शेतकरी या देशाचा अन्नदाता आहे असे किमान आपण शेतकरी बंधू जरी मानत असलो तरी माल तयार झाल्यावर यातील खरी आर्थिक सत्ता आणि नियंत्रण हे शेतकर्यांकडून बाजाराच्या हाती येते. आणि हा बाजार आणि एकंदरीतच व्यवस्था काही शेतकऱ्याला धारजिणी नाही. त्यामुळे शेतीमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून आणि कचाट्यातून बाहेर काढणे, बाजार समितीच्या बाहेर देखील शेतमालाच्या खरेदी-विक्रीला मान्यता देणे आणि शेती करारांचा मार्ग मोकळा करणे हे तीन महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने 2020 च्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतले. या संबंधात तीन अध्यादेश काढण्यात आले. सदर अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर करून, सदर विधेयकांना संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सप्टेंबर 2020 मध्ये मान्यता दिली आहे. या निर्णयांमुळे शेतीक्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल, शेतमालाच्या विपणनाचे क्षेत्र खुले होईल आणि शेतकर्याला त्याचा अंतिमतः लाभ होईल, असा दावा केला जात आहे.
तेंव्हापासून कृषी कायद्यावर आपल्या देशामध्ये घमासान चालू आहे. मोदी सरकारने तीन कृषी कायदे लोकसभेत आणि राज्यसभेत पारित करून घेतले होते. हे कायदे चांगली की वाईट? शेतकऱ्यांच्या फायद्याचे की शेतकऱ्यांना लुबाडणे साठी बनवण्यात आलेले? हे कायदे करण्यामागची भूमिका राजकीय स्वार्थ आहे की क्रांतिकारी सुधारणा? बड्या औद्योगिक घराण्यांचे खिसे भरण्यासाठी केलेली चाल आहे की शेतकऱ्यांच्या समस्यांची उकल? शेतकऱ्यांच्या मुक्तीची सनद आहे की शेतकऱ्यांच्या गुलामगिरीची सनद? असे अनेक वाद कायद्याविषयी लोकांमध्ये प्रचलित आहे कोणी काही म्हणतं तर कोणी काही सांगतोय. एक पक्ष वेगळा सांगतो तर दुसरा पक्ष अजूनच वेगळी गोष्ट सांगतो. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या मनामध्ये याबद्दल प्रचंड गोंधळाची परिस्थिती आहे. अनेकांना तर या कायद्यामध्ये काय आहे तेच माहिती नाही.
याच कारणास्तव शेतकरी कायदा काय आहे? आणि कसा आहे? हा जाणून घेण्याचा माझा सरळ साधा सोपा प्रयत्न आहे. त्यामध्ये कुठल्याही पक्षाची बाजू नाही किंवा कुठल्याही पक्षाला विरोध नाही. फक्त कायदा मला जसा समजला तसा मी मांडतो आहे. अर्थात ऐतिहासिक घडामोडी आणि सद्यस्थितीतील राजकीय घडामोडीही यासोबत मी विचारात घेणार आहे. कायद्याचे विश्लेषण झाल्यानंतर कुठल्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या कालखंडात काय-काय भूमिका घेतली आहे तेवढे फक्त मी शेवटच्या लेखांमध्ये मांडणार आहे. ती भूमिका चूक की बरोबर हे ज्याने त्याने आपले आपण ठरवावे. हा विषय खूप मोठा असल्यामुळे याला मी उप-विषयांमध्ये मांडणार आहे त्यामुळे या लेख माले मध्ये किमान चार-पाच तरी छोटे लेख असतील. ते मी क्रमाक्रमाने प्रकाशित करेल. हे सर्व लेख वाचल्या नंतरच यावर साधक बाधक चर्चा करावी अशी माझी विनंती आहे. किंबहुना माझ्या शेतकरी मित्रांनी कुटुंबीयांनी आणि शेतकरी नातलगांनी या विषयाला पूर्णपणे जाणून घेऊन यावर सखोल चर्चा करावी,व्हावी हाच या लेखमालेचा माझा उद्देश आहे.
या सुधारणा अंतर्गत तीन वेगवेगळे कृषी कायदे संसदेत संमत करण्यात आले. हे कायदे वेगवेगळे असले तरी एक प्रकारे ते एकमेकांशी संबंधित आहेत. तीनही कायदे काय सांगतात हे समजून घेतल्यानंतर आपला हे लक्षात येईलच. पण हे सर्व समजून घेण्याआधी एपीएमसी किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती हे काय प्रकरण आहे आणि किमान हमी भाव किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस हा काय मुद्दा आहे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी समजून घेतल्याखेरीज या कायद्यांमध्ये काय बदल करण्यात आले आहेत आणि त्याचे शेतकऱ्यांच्या जीवनावर काय परिणाम होइल हे समजून घेता येणार नाही म्हणूनच या लेखमालेची सुरवात आपण या दोन गोष्टी समजून घेण्यासाठी करूया.
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा