Jamadar Bapu Lamkhade जमादार बापू लामखडे

Our Real Heroes

आज चार डिसेंबर. आज जमादार बापू लामखडे यांची पुण्यतिथी. आता तुम्ही विचाराल की कोण हा बापू लामखडे?. बापू  लामखडे हे कस्टम खात्यात साधे जमादार. पण त्याचा दरारा फार. 

आजच्या या जगामध्ये जिथे गँगस्टर लोकांना आयडॉल म्हणून प्रस्थापित केले जात आहे तिथे अशा साध्या, सरळ, प्रामाणिक, आणि कर्तव्यदक्ष कस्टम अधिकाऱ्याची ही कहाणी फार कमी लोकांना माहिती आहे हे आपले दुर्दैव. मिर्झा उर्फ हाजी मस्तान हा मुंबईचा डॉन देखील ज्याला वचकून असायचा अशा या कस्टम खात्यातील  साध्या जमादाराची ही कहाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श आहे.

बॉलिवूड आणि त्यानंतर मुंबईचा अंडरवर्ल्ड याविषयी उत्सुकता असणारी आजकालची पोरं हमखास दाऊद इब्राहिम चे नाव घेतात. पण या दाऊदच्याही आधी जो मुंबईवर अनभिषिक्त राज्य करायचा तो डॉन म्हणजे हाजी मस्तान आपल्यापैकी बहुतेकांनी अमिताभ बच्चनचा दीवार चित्रपट पहिला असेल. असे म्हणतात की दिवार या चित्रपटाची भूमिका थोड्याफार फरकाने हाजी मस्तानच्या जिवनाची स्टोरी आहे. तर या दीवार चित्रपटात अमिताभ बच्चन ने ज्या कुलीची आणि डॉन ची भूमिका केली आहे ती व्यक्ती म्हणजे हाजी मस्तान.  पुढे फार नंतर आलेला (2010) वन्स अपॉन टाईम इन मुंबई नावाचा अजय देवगन याचा चित्रपट हाजी मस्तान यांच्या जीवनावर बेतलेला आहे.

हमाल म्हणून जीवनाची सुरुवात केलेला नंतर कुख्यात स्मगलर कम मुंबईचा डॉन बनलेला गुंड, तस्कर, दारूचा चोरटा व्यापार करणारा, खंडणी वसूल करणारा, कुख्यात डॉन म्हणजे हाजी मस्तान. गैर मार्गाने चालणाऱ्या आणि बेकायदेशीर कामे करणाऱ्या लोकांना हिरो म्हणून प्रोजेक्ट करण्याची पद्धत बॉलिवूडमध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळेच आपल्याला हाजी मस्तान तर माहिती असतो परंतु हाजी मस्तान ज्याला घाबरायचं असा बापू लामखडे मात्र आपल्याला माहिती नसतो

नव्वदीच्या दशकाच्या राजकीय परिस्थितीची  ज्यांना थोडीफार माहिती आहे अशा सर्व लोकांना प्रमोद नवलकर हे नाव निश्चितच माहिती असणार. 1995 ते 99 या काळामध्ये शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये मंत्री असलेले प्रमोद नवलकर सुरूवातीपासूनच पक्के मुंबईकर. नवलकर केवळ राजकारणी नव्हते.  त्यांच्या  कारकिर्दीची सुरुवात सुरुवात एक पत्रकार म्हणून झालेली होती. प्रमोद नवलकर मुंबईच्या नवशक्ती या वर्तमानपत्रांमध्ये ‘भटक्यांची भ्रमंती’ या नावाने एक साप्ताहिक सदर (column) लिहायचे. या लेखनासाठी त्यांनी भटक्या हे टोपण नाव धारण केले होते.  या सदरामध्ये ते आठवडाभरात मुंबईत भ्रमंती करून, मुंबईची सर्व दशा-दिशा, मुंबईत चाललेले अवैध धंदे, मुंबईची चाललेली प्रगती-अधोगती या सर्वांविषयी विश्लेषक नजरेतून आपल्या लेखणीद्वारे प्रकाश टाकायचे.

या सदरा विषयी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे  कुठल्याही वर्तमानपत्रात सर्वाधिक काळ चाललेले सदर म्हणून यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे.  हे सदर या नवशक्ती या वर्तमानपत्रात सलग 52 वर्ष चालू होते. मुंबईचा इतिहास आणि भूगोल, राजकारण, अर्थकारण ज्यांना जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ‘भटक्यांची भ्रमंती’ वाचणे हि एक समृद्ध करणारी गोष्ट आहे.

या भटक्यांच्या भ्रमंती या सदरामध्ये जमादार बापूंचा मृत्यु झाल्यानंतर (1978) नवलकरांनी त्यांच्यावर जो मृत्युलेख लिहिला तो त्यांच्याच शब्दात इथे देत आहे.

