आपण सर्वांनी 2001 साली ‘गदर – एक प्रेम कथा‘ नावाचा चित्रपट पाहिला असेल. अनेक वेळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी आली की देशभक्तिपर चित्रपट म्हणून अनेक वाहिन्यांवर (चॅनल्स वर) तो दाखवण्यात येतो. त्यामध्ये सनी देओल यांनी केलेली तारासिंग या ट्रक ड्रायव्हरची भूमिका खूप गाजली. “हिंदुस्थान जिंदाबाद” म्हणत हँडपंप उखाडणारा सनी देओल सर्वांना जाम भावला होता. पाकिस्तानी लोकांची ठासून आपल्या बायका-पोरांना भारतात घेऊन येणाऱ्या तारा सिंग चे सगळ्यांनाच कौतुक वाटले. चित्रपट देखील तूफान चालला. यामध्ये तारा सिंग च्या पत्नीची, सकीना नावाच्या मुलीची भूमिका केली होती अमिषा पटेल हिने. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की ही केवळ चित्रपटाची स्टोरी नाही तर खरोखर वास्तवात घडलेली घटना होती.
खरी स्टोरी अशी आहे की इसवी सन 1947 ला फाळणी झाली.. त्यावेळेस हजारो कुटुंबं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये विस्थापित झाली किंवा दंगलीमध्ये बळी पडली. फाळणीच्या या अंदाधुंदी मध्ये झैनाब नावाची पूर्व पाकिस्तान मधील जालंदर जिल्ह्यामधील एक मुलगी भारतात अडकते. दंगलीमध्ये तिचा जीव जाणार होता. परंतु बुटा सिंग नावाचा सरदार तिला बघतो आणि तिचा जीव वाचवतो. तिला आपल्या घरी घेऊन येतो. पुढे दोघांमध्ये प्रेम बहरते. बुटा सिंग झैनाबशी लग्न देखील करतो. त्यांना दोन मुली होतात. परंतु हे प्रेम जणू नियतीला मान्य नव्हते.

फाळणी झाल्यानंतर कालांतराने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सरकारमध्ये असा करार होतो की फाळणीच्या दरम्यान विरोधी देशातील ज्या स्त्रिया एकमेकांनी ताब्यात ठेवल्या आहेत किंवा पळवल्या आहेत त्यांना परत करण्यात यावे. अधिकाऱ्यांना भारतामध्ये राहत असणाऱ्या झैनाब ची कुणकुण लागते. बुटा सिंगच्या संपत्तीवर डोळा असणाऱ्या नातेवाईकांनीच ही माहिती शासकीय अधिकाऱ्यांना दिली असे देखील काही स्त्रोत आपल्याला सांगतात. झैनाब ची रवानगी कॅम्प मध्ये करण्यात येते. काही दिवस कॅम्प मध्ये ठेवल्यानंतर झैनाब ची रवानगी लाहोरला, पाकिस्तान मध्ये तिच्या नातेवाईकांकडे करण्यात येते. दोन मुलीं पैकी एक मुलगी आई सोबत पाकिस्तानात जाते तर एक मुलगी मागे पित्याजवळ बुटासिंग कडेच ठेवण्याकडे ठेवण्यात येते. मी परत येईन अशा आणा भाका होतात. परंतु झैनाब परत येत नाही.
झैनाब परत येत नाही हे बघून बुटासिंग हवाल दिल होतो. तो धर्मांतर करतो. मुस्लिम बनतो आणि अवैध मार्गाने पाकिस्तान मध्ये घुसतो. माहिती काढत काढत तो लाहोर जवळच्या नूरपूर या झैनाब च्या गावी पोहोचतो. इथे त्याला झैनाब चा सुगावा तर लागतो परंतु झैनाब चे कुटुंबीय त्याला मारहाण करतात आणि त्याच्याविरुद्ध अवैधरित्या पाकिस्तान घुसला म्हणून खटला देखील दाखल करतात.
काही पुस्तकात आपल्याला अशी माहिती मिळते की पाकिस्तानातील झैनाबचे नातेवाईक तिचा विवाह तिच्या चुलत भावाशी करून देतात. झैनाब चे नातेवाईक तिच्यावर खूप प्रचंड दबाव आणतात.. तिला धमक्याही दिल्या जातात. बुटासिंगला देखील जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.. परंतु बुटासिंग खऱ्या प्रेमासाठी खंबीरपणे उभा ठाकतो. अजिबात माघार घेत नाही. जेव्हा हा खटला लाहोरच्या उच्च न्यायालयात सुनावणीसाठी येतो तेव्हा झैनाबला सुनावणीसाठी कोर्टात उभे करण्यात येते. तिला विचारण्यात येते की तुला बुटासिंग सोबत परत भारतात जाण्याची इच्छा आहे काय? परंतु तिच्यावर घरच्यांचा प्रचंड दबाव असतो. कौटुंबिक, धार्मिकआणि राजकीय दबावापोटी ती या गोष्टीसाठी नकार देते. बुटा सिंग सोबत आणलेल्या आपल्या पोटच्या मुलीला स्वीकारण्यासाठी देखील ती नकार देते.
परंतु या सर्वांमुळे बुटासिंग मात्र उध्वस्त होतो. मनातून तो हादरून जातो. पाकिस्तानामधील शहादरा स्टेशन जवळ 19 फेब्रुवारी 1957 ला तो रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या करतो. आपली समाधी झैनाबच्याच गावी उभारण्यात यावी अशी इच्छा तो एक चिठ्ठी लिहून व्यक्त करतो.. परंतु झैनाबचे नातेवाईक आणि तेथील गावकरी ही देखील इच्छा पूर्ण होऊ देत नाही. त्याची कबर शहादरा जवळच मियासाहेब कब्रस्तानात उभारण्यात येते. या प्रेम कथेला हळूहळू प्रसिद्धी मिळू लागते आणि हे त्याचे समाधी स्थळ प्रेमिकांचे श्रद्धास्थान बनायला सुरुवात होते. बुटा सिंगला देखील शहीद ए मोहब्बत (Martyr of Love) अशी पदवी देण्यात येते.
प्रेमात पडलेले अनेक नवतरुण जोडपी या ठिकाणी आपल्या प्रेमा वर विश्वास व्यक्त करण्यासाठी आणि बुटा सिंगला श्रद्धांजली देण्यासाठी जमू लागतात. पाकिस्तानातील काही धर्मांध लोकांना ही प्रेम कहानी मंजूर नसते.. यामध्ये देशाची बदनामी होते असे त्यांना वाटते.. असे लोक या बुटा सिंगच्या प्रेम कहाणीचा लवलेश देखील इथे राहू नये म्हणून त्याची समाधी उघडून टाकतात. प्रेमावर नितांत श्रद्धा असणारी पाकिस्तानातील तरुण मंडळी तिथेच बाजूला पुन्हा त्याची समाधी प्रस्थापित करतात. आजही पाकिस्तान मध्ये ही समाधी अस्तित्वात आहे. इथे अनेक प्रियकर प्रेयसी या समाधी जवळ श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आपल्या प्रेमाला दृढ करण्यासाठी येतात.
झैनाब चे पुढे काय होते? ती आपल्या गावीच राहते. अगदी अलीकडे काळापर्यंत ती जिवंत होती. तिला भेटण्याचा प्रयत्न अनेक पत्रकारांनी केला परंतु तेथील कुटुंबीयांचा आणि गावकऱ्यांचा या गोष्टीला तीव्र विरोध असल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली नाही.
ही प्रेम कहाणी इतकी उत्कट आणि हृदय द्रावक आहे की या प्रेम कहानी वर अनेक पुस्तकं लिहिल्या गेली. अनेक चित्रपट देखील बनले. ज्या गदर चित्रपटाबद्दल आपण बोलतोय तो चित्रपट या कहाणीवरच घेतलेला आहे परंतु मुळ वास्तवात अनेक फेरफार करण्यात आलेले आहे. शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांची भूमिका असलेला वीर-झारा चित्रपट देखील याच कथेवर बेतलेला आहे. पंजाबी भाषेत बनलेला शहीद ए मोहब्बत बुटा सिंग नावाचा चित्रपट देखील याच कथेवर बनलेला आहे यामध्ये प्रख्यात पंजाबी गायक गुरदास मान याने बुटासिंग ची भूमिका केली आहे तर दिव्या दत्ता हिने झैनाबची भूमिका केली आहे.
अशा मध्येच गदर या चित्रपटाचा दुसरा भाग घेतोय म्हणून ही कथा आठवली.. आणि तुम्हाला सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच केला.