कथेची कथा अर्थात गुणाढ्याची बृहत् कथा Gunadhya’s Brihatkatha

शेअर करा

आपला जन्म जर इसवी सन 2000 च्या आधीचा असेल तर कदाचित आपण अनुभवले असेल की- आपल्या लहानपणी जेव्हा घरची सगळी माणसे सर्व कामे आवरून जेवण झाल्यानंतर निवांत गप्पा मारण्यासाठी बसायची किंवा झोपायची तयारी करायची. त्यावेळेस लहान मुलांसाठी एक स्वतंत्र मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा. तो म्हणजे गोष्ट ऐकण्याचा. आपली आजी, बहीण, मोठा भाऊ किंवा एखादे काका,आत्या, मावशी, यांच्याकडून या गोष्टी सांगितल्या जायच्या. कित्येक वेळा तर सर्व बालगोपाल एकत्र येऊन त्यांच्याकडे गोष्ट सांगण्यासाठी फर्माईश करायचे . आता हळूहळू हा प्रकार लोप पावत चाललेला आहे.

आणि यासाठी आपण सबब सांगतो की- वेळ कुठे आहे? आपल्या टी व्ही वर अथवा सोशल मीडियावर हा हा म्हणता दोन तीन तास घालवणारे घरातील जेष्ठ मंडळी अशा सबबी देतात. हे त्या घरातील मुलांचे दुर्दैव. कालाय तस्मै नमः .

दुसरे कारण म्हणजे ज्यांना गोष्टी सांगता येत नाहीत किंवा गोष्टी येतच नाहीत असे लोक. दुर्दैवाने अशा ज्येष्ठ व्यक्तींकडे मुलांना सांगण्यासारख्या गोष्टी नसतात. त्यांनी स्वतः कधी बालपणी गोष्टी ऐकलेल्या नसतात. किंवा त्यांना आता त्यात रस नसल्यामुळे त्या आठवत नाहीत. अथवा त्यांना आठवतबसल्या तरी त्यांना सांगता येत नाही किंवा सांगण्याची इच्छा नसते. अशी अनेक कारणे आहेत. खरेतर अशा घरातील बालकांचे आणि कुमारांचे हे एका अर्थाने दुर्दैवच म्हणावे.

बऱ्याच वेळा असे हि होते की गोष्टी ऐकलेल्या असतात, माहिती असतात, आणि सांगायचं हि असतात परंतु ऐन वेळी त्या आठवत नाही. मग अचानक एखाद्या दिवशी जेव्हा ती गोष्ट समोर येते. तेव्हा आपल्याला जाणवते की अरे ही गोष्ट तर आपल्याला माहिती होती पण ऐनवेळी आठवली का नाही.

असा हा गोष्टीरूप विरंगुळा भारतामध्ये राज्य, प्रांत, भाषा, जात, या भेदांपालिकडे जाऊन सर्वत्र अनुभवायला मिळतो. राजकीय दृष्ट्या भारत एक राष्ट्र होता की नाही याबाबत वाद असतील, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या भारत बऱ्यापैकी एक होता याचा एक छोटासा पुरावा म्हणजे असेतु हिमालय सांगितल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यामध्ये आढळणारे साम्य. भारतातील मुलांचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या अशा अनेक गोष्टी आल्या तरी कुठून? प्रथम दृष्ट्या याचे उत्तर आहे मौखिक परंपरेतून.

भारतामध्ये मौखिक ज्ञान परंपरेचे खूप समृद्ध परंपरा आहे. म्हणजे काय? तर जुन्या काळी लिखित ग्रंथा पेक्षा पाठांतर करून ज्ञान हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीस सोपवले जायचे. शास्त्रीय आणि वैचारिक ज्ञाना व्यतिरिक्त प्रथा, परंपरा, लोक साहित्य, गाणी, कोडी, कूटप्रश्न, ओवी, म्हणी, अभंग, श्लोक असे ज्ञानाचे बहुविध लोक प्रकार हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने हस्तांतरित झालेले आहेत. त्यातही विशेषतः गोष्टींचा म्हणजेच बाल आणि कुमार कथांचा जो प्रकार आहे तो तर सर्रासपणे मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या हस्तांतरीत होत आलेला आहे.

आम्हा भारतीयांवर ऐतिहासिक दृष्ट्या एक आक्षेप घेतला जातो की ज्ञानपरंपरा आपण लिखित स्वरूपात कधीच जतन करून ठेवत नाहीत. परंतु मला वाटतं हे पूर्ण सत्य नाही. कारण निदान गोष्टींच्या बाबतीत तरी आपल्याकडे एवढे समृद्ध भांडार उपलब्ध होते आणि आहे आणि ते देखील लिखित स्वरूपात.

या लेखामध्ये आपण ज्याला भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा म्हणू शकतो अशाच एका गोष्टी रुपी संग्रहा बद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या लहानपणी अनेकांनी वेताळ पंचविशी, सिंहासन बत्तिशी, किंवा पंचतंत्र यासारख्या प्रेरक बोधक आणि मनोरंजक गोष्टी वाचलेल्या असतील. आपल्या बालपणाला समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टींपैकी आपण ऐकलेल्या बालकथा या देखील गोड आठवणींचा दरवळ निर्माण करणारा अमूल्य ठेवा आहे. या गोष्टी नेमक्या आल्या कुठून हे आपल्याला सांगता येणार नाही. म्हणूनच या गोष्टींचा उगम ज्यामुळे स्रोतांमधून झालेला आहे अशा बृहत्कथा नावाच्या ग्रंथाची किंवा कथा भांडाराची आपण आज ओळख करून घेउ.

आपल्यापैकी ज्यांनी शालेय शिक्षण घेताना संस्कृत विषय घेतलेला होता त्यांना ‘बृहतकथा मंजिरी’ (लेखक क्षेमेंद्र) किंवा ‘कथासरित्सागर’ (लेखक सोमदेव) हे नाव कदाचित माहीत असेल. या पुस्तकाविषयी नंतर एखाद्या लेखात माहिती देईल. या पुस्तकांमध्ये बाल आणि कुमार वयाच्या मुलांसाठी शेकडो कथा लिहिल्या गेलेल्या आहेत. ही पुस्तके जरी संस्कृत भाषेत लिहिलेली असली तरीही ही या पुस्तकांचे मूळ गुणढ्याच्या बृहत्कथा या ग्रंथात शोधता येते. (गुणाढय हे लेखकाचे नाव आहे)

बृहत्कथा हा ग्रंथ साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये लिहिण्यात आला. सातवाहन घराण्यातील हाल सातवाहन या राजाच्या कारकिर्दीमध्ये हे या ग्रंथाची ची निर्मिती ती करण्यात आली असे म्हणता येते. हा हाल सातवाहन राजा संस्कृत भाषेत प्रवीण होता. तरी देखील या हाल सातवाहनाने प्राकृत मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ लिहिला आहे. त्याचे नाव आहे ‘गाहा सतसई’ अथवा ‘गाथा सप्तशती’. या ही ग्रंथाबद्दल पुन्हा नंतर कधीतरी सविस्तर लिहीन. तर या गाथा सप्तशती या ग्रंथामध्येच बृहत कथेची जन्मकथा आणि त्यासाठी गुणाढ्याने घेतलेले अपरंपार कष्ट याचा उल्लेख आलेला आहे.

तर या कथेनुसार-

सम्राट हाल हे एक दिवस जलक्रीडा करत असताना त्याच्या मनात बरेच दिवसांपासून असलेले एक शल्य उफाळून आले. त्याने लगेचच प्रतिज्ञा केली की जोपर्यंत त्याला असक्खलीत संस्कृत बोलता येणार नाही तोपर्यंत तो आपल्या प्रजेला तोंड दाखवणार नाही. शेवटी राजाच तो. आणि बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट यापुढे कोणाचे काही चालत नसते हेच खरं.

राजाने प्रतिज्ञा तर केली परंतु राजसभे समोर मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिले. राजाला संस्कृत झटपट शिकवावी कशी? आणि राजाशिवाय राज्यशकट चालवावे कसे?

