
जवळपास 16 वर्षांपूर्वी, 2009 साली मार्च-एप्रिल महिन्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या समवेत लोकसभा निवडणुकांच्या काळात स्टार माझा ( सध्याचे ABP माझा ) वृत्तवाहिनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून ” एक दिवस, एक नेता ” कार्यक्रम करण्याची संधी संपादक राजीव खांडेकर सर यांनी दिली होती…माझे वरिष्ठ सहकारी निलेश खरे सर यांनी यावेळी काही महत्वाच्या नेत्यांसोबत तू कार्यक्रम कर, भरपूर शिकायला मिळेल – अनुभव येईल असे सांगत तुझ्या आवडत्या स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत तू कार्यक्रम कर असे सांगितले…
आदरणीय स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या झंझावाती प्रचारसभा त्यावेळी मी अनुभवल्या… खरं तर मुख्यमंत्री म्हणून 2009 साली निवडणुकांना सामोर जाण्याची प्रचंड त्यांची प्रचंड इच्छा होती…पण नियतीला ते मान्य नव्हते…26/11च्या हल्ल्यानंतर ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले होते..परंतु तरीही विदर्भ, मराठवाडा सहित संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये तूफानी प्रचार सभा घेत होते…काँग्रेस पक्षासाठी सतत…अविरत आणि अविश्रांत…झटत होते…एका दिवसात जवळपास 6 ते 7 प्रचारसभा घेत होते…घसा बसलेला असताना स्व.विलासराव वारंवार कंठ सुधारक वटी खात भाषणं देत होते…
आमचे चार्टेड फ्लाइट नागपुर मधून टेक ऑफ करण्याच्या अगोदर..साहेबांना एक फोन आला…बहुतेक समोरच्या व्यक्तीला साहेबांचा आवाज नीट ऐकू जात नसावा…तेव्हा साहेब पुन्हा म्हणाले..बोला, बोला…” मी विलास देशमुखच बोलतोय”…मला थोडेसे विचित्र वाटत होते…*कारण जेव्हापासून राजकारण समजू लागले तेव्हापासून कायम “विलासराव देशमुख “असेच नाव एकत आलो होतो…न राहवून मी साहेबाना विचारले साहेब “आपण फोनवर स्वतःला संबोधित करताना विलास देशमुख असे म्हणालात…ऐकायला थोड़े विचित्र वाटले…कारण आम्ही आजपर्यंत फ़क्त विलासराव देशमुख असेच एकत लहानाचे मोठे झालो..”
त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते…
“मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो…तो दुसऱ्यांनी द्यायला हवा…आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा…”
आज गल्ली तले “राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार ” ही विशेषण लावणारे पुढारी कुठे….आणि विलासराव साहेब कुठे…??
अजुन एक गोष्ट त्यांनी मला प्रवासात सांगितली….साहेब नेहमी म्हणायचे….आयुष्यात दोन गोष्टी खुप महत्वाच्या….
” श्रद्धा “आणि ” श्रबुरी”….ही शिर्डीच्या साईं बाबांची शिकवण….जीवनात संयम खुप महत्वचा….पराभावाने खचून जावू नका…आणि विजयाने उन्माद येवू देवू नका…
( स्व.देशमुख साहेब “सबुरी”च्या ऐवजी “श्रबुरी” म्हणायचे )


