एका माकडाने
काढले दुकान;
आली गिऱ्हाईके
छान, छान !
मनीने आणले
पैसे नवे,
म्हणाली, "शेटजी,
उंदीर हवे."
गरूड म्हणाला
घेऊन झाप,
"दोन रूपयांचे
काढा साप."
अस्वल आले
नाचवीत पाय,
म्हणाले, "मधाचा
भाव काय?"
कोल्ह्याने मागितला
गुळाचा रवा;
आणि म्हणाला,
"मांडून ठेवा!"
माकड म्हणाले
लावून गंध,
"आता झाले
दुकान बंद."
- विंदा करंदीकर