गेल्या आठवड्यात कस्टमचा एक शिपाई माझ्याकडे आला. त्याच्या मुखातून शब्द फुटत नव्हता. कंठ दाटून आला होता. मोठ्या कष्टाने त्याने शब्द उच्चारले, ” साहेब, आपला बापू जमादार गेला.” आणि त्याचे डोळे पाण्याने डबडबले. मी ती बातमी ऐकून अवाक झालो. बापू दहा बारा दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे माझ्याकडे आला होता. पुढची भेट पंधरा डिसेंबरला रात्री ठरली होती. रात्री अकरा वाजता तो मला डोंगरीच्या पोलीस स्टेशनजवळ भेटणार होता. आणि सारी रात्र आम्ही मुंबईतील किनारे पिंजून काढणार होतो. बापुची आणि माझी दोस्ती अखेरपर्यंत अतिशय खाजगी होती. बापूचा आणि या भटक्याचा परिचय गेल्या पंधरा सोळा वर्षाचा! पण दोस्ती होती सात वर्षाची. या सात वर्षात बापूने जी या भटक्याला साथ दिली ती कधीच विसरता येणार नाही.


वाचकहो, बापू हा कस्टममधील साधा शिपाई, पण देशाभिमाने असा पेटलेला माणूस आज तुम्हाला शोधून सापडणार नाही. बापू म्हणजे स्मग्लर्सचा कर्दनकाळ. मग तो मस्तान असो, अगर युसुफ पटेल असो, बापूच्या वाट्याला जाण्याचे धाडस आतापर्यंत झाले नाही. बापूला विकत घेणारी शक्ती या जगाच्या पाठीवर आतापर्यंत जन्माला आलेली नाही.

या बापूच्या सहवासात मी अनेक तास काढले. चार वर्षे हा भटक्या मुंबईतील स्मग्लर्सशी एकांगी लढत होता. पण आज सांगायला हरकत नाही. ती लढत एकांगी नव्हती. त्या भ्रमन्तीमागे दोन शक्ती होत्या. एक म्हणजे असिस्टंट कमिशनर तावडे. तावडे दोन वर्षापूर्वी निवृत्त झाले. पण अपरात्री रात्री हाक मारली कि तावडे धावत यायचे. बापूचा आधार तर पहाडाएव्हढा होता. या शहरातील स्मग्लर्सच्या अनेक जागा मला बापूने दाखवल्या. अनेक स्मग्लर्सची चेहरेपट्टी बापूने करून दिली. आणि रात्री अपरात्री अनेकदा सोबत केली तीही बापुनीच!

मला ती रात्र आठवते. ड्रायव्हर च्या वेशात मी कुलाब्याला गाडी घेऊन गेलो. त्या रात्री तीन कस्टम अधिकारी आस्तोरीया कॅबरे हॉटेल मध्ये होते. त्या तीनही अधिकाऱ्यांना मी माझ्या गाडीत घेतले आणि त्यांच्या चौकीवर नेऊन सोडले. त्यांना ते कळलेही नाही. ती घटना आणि त्यांचे गाडीतील संवाद मी भ्रमंतीतून प्रसिद्ध केल्यावर कस्टममध्ये प्रचंड खळबळ माजली. पण ती खबरही मला बापुनीच दिली होती. इतकेच नव्हे तर तेथे कोणी दगाफटका करू नये म्हणून बापू त्याच्या सायकलीवरून माझ्या गाडीच्या मागे राहिला होता.

बापू हा वाघाचा बच्चा होता. एका वेळी आठ जणांना लोळवण्यान्याइतकी ताकद त्याच्या मनगटात होती. त्याच्या हातात असलेल्या सोटयात वीज होती. रात्री अपरात्री किनार्यावर फिरत असताना बापू आजूबाजूला असेल या विचारानेच निर्धास्त वाटायचे. ती रात्र मला आठवते. रात्री एकचा सुमार असेल. खबर असल्याने मी ससून डॉक्कला गेलो होतो. मी आतपर्यंत जाऊन पलीकडच्या क्रेन खाली उभा राहिलो. इतक्यात धक्क्यापाशी दोन टकसी येऊन धडकल्या. बाहेर जाण्यचा रस्ता बंद झाल्यासारखा झाला. कोणी ओळखले असते तर खतरा होता, पण आश्चर्य म्हणजे क्षणात खाली पाण्यातून बापू वर आला . त्याचे कपडे नखशिखांत भिजले होते .चेहऱ्यावर आलेले केस त्यांनी दूर केले .मला पाहताच त्याला आनंद झाला .तो आनंदाने म्हणाला ,साहेब पाण्याखाली माल सापडला .पण बापू पाण्यातून अवतरलेला पाहताच टकसीतुन खाली उतरलेले झटक्यासरशी टकसीत बसले आणि दोन्ही टकसी फरारी झाल्या . इतक्यात तिथे तावडे साहेब हि आले आणि पाण्यात टाकलेल्या कापडाच्या गासड्या काढण्याचे काम सुरु झाले .

बापू हा एक कर्मयोगी होता . हात पुढे केला असता तर लाखो रुपये हातात पडले असते . पण त्या मोहापासून तो अखेरपर्यंत दूर राहिला .तोकडी पैट , बाहेर काढलेले शर्ट आणि सायकल हि त्याची मालमत्ता .पण त्याच्या सायकलीचा दरारा शब्दात वर्णन करता येणार नाही . डॉक्क्च्या दारात बापुची सायकल जरी दिसली तरी स्मग्लर्सच्या छात्या फाटून जायच्या. त्या सायकलीवरून बापूने गेल्या तीस वर्षात मुंबईच्या किनार्यावर हजारो मैल प्रवास केला. ह्या सायकलीने शेकडो सैतानांचा पाठलाग केला. माल पळविणाऱ्या टकसी आणि ट्रक देखील त्या सायकलीला शरण आल्या. बापूने ती सायकल १९३५ साली विकत घेतली आणि ४३ वर्षे तिच्यावर जीवापाड प्रेम करून तिला सांभाळली.बापुच्याच बरोबर त्या सायकलीने केलेली देशसेवा कोणाला विसरता येणार नाही कस्टमनि ती सायकल जर कचेरीत दर्शनीभागी जतन करून ठेवली तर विजयी होणार्या रणगाड्याप्रमाणे जाणारे येणारे त्या सायकली कडे अभिमानाने पाहून नतमस्तक झाल्याखेरीज राहणार नाहीत.

मला चार वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते. कोळसा मोहल्ल्यात स्मगल मालांनी ट्रक भरला जात होता. एक फर्लांगभर तो गेला असेल. अंधारात लपलेल्या बापूनी सायकलवर टांग मारली आणि भरधाव धावणाऱ्या ट्रकवर सायकलवरूनच झेप घेतली. बापूनी डरकाळी फोडल्याबरोबर ट्रकमधील तिघांनीही जीव बचावण्यासाठी ट्रकमधून खाली उड्या घेतल्या. बापू स्टेअरिंग वर बसला आणि त्यांनी ट्रक भरधाव पळवला. पण क्षणात त्याच्या लक्षात आले कि त्याचा टॅक्सी ने पाठलाग होत होता. पण तो पाठलाग अर्धवट सोडला गेला. बापू समजायचे ते समजला. त्यांनी ट्रक कस्टम हाउस मागील यार्डात बंद केला आणि विजेच्या वेगाने तो पुन्हा कोळसा मोहल्ल्यात येऊन धडकला. अपेक्षेप्रमाणे दुसरा ट्रक भरून झाला होता. बापूनी चित्याप्रमाणे त्या ट्रकवर झेप घेतली आणि तोही ताब्यात घेऊन कस्टमच्या यार्डात बंद केला आणि दुसर्या दिवशी स्मग्लर्सच्या विश्वात प्रचंड खळबळ माजली.

बापू एक साधा शिपाई.पण त्याच्यासारखा दरारा साऱ्या कस्टम खात्यात इतर कोणाचा नव्हता. बोट आली कि शेडमध्ये चाळीस पन्नास अधिकारी सामान तपासत असतात. प्रचंड गोंधळ आणि गडबड चाललेली असते. पण बापूनी शेडमध्ये पाऊल टाकले कि वातावरणच बदलून जायचे. इशारे व्हायचे आणि तपासणी कडक व्हायची.

कारण वाचकहो, बापूनी कधीच कोणाची पर्वा केली नाही. मस्तान एव्हढा टेरर! त्याने एकदा एका गरीब पॅसेंजर कडून कुली असताना दोनशे रुपये घेतले. बापूनी मस्तानला गर्दन धरून बाहेर काढले आणि मस्तानचा आवाज बंद झाला. मस्तान असो अगर कस्टमचा अधिकारी असो, बापूच्या मनगटांनी कधीच कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही. बापूनी मारलेली मगरमिठी सोडविणे कोणालाही कधी शक्य झाले नाही. त्या मगरमिठीत किमान अर्धा डझन कस्टमचे अधिकारी आणि तेव्हढे पोलीस अधिकारी सापडले आहेत. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सापळ्यात पकडणे हि सामान्य गोष्ट नाही. पण एकदा दोनदा नव्हे तर सतत बापू परिणामांची परवा न करता हे करीत आला होता.