आता राजाला संस्कृत शिकवण्यासाठी अनेक मोठमोठ्या संस्कृत विद्वानांना आणि पंडितांना बोलावण्यात आले. या विद्वानांमध्ये गुणाढ्य देखील होता. संस्कृत विद्वानांनी सांगितले की राजाला संस्कृत शिकण्यासाठी सहा वर्षे तरी लागतील. परंतु एक विद्वान पुढे आला. त्याने दावा केला की तो राजाला सहा महिन्यांमध्ये संस्कृत भाषेत पारंगत बनवेल. संस्कृतचा प्रचंड जाणकार असलेल्या गुणाढयाला हे रुचले नाही. स्पष्टवक्ता असल्यामुळे त्याने दरबारात उघड-उघडआव्हान दिले. जर एखाद्याने राजाला सहा महिन्यांमध्ये सहा महिन्यांमध्ये संस्कृत शिकवले तर मी या भाषेत लिहिणे सोडून देईल.

राजाला केवळ लिहिता, वाचता आणि बोलता येण्या इतपत संस्कृत शिकायचे होते. झाले. राजाला संस्कृत शिकवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. आणि आश्चर्य बघा, राजा सहा महिन्यात संस्कृत बोलायला लागला. दाराबाराने देखील राजाचे कर्तृत्व मान्य केले.

आता खरी अडचण झाली ती गुणाढ्याची. दरबारात संस्कृत विद्वान म्हणून मान्यता असलेल्या पंडिताने त्या भाषेत लिहायचे नाही म्हणजे त्याचे सारे सार-सर्वस्व हिरावून घेतल्यासारखे होते. परंतु त्या काळाची माणसे शब्दाला जागणारी होती. गुणाढया ने दरबार सोडून जाऊ नये असे राजाला वाटत होते. परंतु गुणाढय थांबला नाही. आता तो राजधानी सोडून दूर जंगलामध्ये पिशाच लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन राहू लागला. त्याने बोलणे देखील बंद केले. मौन व्रत धारण केले.

त्या वस्तीमध्ये त्याला दोन शिष्य मिळाले. तिथेच एक गंधर्व देखील राहायचा. या गंधर्वाला हजारो गोष्टी माहिती होत्या. या गंधर्वाच्या तोंडून गुणाढ्याने या सर्व गोष्टी ऐकल्या. आणि त्यानंतर त्याने या गोष्टी लिहून ठेवल्या. वचनानुसार संस्कृत मध्ये लिहिणे तर शक्य नव्हते त्यामुळे त्याने या सर्व गोष्टी पैशाची भाषेत लिहिल्या. आता जंगलामध्ये पिशाच लोकांच्या वस्तीमध्ये त्याला लेखन सामग्री काही मिळाली नाही. त्यावर उपाय म्हणून त्याने जनावरांचे चर्म याचा कागद म्हणून उपयोग केला आणि जनावरांचे रक्त शाई म्हणून वापरली. वर्षामागुन वर्षे गेली. या कथांचे सात मोठे-मोठे खंड तयार झाले.

या कथांचा जंगलांमध्ये काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे त्याने हे खंड हाल राजाकडे पाठवण्याचे ठरवले.

हे सर्व खंड घेऊन तो शिष्यांसमावेत तो राजधानीकडे चालता झाला. शिष्यांना दरबारामध्ये पाठवून तो राजधानीच्या बाहेर उपवनात थांबला. इकडे शिष्यांनी राजदरबारात बृहातकथेचे खंड सादर केले. परंतु चर्म आणि रक्त यांच्या साह्याने लिहिलेले ते खंड बघून राजाला घृणा उत्पन्न झाली. राजाने त्या ग्रंथाकडे बघितले तर नाहीच. परंतु शिष्यांकडे ग्रंथाच्या लेखका संबंधी चौकशी करायला सुरुवात केली. शिष्यांनी सांगितले की या ग्रंथाचे लेखक आणि आमचे गुरु कायम मौन असतात. मत्त प्रवृत्तीचे आहेत.

एक तर रक्त आणि चामड्या च्या साह्याने केलेले लिखाण. ते देखील पैशाची भाषेत. त्यातही लेखक जंगलात राहणारा. मत्त प्रवृत्तीचा. आणि सदैव मौन राहणारा. अशा साहित्यात काय सौंदर्य असणार? असा विचार करून राजाने ग्रंथ न बघताच परत पाठवला.

 शिष्यांनी परत येऊन सर्व वृत्तांत  गुणाढयाला कथन केला. त्याला फार मोठा आघात बसला. त्याने हे सर्व लिखाण जाळून टाकायचे ठरवले.  जवळच्या लोकांनी सल्ला दिला. तू स्वतः राजा समोर जाऊन या कथा वर्णन कर. परंतु वचनाचा पक्का असणाऱ्या गुणाढ्याने यास नकार दिला. ग्रंथ अग्नीला समर्पित करण्याची सर्व तयारी झाली.  अग्नी पेटवण्यात आला. शिष्यांनी विनंती केली की या कथांना अग्नी देण्यापूर्वी आम्हाला शेवटचे एकदा ऐकवा. गुरूंनी विनंती मान्य केली. अग्नि समोर गुरु आणि शिष्य बसले. गुरु एक कथा सांगायचा. नंतर ते चर्म पत्र अग्नीला समर्पित करायचे. 

 दंतकथा आपल्याला असं सांगते की, या कथा इतक्या सुंदर होत्या की त्यां ऐकण्यासाठी पशुपक्षी प्राणी देखील जमा होऊ लागले. प्राणी तहानभूक विसरले. आपसातील वैरभाव विसरले. अग्निमंडला भोवती जमा होऊन एकाग्रचित्ताने कथा ऐकू लागले.  महिन्यात मागून महिने जाऊ लागले. सर्व पशु पक्षी एका ठिकाणी स्तब्ध थांबल्यामुळे कृश झाले. अशक्त बनले. अंगावरती मांस राहिले नाही. इकडे राजाच्या पाक घरामध्ये जे मांस तयार होऊ लागले त्याला चव राहिली नाही. सुकलेल्या मांसाचे जेवण खाल्ल्यामुळे राजाचे पोट बिघडले. वैद्यांना पाचारण केले. वैद्यांनी निदान केले. मांस खराब आहे. त्यानंतर शिकाऱ्यांना बोलावण्यात आले.  त्यांनी या अघोरी कथाकाराची गोष्ट राजाच्या कानावर घातली. राजाला विश्वास बसला नाही. 

स्वतःच्या डोळ्याने बघावे म्हणून त्याने जंगलाकडे कूच केले. पशुपक्षी प्राणी यांच्या घरट्यामध्ये चाललेला कथाकथनाचा तो दिव्य सोहळा बघुन राजा अवाक झाला. त्याने या अघोरी ला  कथा न जाळण्याची विनंती केली. परंतु तोपर्यंत  सहा खंड अग्नीत जाळून भस्मसात झाले होते. एवढा अमूल्य ठेवा नष्ट झाला याचे त्याला दुःख झाले. अघोरी च्या रूपात गुणाढयाला बघून त्याला वाईट वाटले. 

राजा विनंतीवरून जो सातवा खंड वाचला तोच आज कथासरित्सागर, बृहत्कथामंजिरी आणि इतर कथामालांच्या रूपाने आपल्यासमोर उपलब्ध आहे.


शेअर करा

1 thought on “कथेची कथा अर्थात गुणाढ्याची बृहत् कथा Gunadhya’s Brihatkatha”

  1. Khup khup abhar, vastvik hya saglyanvishayi atchya pidhila thodihi mahiti nahi, manje khar sangaycha tar mala hya lekhamadhil javlpas saglich mahiti yapurvi kadihi navti, ha avdha Sundar lekh lihun tumhi vachkancha manat avad nirman karat ahat vachnavishayi Ani aplya pidhyan pidhya chalat alelya goshtinvishayi jya ki ata javalpas lop pavat challya ahet.. amhala asshich navnavin mahiti tumcha kadun milali tar amhi sarvach tumche abharri rahu , ek prakare Tumi aplya changlya paramparechi sanvardhan karat ahat samajaparyant pohchvun. Khup Chan lekh ahe

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: