
महाराष्ट्रात ज्याला नाट्यसंगीत आवडते अशा जवळपास प्रत्येक माणसाला ‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांचे नाव माहिती आहे, पण थोडक्याच लोकांना ते ‘केशवराव भोसले’ कसे बनले याची माहिती आहे. हा किस्सा आहे केशवराव भोसले यांच्या संगीत नाटक (म्युझिकल थिएटर) क्षेत्रातील पदार्पणाचा. वयाच्या केवळ बाराव्या वर्षी आपल्या प्रतिभेच्या आणि कलेच्या जोरावर आणीबाणी सदृश्य परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी न केवळ ‘शारदा’ नाटक वाचवले तर आपल्या दमदार पदार्पणाने आणि नंतर आपल्या गायकीने आणि कर्तृत्वाने संगीत रंगभूमीस एक नवा आयाम दिला.
मराठी नाट्य परंपरे मध्ये संगीत नाटकांचा एक दैदीप्यमान कालखंड होऊन गेला. नाटक आणि त्यामध्ये मधून मधून गाणी असा या नाटकांचा थाट असे. आजकालाच्या भारतीय चित्रपटांसारखे. पण यातील गाणी ही शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीतावर आधारित असायची. वेगवेगळे, राग, तराने, पदे, यांचा सुरेख वापर यात असायचा. लोकांनाही ते जाम आवडायचे.
या नाटकांचा विषय हा पौराणिक, ऐतिहासिक गोष्टींवर बेतलेला असे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता हा. त्यामुळे सामाजिक आणि सुधारणावादी विषयांवर देखील संगीत नाटके बनू लागली. गोविंद बल्लाळ देवलांचे ‘संगीत शारदा’ नाटकही असेच लोकप्रिय नाटक होते. नाटकाचा विषय होता बालविवाह किंवा जरठ कुमारी विवाह. भुजंगनाथ या वृद्धाबरोबर शारदा या कुमारवयीन मुलीचा विवाह आणि त्यामागचे षडयंत्र असा विषय घेऊन हे नाटक देवलांनी लिहिले. या नाटकामध्ये जवळपास ५० पदे (गाणी) होती. एकूणच गायनाला आणि गायकांना या नाटकात भरपूर पैस होता. हे नाटक इतके लोकप्रिय झाले की जेव्हा हरीबिलास सारडा यांनी प्रस्तावित केलेला बालविवाह प्रतिबंध कायदा, (१९२९ मध्ये कायदा संमत झाला) ज्याला “सारडा कायदा” म्हणत असत, त्याला ‘‘शारदा कायदा’’ असे नाव पडले.
काळ होता साधारण सन १९०२ किंवा १९०३ चा. केशव जेमतेम १२ वर्षाचा होता. तो ज्या नाटक मंडळींसाठी काम करत होता तिचे नाव होते स्वदेशहितचिंतक नाटक मंडळी. केशव तेंव्हा नाटकात वल्लरीची भूमिका करायचा. ‘संगीत शारदा’ घेऊन कंपनी बर्शीस आली होती. कृष्णा देवळी, (जो शारदेची मुख्य भूमिका करायचा) तापाने नुसता फणफणत होता. इतका की तो बिछान्यातून उठायचे त्राण शिल्लक राहिले नव्हते. थिएटर कंपनीने शनिवारी संगीत शारदा’ चा खेळ ठेवला होता. या अवघड पेचामुळे तालीम घेणारे जानुभाऊ निमकर आणि रावजी म्हैसकर (नाटक कंपनी व्यवस्थापक) यांची द्विधा मनस्थिती झाली. मुख्य गायक नट कृष्णाच्या काळजीने त्यांनी शनिवारच्या खेळाचा विचार बाजूला ठेवला. जानुभाऊ आणि म्हैसकर दोघांनाही चिंता वाटत होती.
इकडे आपण आजारी असल्यामुळे खेळ होत नाही या भावनेने कृष्णाने हट्ट धरला की शनिवारी नाटकाचा खेळही होईल आणि शारदेचे पात्र तोच करेल, पण डॉक्टरांनी साफ मनाई केली. म्हणाले, “तो थोडावेळ जरी उभा राहिला तर त्याच्या जीवावर बेतेल!”
कंपनीत गंभीर कळा पसरली. यावेळी, योगायोगाने शाहू छत्रपती महाराज बर्शीत आलेले होते. नाटक कंपनी बार्शीत असल्याचे कळताच त्यांनी निरोप पाठवला. जनुभाऊ आणि म्हैसकर महाराजांकडे आले. जुजबी बोलणे झाल्यावर, महाराजांनी विचारले, “म्हैसकर, शनिवारी कोणता खेळ ठेवला आहे?” महाराज नाटकांचे रसिक, दर्दी चाहते होते.
“संगीत शारदा करायचे योजले आहे महाराज. पण आमची शारदा म्हणजे आमचा कृष्णा खूप आजारी आहे. आम्हाला मोठी चिंता पडली आहे महाराज.”
“अरे, असे असेल तर मग खेळ बंद ठेवा.” महाराज म्हणाले.
महाराजांनीच असे म्हटल्याने जनुभाऊ आणि म्हैस्करांवरचे दडपण दूर झाले. कंपनीत परत आल्यावर कुठून जाणे म्हैसकरांना काय सुचले. म्हणाले, “आपल्या केशव ला करता येईल का शारदा. म्हणजे बघायचा का तसा प्रयत्न करून?”
“काय म्हणता? केशव आणि शारदेचा पार्ट? कुठे आहे तो? आणा बोलावून त्याला. बघुयात जमतय का?”
केशव बोलावणे गेले. तसा तो जनुभाऊंकडे आला. काय रे तुला कोणाकोणाचे संवाद आणि पदे पाठ आहेत? शारदेचे संवाद आणि पदे पाठ आहेत का?”
“पहा तर खरं. मी सगळ्यांची नक्कल पाठ म्हणू शकतो. चुकलो तर थोबाडीत हाणा,” केशव उत्तरला. त्याची धारणा आणि स्मरणशक्ती जबरदस्त होती. याच गुणांच्या जोरावर तो प्रॉंप्टर म्हणून अत्यंत उपयोगी पडायचा.
गुरुवारचा दिवस होता आणि खेळ होता शनिवारी. जनुभाऊंनी जोरात तालीम सुरू केली. सर्वांच्या अंगात उत्साह संचारला. केशवची तयारी आणि हिम्मत बघून जनुभाऊ म्हणाले “यादीत नाव घाला रे, शारदा: केशव भोसले!”
तयारी करून हिम्मत आल्यावर म्हैसकर आणि जनुभाऊंनी खेळ करायचे ठरविले. महाराज अजूनही बार्शीतच होते. जनुभाऊ , म्हैसकर आदी मुख्य मंडळी पुन्हा शाहू महाराजांकडे गेली. निमंत्रण द्यायला. उत्साहाने निमंत्रण दिले. “महाराज, शनिवारी खेळ होणार आहे. आपण आवर्जून यावे.”
“अरे तुमची ती शारदा ठीक झाली का?” महाराजांनी विचारले.
“नाही महाराज.”
“मग कोण नवी शारदा गवसली तुम्हाला?”
“आमच्याच कंपनीतील केशव नावाचा पोर आहे महाराज. बघू या पोरगा काय करतो ते!”
शनिवार उजाडला. रात्री दहाला खेळ सुरू झाला. पडदा उचलला गेला. नाचणाऱ्या वल्लरीच्या ऐवजी, शांत आणि संयमी शारदेच्या रुपात केशवचे स्टेजवर आगमन झाले. केशवचा प्रवेश एवढी प्रभावशाली होती की ते टाळ्यांच्या कडकडाट झाला. नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. प्रत्येकाने जीव ओतून काम केले. केशवने गायलेल्या प्रत्येक गाण्यासाठी ‘वन्स मोअर’’ आला. विशेषतः ‘मूर्तिमंत भीती उभी’ या हे पद तर इतके रंगले की त्याला सलग, सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला.
परंतु, यामुळे बारा वर्षाचा केशव थकून गेला. मुख्य भूमिकेत पहिलीच वेळ आणि इतके गायन. थकवा अपरिहार्य होता. शेवटी व्यवस्थापक म्हैसकर स्टेजवर आले आणि त्यांनी केशवच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करावा अशी सर्वांना विनंती केली.
“आणखी एकदाच रे, म्हैसकर!” शाहू महाराज त्यांच्या आसनावरून ओरडले. केशव गायला. महाराज आणि सभागृह मंत्रमुग्ध झाले.
नाटक संपले! जनुभाऊच्या डोळ्यांत अश्रू चमकले. गदगद स्वरात म्हणाले, “केशाने आज कंपनीचे नाव राखले!”