वारकरी संप्रदायात संत तुकारामांसोबत अजून एक व्यक्तीची खूप प्रसिद्ध आहे त्या म्हणजे संत तुकाराम यांच्या पत्नी जिजाऊ किंवा अवली. वारकरी संप्रदायात आणि संप्रदायाबाहेर असा गैरसमज झालेला आहे की संत तुकाराम म्हणजे अध्यात्मक पूर्णपणे बुडालेले तर जिजाऊ संसार आणि प्रपंचात पूर्णपणे बुडालेल्या. जिजाऊ या अतिशय कर्कश आणि संसाराची ओढ असलेल्या व्यक्ती होत्या आणि त्यामुळेच संत तुकारामांना संसाराचा उबग येऊन ते अध्यात्माकडे वळले अशी देखील काही व्यक्तींची धारणा आहे. ‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.
संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात. वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते.
परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का? जिजाऊंची थोरवी काय होती हे आम्हाला तुम्हाला कळणार नाही परंतु जी गोष्ट सामान्य व्यक्ती बघू शकत नाही ती गोष्ट कवी वेगवेगळ्या दृष्टी असल्यामुळे बघतो. जिजाऊंची अशीच थोरवी बा. भ. बोरकरांनी आपल्या ‘वीट’ या कवितेत गायली आहे. ही कविता वाचल्यानंतर मुक्तीला नाकारणाऱ्या जिजाऊंची थोरवी आपल्याला खरोखरच पटू लागते. संत तुकारामांच्या परमार्थिक श्रेष्ठतेमध्ये त्यांच्या भक्ती इतकाच अवलीचा देखील वाटा आहे हे जाणवते.
तुक्याच्या पायीची व्हाया जिनें वीट केली पायपीट चौ-यांशीची; तयाचा संसार करावया गोड हातापायां फोड येऊं दिले; पोचवाया त्याच्या भुकेला भाकर काटयांचे डोंगर पालाणिले; न चुकावी त्याची पंढरीची वारी म्हणून वासरी नोलांडिली; लावुनिया फाळी वाढिलीं मावंदी : तुष्टविली मांदी वैष्णवांची; मांडिला त्यासाठीं देवाशींही दावा, वेळीं त्याची आवा उद्धरिली; आपटिलीं पोरें, आदळिला माथा, परी त्याचा गाथा सांभाळिला; सार्थक होऊन तुक्याच्या जन्माचें विमान देवाचें आलें दारीं; असून गर्भार पांचां महिन्यांची गाभण म्हशीची आई व्हाया आलिये मुक्तीला लाविलें माघारी : तुक्याहुनी थोरी जिजाऊची. डोळ्यांपुढें आहे ताजा तो प्रसंग रडे पांडुरंग ढसाढसा.
पणजी, १३-९-६६
बा भ बोरकर