
साधारणतः 2002 साली , मी नववीत असताना माझ्या गावी करमाळा पासून 30 किलोमीटर अंतरावर श्री मकाई सहकारी साखर कारखाना येथे स्व. विलासराव देशमुख साहेब हेलिकॉप्टरने भूमिपूजनच्या की गळीत हंगामच्या कार्यक्रमाला येणार होते अशी माहिती मिळाली होती…एकाचवेळी 2 गोष्टींची इच्छापूर्ती होणार होती, एक म्हणजे स्व.विलासराव देशमुख यांस प्रत्यक्षात पाहणे आणि दुसरे म्हणजे हेलिकॉप्टर पाहणे…
…याच मकाई कारखानाचे संस्थापक स्व.दिगंबरजी बागल यांच्या नेतृत्वाखाली सख्खे मोठे बंधू श्री महेश चिवटे यांची श्री मकाई कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून निवड झालेली होती..घरात वडीलबंधू शिस्तप्रिय असल्याने आणि दरम्यान शाळेत परीक्षा सुरू असल्याने कार्यक्रमाला जाण्याचा हट्ट करणे जवळपास अशक्य होते…
अजूनही लक्ख आठवतंय..त्यादिवशी चाचणी परीक्षा होती..आणि सकाळी 11 वाजता आमच्या महात्मा गांधी शाळेसमोर श्री मकाई कारखाना येथे कार्यक्रम ठिकाणी निघण्याच्या तयारीत असलेला एक कार्यकर्त्यांचा 407 टेम्पो उभा होता…मनात घालमेल सुरू झाली, एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला स्व.विलासराव देशमुख साहेब यांस समक्ष पाहण्याची – भेटण्याची तीव्र इच्छा… क्षणात निर्धार केला आणि टेम्पोत बसलो…धुरळा उडवीत टेम्पो भिलरवाडी येथे मकाई कारखाना ठिकाणी पोहोचला…
टेम्पोतून उतरताना पाहिलं, हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होत…जिथं हेलिकॉप्टर उतरणार होतं, त्या जागेजवळ गेलो…तिथं प्रचंड पोलीस बंदोबस्त होता…हेलिपॅड जवळ येणाऱ्या आम्हा लोकांना पोलीस हुसकावून लावत होते आणि बेभान जनता हुरर…हुररर…करत शिट्ट्या वाजवीत होती..
हेलिकॉप्टर खाली उतरले…प्रचंड धुरळा उडाला…नाका-तोंडात माती गेली…हेलिकॉप्टरच्या पंख्याची गर- गर थांबली तशी धुरळा खाली बसला..आणि हेलिकॉप्टरमधून गॉगल घातलेलं – अंगावर जॅकेट चढविलेलं ऐटदार व्यक्तीमत्व बाहेर पडल…ते रुबाबदार म्हणजे अर्थातच स्व.विलासराव देशमुख साहेब यांचंच होत…हेलिपॅडच्या बाजूला जी बांबूचे वर्तुळाकार सुरक्षा कवच केले होते त्या ठिकाणहुन जनता स्व.विलासरावाना हात दाखवत होते…हाका मारत होते..साहेब देखील हसतमुखाने सर्वांना हात उंचावून प्रतिसाद देत होते…स्व.दिगंबर बागल यांनी स्व.विलासराव देशमुख यांचे हेलिपॅडवर स्वागत केले..आणि अलिशान गाड्यांचा ताफा स्टेजच्या ठिकाणी निघून गेला…
स्व.विलासराव देशमुख साहेबांना जवळून पाहता यावे यासाठी गर्दीतून वाट काढत स्टेजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला…पण काही शक्य झाले नाही…थोड्याच वेळात स्व.विलासराव देशमुख इतर मान्यवरांच्या सहित स्टेज वर दाखल झाले…मी दूर असलो तरी स्व.विलासरावांना नजरेत भरण्याचा प्रयत्न करत होतो…साहेब भाषणाला उभे राहिले आणि पब्लिक मध्ये शिट्ट्या, टाळ्या आणि एकच गदारोळ सुरू झाला…एवढ्या लहान वयात मला राजकीय परिपक्वता नव्हती, त्यामुळे स्व.विलासराव यांनी केलेल्या शाब्दिक कोट्या आणि नेमके कुणाला कोपरखळी मारली आठवत नाही…परंतू पब्लिकने साहेबांचे भाषण डोक्यावर घेतले होते… जवळपास 15 – 20 मिनिटे फक्त हशा – टाळ्या आणि शिट्या सुरू होत्या…मध्येच पब्लिक मधून कुणीतरी ईव…ईव…ईव…आवाज काढत स्व.विलासराव देशमुख साहेबांच्या भाषणाला प्रतिसाद देत होत…
स्व.देशमुख साहेबांच भाषण संपणाच्या दिशेने सुरू असतानाच स्टेजच्या डावीकडील एक घोळका उठला आणि संरक्षण D box च्या शेजारी धावू लागला…स्व.देशमुख साहेब यांस जवळून भेटण्याची सर्वांनाच इच्छा होती…मला हा अंदाज आल्याने मी देखील या घोळक्याचे दिशेने निघालो…आपल्या चाहत्यांना नाराज करतील ते विलासराव कसे…?? भाषण संपल्यावर स्व.देशमुख साहेब तडक व्यासपीठावरून खाली आले आणि आणि सर्वांशी हस्तांदोलन करायला सुरूवात केली..स्व. विलासराव यांच्या हातात हात दिलेल्या लोकांचा आनंद अवर्णनीय होता..पण , या भाऊगर्दीत सहभागी झालेला मी निराश झालो होतो…कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं…स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला…स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं…मी आकाशाकडेच पाहत राहिलो…हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता…. स्व.विलासराव देशमुख साहेब यांची माझी झालेली ही दूरवरूनची का होईना पण पहिली भेट…
एक दिवस – एक नेता या कार्यक्रमात संपूर्ण दिवसभर स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत हेलिकॉप्टर मधून आणि चार्टर विमानातून फिरण्याची संधी मिळली. एक खूप मोठ्या मनाचा माणूस आणि संवेदनशील राजकारणी अनुभवता आला.
स्व.विलासराव देशमुख साहेब यांची हेलिकॉप्टरमध्ये मुलाखत घेऊन झाल्यानंतर त्यांना माझ्या पहिल्या भेटीचा हा किस्सा वजा माझा निर्धार सांगितला..आणि स्व.देशमुख साहेब यांनी मनापासून दाद दिली…आणि एकच वाक्य म्हणाले , आयुष्यात आपण जसा विचार करतो, तशा गोष्टी घडतात…त्यामुळें नेहमी सकारात्मक विचार करा..