नोकरीची तर राहोच पण बापूनी जिवाचीही कधी परवा केली नाही. रात्री किनार्यावर तीस तीस चाळीस चाळीस गुंड असले तरी बापू डरकाळी मारीत आणि काठी फिरवीत बाजीप्रभूप्रमाणे आत घुसायचा आणि प्रथम मालावर झडप घालून माल ताब्यात घ्यायचा. असा त्यांनी लाखो रुपयांचा माल एकट्यानी पकडला. कधी कधी त्याला साथ झाली ती एका माणसाची आणि ती म्हणजे त्याचा साथीदार शिपाई रामनाथसिंग यांची. रामनाथसिंग हा असाच एक बापुच्याच रक्ताचा शिपाई .रामनाथसिंगनि अंधारात टौर्च घेऊन घुसायचे आणि बापूनी लाठी फिरवायची हे अनेकदा झाले . रामनाथ कधी थबकलाच तर बापू ओरडायचा, थांबू नकोस , अरे मरायचेच झाले तर छातीवर वार झेलून या देशासाठी लढू या ! आणि रामनाथ देखील चित्त्याप्रमाणे झेप घ्यायचा. आज बापू गेल्याने रामनाथसिंग देखील एकटा पडला आहे .

आज बापू गेला म्हणजे कस्टमची शानच गेली . कस्टमच्या कंठातील कोहिनूरच निखळला. बापू सारखे जीवन कोणी जगला असेल असे वाटत नाही. केंद्र सरकारने बापूचा दोनदा गौरव केला. पण बापूला कधी गर्व चढला नाही. कडक शिस्तीचा बापू कधी आला तर बस सांगेपर्यंत खुर्चीत कधी बसला नाही. पन्नास हजार रुपयांचे इनाम त्याला मिळाले. पण डोंगरीची खोली त्यांनी कधी सोडली नाही. जाज्वल्य देशाभिमाने बापू पेटलेला होता. बोलताना शब्दा शब्दात चीड व्यक्त करून अंगार व्यक्त करायचा! अशा कितीतरी भेटी आणि रात्री आज डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्या काळ्या विश्वाचा परिचय या भटक्याला बापूनी करून दिला. त्याचे अभय मला होते.म्हणायचा, साहेब , तुम्ही काळजी करू नका. तुमचा केसाला कोणी धक्का लावणार नाही, तसं झाल तर मी एकाला जागेवर ठेवणार नाही.

बापूच्या कामाबद्दल भारत सरकार तर्फे त्यांना मिळालेले प्रशस्तीपत्रक

असे अभय होणारा माणूस या भटक्याला भेटणे अवघड आहे. बापूच्या निर्वाणाने कस्टमची कचेरी मलूल झाली. सारा कर्तव्यदक्ष कर्मचारी हळहळला .कलेक्टर सोनावणे निशब्द झाले.असि.कलेक्टर बापुविषयी बोलताना अनेकदा गहिवरले. त्याचे सहकारी शिपाई आले आणि त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. या भटक्याचा तर एक जीव देणारा साथीदार गेला. पंधरा तारखेला रात्री भेटणार होता. ती रात्र अद्याप यायची आहे. त्या रात्री किनार्यावर मी भ्रमंती करणार आहे. पण ठरल्याप्रमाणे बापू सोबत नसेल. दिसतील ती किनार्यावर उठलेली बापुची देशभक्तीची पावले! त्या पावलावर पाऊल ठेवण्याचे सामर्थ्य जरी या पावलात आले तरी डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल.

असे अनेक अनाम हिरो, आयडॉल आपल्यासाठी त्याग करून गेलेत पण आपल्याला मात्र त्याची जाणीव नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेचे एक कडवे अशा लोकांसाठी आठवते –

यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥

1 thought on “Jamadar Bapu Lamkhade जमादार बापू लामखडे”

  1. कबीर

    जमादार बापू हा लेख वाचला, वाचतांना बापू यांच्या कार्याविषयी अभीमान वाटला तसेच देशप्रेमाने ओतप्रोत या भन्नाट व्यक्तीविषयी हा लेख वाचनात येण्याच्या आधी माहिती नसल्याची स्वतःचीच स्वतःला लाज वाटली आणि लेखक, कवी, चित्रकार, पत्रकार आणि फिल्म इंडस्ट्री यांनी कार्याची योग्य ती दखल न घेतल्याची खंत सुद्धा वाटली… आपल्या आजू-बाजूला कित्येक व्यक्ती सर्वस्व अर्पण करून देश कार्यास हातभार लावत आहेत अश्या लोकांच्या कार्याची दखल माध्यमांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर, पुढील पिढपर्यंत योग्य ती प्रतिकं पोहचणार नाहीत आणि ते कुण्यातरी डॉन, क्रिमिनल यांनाच आपले हिरो म्हणून स्वीकारतील…
    या ब्लॉग सोबत जुळताना अत्यंत आनंद होतो आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: