ख्रिस्ती मिशनरी हिंदूच्या मूर्तिपूजेचा उपहास करतांना

प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात

शेअर करा

प्रबोधन म्हटल्यावर केवळ राजाराम मोहन राय आणि पश्चिम बंगालमधील वेगवेगळी एक सुधारक मंडळी नजरेसमोर येतात.  परंतु भारताच्या पश्चिम भागात देखील एका परिवर्तनवादी विचारांनी भरलेल्या लोकांनी सुधारणांचा आणि नवप्रबोधनाचा पाया रचला होता हे अनेकांना अज्ञात आहे.  आज प्रार्थना समाजाचा स्थापना दिन आहे आणि हा मुहूर्त साधून या समाजाच्या कार्याविषयी ओळख करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

पार्श्वभूमी 

एकोणिसावे शतक भारताच्या इतिहासातील परिवर्तनशील काळाचे प्रतीक होते. या काळात भारताने न केवळ राजकीय स्वातंत्र्य गमावले, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सांस्कृतिक प्रभावही निर्माण केला, आर्थिक शोषणाची नवी प्रणाली निर्माण केली. परकीय राज्यकर्त्यांमुळे पाश्चात्त्य धर्म, शिक्षण आणि संस्कृती यांचा भारतावर प्रभाव गडद होत गेला, ज्यामुळे भारतीय समाजात धर्म व परंपरांबद्दल नवीन विचारधारा उदयास येऊ लागली.

ख्रिस्ती मिशनरी हिंदूच्या मूर्तिपूजेचा उपहास करतांना
ख्रिस्ती मिशनरी रेव्ह. थॉमस हिंदूच्या मूर्तिपूजेचा आणि देवतांचा उपहास करतांना

पाश्चात्त्य शिक्षणामुळे सुशिक्षित भारतीयांनी हिंदू धर्मातील रूढीवादी तत्त्वांची चिकित्सा करायला सुरुवात केली. त्यावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. मूर्तिपूजा, बहुदेवतावाद, जातीय भेदभाव यासोबत धर्मातील अनिष्ट परंपरागत चालीरीती व त्यांचे परिणाम यांचा विचार गहन पातळीवर होऊ लागला. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेल्या वैचारिक हल्ल्यांमुळे अनेक सुशिक्षित भारतीयांच्या धार्मिक परंपरेवरील श्रद्धेची जागा संशयाने घेतली जाऊ लागली. नवशिक्षणामुळे त्यांच्यात धार्मिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्याची प्रेरणा निर्माण झाली.

राजा राममोहन राय

या पार्श्वभूमीवर राजा राममोहन रॉय यांनी १८२८ मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना करून भारतीय समाजासाठी सुधारणा चळवळीला चालना दिली. ही चळवळ नंतर ब्राह्मोसमाजाच्या रूपात विकसित झाली. या प्रेरणेतून मानवधर्म सभा, परमहंस सभा, वेदसमाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज, आर्यसमाज, थिऑसॉफिकल सोसायटी यांसारख्या विविध धार्मिक व सामाजिक सुधारणा संस्थांची स्थापना झाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या व्यापक चळवळीचे वर्णन नवयुगधर्माची चळवळ‘ असे केले. 

या चळवळींनी धर्म व समाजाच्या मूलभूत तत्त्वांना नवीन विचार व सुधारणा सोबत जोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून भारतीय समाजात नवे चैतन्य निर्माण झाले. समाजातील जातिभेद नष्ट करावा, सर्व समाजाची एकत्रित प्रगती साधावी , धार्मिक रूढींचा विचार करून त्यात सुधारणा करावा, हे या चळवळींचे मुख्य उद्दिष्ट होते.  एकोणिसाव्या शतकात या विविध चळवळींच्या प्रभावामुळे भारतीय समाज एका नव्या मार्गाकडे वळत होता – असा मार्ग ज्यामध्ये व्यक्तीगत स्वातंत्र्य, विवेकबुद्धी, समानता आणि आधुनिक मूल्यांचा समावेश होता.

आधीच्या धर्म सुधारणा चळवळी 

एकोणिसाव्या शतकात धर्मसुधारणेच्या उद्देशाने प्रार्थना समाजाची स्थापना झाली. ‘ब्राह्मो प्रभाव’ हे प्रार्थना समाजाच्या उदयामागील जरी एक महत्त्वाचे कारण होते तरीही  प्रार्थना समाजाची मुळे परमहंस सभेमध्ये सापडतात, जी आधीच्या धर्मसुधारणा चळवळींमधील एक होती. परमहंस सभेने ब्राह्मोसमाजाच्या प्रभावाखाली कार्य केले आणि नवशिक्षित विचारवंतांना पाश्चात्य एकेश्वर वादी धर्मांचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.

यातूनच ख्रिस्ती मिशनरी मंडळींचा खोटेपणा आणि त्यांच्या तर्क आणि विचारांमधील फोलपणाही त्यांना जाणवायला सुरुवात झाली. बायबलमधील चमत्कारिक व अप्रमाण वाटणाऱ्या बाबीदेखील विचारवंतांच्या लक्षात आल्या. त्यामागचा हिंदूंच्या धर्मांतराचा गुप्त आणि लबाड हेतु त्यांना जाणवल्याशिवाय राहिला नाही. या सर्व गोष्टींमुळे आपल्या धर्माचा त्याग (धर्मांतर) करण्या ऐवजी आपल्या धर्माची आणि समाजाची नव्या युगाला साजेशी सुधारणा करण्याचा विचार समोर आला. दादोबा पांडुरंग तर्खडकर, राम बाळकृष्ण जयकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, भिकोबा चव्हाण, तुकाराम तात्या यांसारख्या सुशिक्षित व्यक्तींनी हा विचार पुढे नेला आणि समाजातील धार्मिक सुधारणा चळवळींना दिशादर्शक ठरला. 

बाप्टिस्ट मिशनरी विल्यम कॅरे हूगळी नदीत बाप्तिस्मा देऊन एका हिंदूचे धर्मांतर करतांना.

परमहंस सभा 

प्रथम सन १८४४ साली दादोबा पांडुरंग यांनी दुर्गाराम मनसाराम मेहता यांच्या सहकार्याने सुरतमध्ये ‘मानवधर्मसभा‘ स्थापन केली होती. पुढे दादोबा पांडुरंग मुंबईला आल्याने आणि दुर्गाराम मनसाराम मेहता राजकोट ला गेल्याने मानवधर्मसभा संपुष्टात आली. पुढे १८४८ मध्ये दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना केली, ही सभा भारतीय समाजातील रूढी, परंपरा आणि अनिष्ट चालीरीतींविरुद्ध लढा देण्याच्या उद्देशाने कार्यरत झाली. सभेच्या स्थापनेसाठी महत्त्वाची प्रेरणा ठरलेली घटना म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर आणि राम बाळकृष्ण जयकर यांची भेट. त्यांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून परमहंस सभेच्या स्थापनेची प्रक्रिया आकारास आली.

मानवधर्म सभा आणि परमहंस सभा या दोन्ही सभांचे तत्त्वज्ञान समान होते. एक ईश्वर, एक धर्म, मानवाची एकता आणि व्यक्तीच्या गुणांवर आधारित योग्यता हा त्यांच्या तत्त्वांचा मुख्य गाभा होता. विवेकबुद्धीच्या आधारावर कर्म आणि भक्ती करावी, तसेच शिक्षणाचा प्रसार करावा, असे त्यांचे उद्दिष्ट होते.

परमहंस सभेने एकेश्वरवादाचा प्रचार केला आणि जातीभेद व रोटीबंदी यांसारख्या सामाजिक अडथळ्यांना तोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. खालच्या मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या हातचे भोजन करणे हा यातलाच प्रकार होता. भलेही तो गुप्तपणे करण्यात आला तरी. सभेचे विचार अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी दादोबा पांडुरंग यांनी धर्मविवेचन (१८६८) आणि पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) ही दोन महत्त्वाची पुस्तके लिहिली.

दादोब पांडुरंग

परमहंस सभा प्रार्थना समाजाच्या प्राथमिक टप्प्याचे स्वरूप होती, जिथे धार्मिक आणि सामाजिक सुधारणांची बीजे रुजवली गेली. सभेच्या उपासनापद्धतींमध्ये प्रारंभ आणि शेवटी प्रार्थनेला महत्त्व देण्यात आले. परमहंस सभेचे पहिले व शेवटचे अध्यक्ष राम बाळकृष्ण होते, ज्यांनी या चळवळीला प्रभावशाली नेतृत्व दिले.

परंतु, परमहंस सभेला टिकून राहण्यात अपयश आले. यामागील कारणे अभ्यासली तर, सभेतील सदस्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देण्याची मानसिक तयारी आणि आत्मविश्वासाचा अभाव स्पष्ट होतो. सुरुवातीपासूनच ही सभा गुप्त स्वरुपात काम करत होती. परंपरावाद्यांच्या दबाव असतांनाही त्यांच्यासमोर आपली मते ठामपणे मांडण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. (पुढे अशी हिम्मत महात्मा फुलांनी दाखवली.) त्याचबरोबर, समाजातील परंपरावादी लोकांच्या विरोधाच्या भयाने सभेने आपले कार्य गुप्त पणे करण्याचे ठरवले. जेव्हा समाजाचे विचार अधिक प्रगल्भ, आधुनिक व प्रगतशील होतील, तेव्हा सभेच्या उपक्रमांना उघड स्वरूप देऊन लोकांसमोर आणता येईल असा सभेच्या सदस्यांचा मानस होता.

मात्र, या काळात परमहंस सभेच्या सदस्यांची नावे असलेली यादी अचानक गायब झाली. सभासदांना आपली ओळख उघड होण्याची भीती वाटू लागली. परिणामी १८६० मध्ये परमहंस सभेचे अस्तित्व संपुष्टात आले.

आत्माराम पांडुरंग

जरी परमहंस सभा फार थोड्या काळासाठी अस्तित्वात होती, तरी तिचे विचार आणि तत्त्वे वाया गेली नाहीत. या सभेच्या प्रयत्नांमधून पुढच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींचे बीज रोवले गेले. परमहंस सभेने पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेचा पाया घातला.

प्रार्थना समाज 

परमहंससभेच्या तत्त्वांतूनच पुढे प्रार्थना समाजाचा उदय झाला. परमहंस सभेच्या अनेक सभासदांनी प्रार्थनासमाजाच्या स्थापनेत आणि संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रार्थनासमाजाच्या स्वतंत्र स्वरूपाला चालना मिळण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे १८६४ साली ब्राह्मोसमाजाचे प्रसिध्द प्रवक्ते केशवचंद्र सेन यांनी मुंबई आणि पुणे येथे दिलेली जाहीर व्याख्याने. या व्याख्यानांमुळे समाजसुधारणेच्या चळवळीला नवा जोम आणि दिशा मिळाली. दादोबा पांडुरंग यांचे  बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १८६७ रोजी मुंबईत प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. त्यानंतर पुणे, नगर, सातारा, अहमदाबाद अशा विविध ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा स्थापन झाल्या.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

या चळवळीला पुढे म. गो. रानडे, रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, द्वा. गो. वैद्य, विठ्ठल रामजी शिंदे आणि इतर तत्कालीन सुधारक मंडळींचे मार्गदर्शन लाभले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य महादेव गोविंद रानडे या चळवळीत सहभागी झाल्यानंतर, चळवळीला अधिक लोकाश्रय मिळाला. डॉ. आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे, संस्कृत अभ्यासक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि राजकीय नेते नारायण चंदावरकर यांनी सक्रिय सहभाग घेत चळवळीला बळ दिले.

महादेव गोविंद रानडे यांनी Humanise, Equalise, Spiritualise ही समाजाची  बोधवाक्ये सांगितली. भांडारकर यांनी प्रार्थनासमाजाच्या उद्दिष्टांचे स्वरूप सांगताना ही उद्दिष्ट उपनिषदे, भगवद्गीता, पाश्चात्य उदारमतवादी विचार आणि संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम यांचे काव्य  या चार स्तंभावर उभे असल्याचे नमूद केले. जरी ब्राह्मोसमाजाच्या विचारांचा प्रार्थनासमाजावर खोलवर परिणाम दिसतो तरी  महाराष्ट्रातील रानडे आणि भांडारकर यांच्याविचारांचा  प्रभावही प्रार्थना समाजावर जाणवतो.

संत तुकाराम यांना प्रार्थनासमाजाने ‘भागवत धर्माचा कळस’ म्हणून मार्गदर्शक मानले

संत तुकाराम यांना प्रार्थनासमाजाने भागवत धर्माचा कळस म्हणून मार्गदर्शक मानले. उपासना आणि प्रवचनांमध्ये तुकाराम व इतर संतांच्या अभंगांची जोड देण्यात आली. रानडे यांनी युरोपमधील मार्टिन ल्यूथरच्या धर्मसुधारणेचे आणि भागवत धर्माचे साम्य स्पष्ट केले. त्यांच्या मते, प्रार्थनासमाज म्हणजे नवभागवत धर्म होता. रानडे यांनी या धर्माच्या तत्त्वांना अनुसरून समाजकारण व राजकारण करण्यावर भर दिला. सामाजिक आणि राजकीय सुधारणांना महत्व देणे आवश्यक असल्याचा त्यांनी आग्रह धरला. पुढे विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थनासमाजाच्या विचारांचा प्रसार करून बहुजन समाजापर्यंत पोहोचवले. 

प्रार्थना समाजाची धर्मतत्त्वे

प्रार्थनासमाजाची तत्त्वे रानड्यांनीच निश्चित केली होती. प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे थोडक्यात खालील प्रमाणे सांगता येतील. 

  1. परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी,परमपवित्र व पतितपावन असा आहे. 
  2.  केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. 
  3. त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना. 
  4. प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे, हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे. 
  5. परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही. 
  6. सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.

प्रार्थनासमाज हे सुरुवातीपासूनच एक आध्यात्मिक चळवळ म्हणून ओळखली गेली. या समाजाने ब्रह्मवादाचा अंगीकार केला, मात्र तो मायावादी नव्हता. प्रार्थनासमाजाला एकमेव संस्थापक नव्हता, तर हा समाज उपनिषदे आणि इतर धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक तत्त्वांना मान्यता देणारा होता.साधकाला कोणत्याही पुरोहिताच्या मध्यस्थीविना, अंतःप्रेरणा आणि स्वानुभवातून सत्याचे ज्ञान मिळू शकते असा या समाजाचा दृष्टिकोन असा होता . विवेकबुद्धीच्या सहाय्याने धर्म आणि नैतिक तत्त्वे समजली जाऊ शकतात. आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदन हा समाजाच्या प्रवृत्तिमार्गाचा गाभा होता.

प्रार्थनासमाजाने सद्धर्म आणि सदाचरणावर आधारित सामाजिक सुधारणांचा पाया घालण्याचा प्रयत्न केला. रानडे आणि भांडारकर यांच्या व्याख्यानांच्या आणि प्रवचनांच्या संग्रहातून या समाजाच्या तत्त्वज्ञानाचे व्यापक स्वरूप समजते. प्रार्थना  समाजाने प्रार्थना संगीत‘, ‘प्रार्थनासमाजाचा इतिहास‘ यांसारखे मराठी ग्रंथ आणि Spiritual Powerhouse सारखे इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केले. इतकेच नव्हे, तर ‘सुबोध-पत्रिका’ हे नियतकालिकही बऱ्याच वर्षांपर्यंत चालवले, ज्यातून प्रार्थनासमाजाचे विचार लोकांपर्यंत पोहोचले. 

योगदान 

प्रार्थनासमाज सुरुवातीपासूनच एक आध्यात्मिक, धार्मिक सुधारणा चळवळ होती. प्रार्थना समाजाने पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यतानिवारण, हुंडा प्रथा, बालविवाह आणि बहुपत्नीत्व निर्मूलन यांसारख्या सर्वच महत्त्वपूर्ण सामाजिक सुधारणांचा पुरस्कार  केला. या चळवळीमुळे महिलांचे शिक्षण व्यापकपणे प्रोत्साहित झाले. निराधार मुलांसाठी अनाथाश्रम स्थापन केले गेले, प्रौढ शिक्षणासाठी रात्रीच्या शाळा सुरू करण्यात आल्या, आणि वंचितांसाठी मोफत दवाखाने सुरू करण्यात आले.

जरी प्रार्थना समाजाला प्रत्यक्षरित्या अस्पृश्यता निर्मूलन साध्य करता आले नाही तरीही अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रार्थनासमाजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महादेव गोविंद रानडे यांच्या प्रयत्नांमुळे, सामाजिक सुधारणांना राजकीय स्वातंत्र्याइतकेच महत्त्व आहे, हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या गळी उतरवण्यात यश आले. त्याअर्थी  प्रार्थनासमाज आणि रानडे यांचे योगदान मोठे ठरते.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रार्थनासमाजाचा विचार बहुजनसमाजापर्यंत नेला

प्रार्थनासमाज केवळ काही दुष्ट प्रथांचे निर्मूलन करणे हाच उद्देश ठेवत नव्हता. त्याऐवजी, त्यांनी नव्या मूल्यव्यवस्थेवर आधारित सामाजिक संबंधांची पुनर्रचना करण्याचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला. १८७० च्या दशकात धर्म सुधारणांना हात घालणे, अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणे आणि शांतता, ज्ञान व प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या निराकार देवाची प्रार्थना करण्यास प्रोत्साहन देणे हे सर्व त्या काळाच्या दृष्टीने क्रांतिकारी होते. नव प्रबोधनाची नांदी होते.

महात्मा ज्योतिबा फुले

त्या अनुषंगाने पुढे प्रार्थना समाजाने (महात्मा फुले आणि त्यांच्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे या प्रार्थनासमाजी मंडळींनी) महाराष्ट्रातल्या समाजकारणाचा आणि  राजकारणाचा देखील  पाया घातला असे म्हणता येईल.  आजही पंढरपूर व मुंबई, पुणे, अहमदाबाद इथे अजूनही प्रार्थना समाज कार्यरत आहे. या ठिकाणी विविध प्रकारची समाजकल्याणपर कार्ये प्रार्थना समाजातर्फे चालविण्यात येतात. 

हा लेख आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या  मित्रांसोबत हा लेख शेअर करा.  आपल्या अभिप्रायाची वाट बघतो आहे. 


शेअर करा

Discover more from गुऱ्हाळ

Subscribe to get the latest posts sent to your email.

1 thought on “प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात”

Leave a Reply

error:

Discover more from गुऱ्हाळ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading