय हेही माहीत नसते. आणि सशस्त्र रझाकार व सर्व धर्मवेडे साह्याला घेऊन शासन नागवेपणाने नाचत होते, तरीही जी जनता झुंजत राहिली, जिचा कणा व मान ताठ राहिली त्यांच्यावर सहजासहजी पराभव लादता येत नसतो, हेही पुष्कळ मंडळी विसरतात. प्रतिकूल परिस्थिती व अनन्वित अत्याचार म्हणजे काय हे आम्ही भोगलेले आहे. तरीही हे सारे पाशवी सामर्थ्य मराठवाड्याला नमवू शकले नाही. या आमच्या स्वातंत्र्यलढ्याचा आम्हांला रास्त अभिमान आहे. आमचा स्वातंत्र्यलढाच कुणी पुसून टाकतो म्हटले, तर ते जमणारे नव्हे.
भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत त्याग, बलिदानाच्या रोमहर्षक कहाण्यांत मराठवाडा नेहमी अग्रभागी राहिला. हुतात्मा गोविंदराव पानसरे, हुतात्मा बहिर्जी नाईक हे दोन हुतात्मे म्हणजे बलिदान करणाऱ्या अनेकांचे प्रतिनिधी. आमचा हा गौरवास्पद वारसा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्ही पुढे होतो. राष्ट्रासाठी मरण्यात आम्ही पुढे होतो हे अभिमानाने सांगताना आम्हांला संकोच वाटण्याचे कारण काय? पण आम्हांला असे वाटतेच की आपली ही कष्ट भोगण्याची तयारी हा अभिमानास्पद ठेवा आहे. आम्ही बिनशर्त महाराष्ट्रवादी होतो. ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व संपवून, ती तयारी ठेवून महाराष्ट्र जन्माला घातला. बिनशर्त महाराष्ट्रात जाणे म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आम्हांला होतीच. हैदराबाद ‘ब’ गटातील प्रांत होता. ऊर्वरित महाराष्ट्र ‘अ’ गटातील प्रांत होता. ‘ब’ प्रांतातील तीन वर्षांची सेवा म्हणजे ‘अ’ गटातील दोन वर्षांची सेवा. या नियमामुळे मराठवाड्यातील मंडळींची सेवाज्येष्ठता गेली. उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसल्यामुळे अनेक वकिलांचे धंदे बसले. राजकारणात तर सर्व जुन्या नेत्यांना निवृत्तच व्हावे लागले. हे व असे अनेक परिणाम मराठवाड्यातील मंडळींना भोगावे लागले. आज याही गोष्टी जुन्या झालेल्या आहेत. त्या उगाळीत बसण्याची आमची इच्छा नाही.
मराठवाड्यात कर्तृत्व भरपूर. बौद्धिक क्षमताही भरपूर आहे. पूर्वी निजामाचे राज्य चालू असताना दिवाकर कृष्ण, नांदापूरकर, बी. रघुनाथ यांच्यासारखे साहित्यक्षेत्रातील नेते आमच्याकडे झाले. आज वा.रा.कान्त, ना.धों.महानोर तीच परंपरा चालवीत आहेत. सर्व महाराष्ट्रात ज्यांच्याविषयी आकर्षण आहे, असे वाङ्मयाचे नेते मराठवाड्यात आहेत. मग आमची तक्रार कोणती आहे? तक्रार इतिहासाविषयी नाही. ती वर्तमानकाळाविषयी आहे. मराठवाडा सर्व महाराष्ट्राचे धान्यकोठार होण्याची क्षमता असणारा भाग आहे. भौगोलिक विकासाची प्रचंड क्षमता इथे आहे. मराठवाडा आणि उरलेला महाराष्ट्र यांत विकासाची फार मोठी दरी आहे. मुंबई विद्यापीठ इ.स. 1858 सालचे तर मराठवाडा विद्यापीठ इ.स. 1958 चे. अंतर कुणालाही कळावे इतके उघड आहे. पश्चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न 345 असते, तेव्हा मराठवाड्यात ते दरडोई फक्त 174 रुपये असते. मराठवाडा मागासलेला आहे, हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा सर्वांच्या बरोबरीने यावा हे लवकर, झटकन घडणारे कार्य नाही त्याला उशीर लागेल हे मान्यच आहे. पण उशीर लागेल म्हणजे किती उशीर लागेल? माझे एक मित्र म्हणाले, हे अंतर भरून काढण्यास 50 वर्षे लागतील. मी म्हटले माझी हरकत नाही. मी 50 वर्षे थांबण्यास तयार आहे. पण महाराष्ट्राशी जेव्हा आम्ही संलग्न झालो तेव्हा लोक म्हणत, हे अंतर भरून काढण्यास 50 वर्षे लागतील. 1956 ते आजतागायत (1980) या आश्वासनाचा जवळपास निम्मा भाग संपला आहे. 25 वर्षांत हे अंतर कमी किती झाले? 50 टक्के कमी झाले असेल तर फारच चांगले. हे अंतर 30/40 टक्के कमी झाले असले, तरी मी निराश होणार नाही.
सत्य असे आहे की मराठवाडा आणि ऊर्वरित महाराष्ट्र यांच्यातील अंतर गेल्या 25 वर्षांत कमी झालेले नाही. उलट हे अंतर वाढलेले आहे. तक्रारीचा मुद्दा हा आहे. महाराष्ट्र एकात्म व्हायचा असेल, तर महाराष्ट्राच्या विविध भागांतले अंतर कमी व्हायला हवे. ते जर वाढत असेल आणि याबाबत कोणतीही अपराधाची जाणीव महाराष्ट्रात नसेल, तर मग आमची तक्रार आहे. हा बेदरकारपणा महाराष्ट्राच्या अस्तित्वालाच धक्का लावील. जे आम्ही निर्माण केले ते केवळ बेजबाबदारपणे वागल्यामुळे धोक्यात येईल, याची खंत आम्हांला आहे. आणि आम्ही असा महाराष्ट्राच्या एकात्मतेचा विचार करतो याचा अभिमानही आहे. मराठवाडा ही गौरवाने सांगण्याजोगा वारसा असणारी संतांची तशीच लढवय्यांची जमीन. विकासाची क्षमता असणारी जिद्दी माणसांची भूमी. पण आकांक्षा आहे महाराष्ट्राच्या गौरवात एकजीव होण्याची. मराठवाड्याचे निराळेपण संपावे ही. आणि खंत आहे याची की हे घडून येण्याऐवजी मराठवाडा या नावाने लढत राहणे आम्हांला भाग पाडले जात आहे याची.