Khallakada waralakada खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?

मी लहान असताना आमच्या आजोबांसोबत शेतात जायचो. सर्व शेतं हारीने (ओळीने) मांडून ठेवल्यासारखी दिसत. आपल्या शेतात जायचा रस्ता कुठला? या अनेक शेतांपैकी आपली शेती कुठली? हे नेमकच कळायला लागलं होतं. शेतांची नावं लक्षात यायला लागली होती. असं ते कोवळं वय. ‘चोपण‘ (चोपणट जमीन असलेलं) म्हणजे कुठलं शेत? ‘इनामाचं शेत’ कुठलं? ‘न्हावड्याचा मळा’ कुठला? ‘म्हळईचं रान’ कोणतं? हे सगळं समजायला लागलं. नंतर थोडा मोठा झाल्यावर, म्हणजे चौथी, पाचवीत असेल, तेंव्हापासून कधी कधी एकटा देखील शेतात जायला लागलो. म्हणजे कुणी असं हटकले नाही की- “एकटा कुठे भटकतोय इकडे?” एकटा हिंडण्याएवढा मोठा मी आता झालो होतो. राना-वनात, घरच्या कुणाला न सांगता, एकटा किंवा सवंगडयासोबत भटकायला जाण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे ते वय. घरचे देखील कामानिमित्त कधीकधी शेतात पाठवत.

असाच एकदा एकटा शेतात गेलो आणि आमच्या गड्याला, पांडू भाऊंना विचारले की “बाबा कुठे आहेत” बाबा म्हणजे आमचे आजोबा. तेव्हा त्याने उत्तर दिलं की “ते तिकडे खाल्ला कडं आहेत.”

‘खाल्लाकडे’ हा शब्द तसा लहानपणी ऐकलेला, कानावरून गेलेला होता. पण तेव्हा त्या शब्दाने एवढे लक्ष वेधले नव्हते. त्या दिवशी मी तो शब्द पुन्हा पांडुभाऊंच्या तोंडी ऐकला तेंव्हा प्रश्न पडला. खाल्लाकडे म्हणजे कुणीकडे? जेव्हा पांडू भाऊंना विचारलं की “पांडूभाऊ, खाल्ला कडं म्हणजे कुणीकडे?” तेव्हा तो माझ्याकडे बघून मंद मंद हसायला लागला. त्यामुळे मी अजूनच बुचकळ्यात पडलो.

नंतर त्याने हाता च्या साह्याने दिशा दाखवून मला माझ्या बाबांचे ठिकाण सांगितले. मग मी त्या दिशेने चालत बाबां पर्यंत पोहोचलो. पण तरी देखील डोक्यात ‘खाल्लाकडं’ चा गोंधळ चालूच होता. बाबांकडे जाऊन पोचलो. ज्या कामासाठी मी शेतात आलो होतो ते त्यांना सांगितले. मग माझ्या डोक्यात वळवळत असलेला किडा शांत करण्यासाठी मी त्यांना प्रश्न विचारला. म्हणालो “बाबा, खाल्लाकडं म्हणजे काय हो? आता या वयापर्यंत मला पूर्व-पश्चिम आदी दिशा कुठल्या याचे ज्ञान झाले होते. माझा प्रश्न ऐकल्यावर बाबा देखील थोडेसे हसले. का? ते तेंव्हा मला कळाले नाही. मग त्यांनी मला जवळ बसवून घेतले. आणि मला समजावून सांगितले. खाल्लाकडं म्हणजे पूर्व दिशेला. आणि वरला कडं म्हणजे पश्चिम दिशेला. खाल्ला कडचा शुद्ध मराठी प्रतिशब्द म्हणजे – खालच्या बाजूस, खालच्या कडेस. आणि वरला कडं ला शुद्ध मराठी प्रतिशब्द म्हणजे – वरच्या बाजूला, वरच्या कडेस. माझ्यासाठी हा साक्षात्कार नवीन होता. नंतर पुढे, जेव्हा कधी, कुणी, दिशा सांगतांना खाल्लाकडं किंवा वरलाकडं असं सांगितलं म्हणजे मी गोंधळून जात नसे.

तुम्ही म्हणाल’ की आज हे असे, अचानक, या शब्दा बाबतचे गुऱ्हाळ का बरं सुरू झालय? याला कारण आहे. हे शब्द किती प्राचीन होते याचा शोध मला आज लागला. तुम्ही थोडा अंदाज लावा की, हा शब्द किती जुना असू शकेल? म्हणजे थोडीशी तुम्हाला hint देतो.

म्हणजे असं की आज आपण जी मराठी भाषा वापरतो, ती साधारणतः या सहस्रकाच्या (मिलेनियम) सुरुवातीस वापरात होती. आता मराठी भाषेचा उगमाचा पहिला लिखित पुरावाच दहाव्या किंवा फार मागे नेला तर नवव्या शतकातील आहे. तर थोडा अंदाज करा की खाल्लाकडे किंवा वरलाकडे हे शब्द जास्तीत जास्त किती जुना असेल? मला जेव्हा याचा शोध लागला तेव्हा मला देखील आश्चर्य वाटले. पण त्याहीपेक्षा काहीतरी गवसल्याचा आनंद झाला. आणि जे गवसले आहे, त्याची परंपरा इतकी जुनी आहे- हे कळण्याचा आनंद त्याहून जास्त होतो. हो की नाही?

महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे चरित्र आहे. त्याचे नाव ‘लीळाचरित्र‘. लीळा म्हणजेच त्यांचे जीवन प्रसंग आणि आठवणी. त्या ज्या ग्रंथामध्ये चित्रित केलेल्या आहेत ते ‘लीळाचरित्र’. तुम्हाला आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेतील सर्वात पहिला, सर्वात जुना चरित्र ग्रंथ आहे.आणि याची रचना इसवी सन 1278 च्या सुमारास करण्यात आली आहे. या लीळाचरित्रातील एक लीळा (प्रसंग/आठवण) आहे. या लिळेत खाल्लाकडे आणि वरलाकडे हे शब्द आलेले आहेत. ही लीळा म्हणजे एका वऱ्हाडसोबत श्री चक्रधरांना जेऊ घालतात असा प्रसंग आहे. त्यातील वाक्य खालीलप्रमाणे आहे-

(गोसावीयासि) मांडवी वरिलीकडे बैसो घातलें : खालिलीकडे व-हाडी बैसले :
गोसावीया मर्दना दीधली : एराची आंगे उटीली:
वरिलीकडे ताट गोसावीयासि केलें : खालिलीकडे ठाए एरासी केले :
गोसावीयासि आरोगण जाली : वीडा वोगळवीला : एरां तांबुळे दीधली :

याचा अर्थ –

गोसावींना म्हणजे श्रीचक्रधरांना वरलाकडे बसवले. आणि वऱ्हाडाला खाल्लाकडे बसवले. श्री चक्रधरांचे हातपाय धुतले, तसे वऱ्हाडी मंडळींचे देखील धुतले. पश्चिमेकडील बाजूस श्री चक्रधारांसाठी ताट केले. पूर्वेकडील बाजूस इतरांसाठी पाने मांडली. श्रीचक्रधरांचे भोजन झाले. त्यांना विडा अर्पण करण्यात आला. इतरांना तांबूल देण्यात आले.

आहे की नाही मजेची गोष्ट? म्हणजे बघा आमचा गडी, पांडूभाऊ वापरत असलेला हा शब्द देवगिरीच्या यादवांच्या काळापासून वापरत आहे. म्हणजे साधारण इसवी सन १२७८ पासून तरी निदान लिखित वापरत आहेच. म्हणजेच हा शब्द यापूर्वीदेखील बोली मराठी मध्ये प्रचलित असणार. म्हणजे तशी शक्यता तरी आहे. जर योगायोगाने परत या शब्दाच्या वापराचा, यापेक्षा जुना संदर्भ सापडला तर तुम्हाला नक्कीच सांगेन. कारण अशी अनपेक्षित गोष्ट हाती लागण्यामध्ये जो आनंद आहे, त्याहीपेक्षा जास्त आनंद, ती सापडलेली गोष्ट कोणाला तरी सांगण्या मध्ये जास्त थ्रिल आहे. खरे की नाही?

तरीपण आज देखील याबाबत माझ्या डोक्यात एक शंका आहे की पूर्व दिशेला ‘खाल्लाकड’ असं का म्हणत असतील आणि पश्चिम दिशेला वरलाकडं असं का म्हणत असतील? म्हणजे पूर्वेला वरलाकडं आणि पश्चिमेला खाल्लाकडं असं का नसेल? आणि मग याच प्रकारे उत्तर आणि दक्षिण दिशांना काय नाव असतील?

अजून पर्यंत तरी मला या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत जर तुम्हाला माहीत असतील तर मला जरूर सांगा. कारण उत्तर मिळेपर्यंत डोक्यातला किडा शांत होत नाही. अधून मधून हे असे शब्द ऐकले की तो वळवळतोच.

शेवटी मला फक्त एक चिंता लागून राहिली आहे. तुमच्या मुलांसारखे माझी मुलं इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत आहेत. त्याची मुले देखील अशीच शिकतील. शहरात राहतील. त्यांच्या कानावर हे शब्द पडण्याची शक्यता कमीच. म्हणजे किमान हजार वर्षांची परंपरा असलेला हा शब्द लुप्त होईल? मृत पावेल? वापरातून जाईल? अशा शब्दांबरोबर माझी मराठी भाषाही लुप्त होईल का?

उद्या माझ्या मुलाच्या किंवा त्याच्या मुलाच्या कानावर हा शब्द पडलाच आणि त्याच्याही डोक्यात असाच किडा वाळवळला. आणि त्याने जर आपल्या बापाला विचारले की- “खाल्लाकडं म्हणजे काय रे पप्पा?” तर त्याला याचे उत्तर सांगणारे कोण असेल?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: