मुलांच्या लाडक्या
चिऊताई चिवटे
आढयाशी बांधतात
पिसांचे घरटे.
काकोबा कावळे
झाडावर बसतात
टकमक टकमक
चहूकडे बघतात.
मनाने भाबडे
रंगाने तांबडे
जागे व्हा म्हणतात
लालाजी कोंबडे.
कोकिळा मावशी
आंब्यावर लपतात
स्वरांची झालर
वाऱ्यावर विणतात.
जांबावर थांबतात
राघूराव बोलते
सकाळची न्याहरी
फळावर चालते.
पिसारा फुलवून
मोरोबा नाचतात
पक्ष्यांचा राजा मी
सर्वांना सांगतात.
-कुसुमाग्रज
