books

पुस्तकं

शेअर करा

मी गेल्यावर
तूला वाटेल कि आपल्या बाबांनी
वाचलीयेत ही सारी पुस्तकं.

पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय
येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी
मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं.

माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे
ही अक्षर ओळख सोडून फक्त.

जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर
तुला सांगण्या समजावण्यासाठी कि
मलाही सोडता येणार नाही मागे
काहींच स्थावर जंगम तुझ्यासाठी.

ही काही पुस्तकं आहेत फक्त
जी तुला दाखवतील वाट चालवतील थांबवतील कधी पळवतील
निःस्तब्ध करतील बोलतं करतील
कधी टाकतील संभ्रमात सोडवतील गुंते
वाढवतील पायाखालचा चिखल
ज्यात बुडवतील
अडवतील तुडवतील सडवतील
हरवतील कधी सापडतील
तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं
तू समोर आल्यावर नेहमीच
कवेत घेउन मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्न करतो.

तशीच ही पुस्तकं
उघडतील मधोमध पसरतील हात
मिठीत घेतील तुला
आपोआप होतील हृदयाचे ठोके.


यांच्यात रहस्यं आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमध्ये कदाचित प्रश्नही नसतील.

एक लक्षात ठेव
आपलं आयुष्यच सेल्फ हेल्प,

फिलॉसॉफिकल कधी कवितीक,
पल्प फिक्शन कधी क्लासिक
किचकट पण तितकंच सोपं असतं.

या सगळ्यात वाईट काहीच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्या वेळची गरज असते समजत नसतं.

मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील
जी नेतील तुला जायचं आहे तिथं
फक्त
मी असेन तिथे मात्र
तुला पोहोचता येणार नाही
कारण
मी आधीच होऊन गेलेलो असेन
एखादी कथा एखादी कादंबरी
एखादी कविता एखाद्या पुस्तकातली.

माझी अनावर आठवण आली
की या प्रचंड ढिगाऱ्यातलं
‘ते’ एखादं पुस्तक शोध.

तुझा प्रवास बघ कसा
सोपा होऊन जाईल.

कवी - सौमित्र

शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: