भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा व प्राचीन भारताचा इतिहास हा ज्ञानाचा इतिहास आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काळाच्या ओघात विविध कारणांमुळे ज्ञानाचा वारसा खंडित झाला.
भारताची उज्ज्वल ज्ञानपरंपरा व प्राचीन भारताचा इतिहास हा ज्ञानाचा इतिहास आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काळाच्या ओघात विविध कारणांमुळे ज्ञानाचा वारसा खंडित झाला. भारतीय ज्ञानपरंपरेकडे दुर्लक्ष करून पाश्चिमात्य शिक्षणपद्धतीला आलेले अवाजवी महत्त्व; एकेकाळची ज्ञानभाषा असणाऱ्या संस्कृत भाषेबद्दलची उदासीनता; पाली, अर्धमागधी यांसारख्या भाषांचा झालेला ऱ्हास यामुळे अनेक विषयांमधले ज्ञानभांडार विस्मृतीच्या गर्तेत जात आहे. ‘ट्रेझर ट्रोव्ह ऑफ इंडियन नॉलेज’ या पुस्तकाच्या माध्यमातून अशा विस्मृत ज्ञानावर प्रकाश पडतो.
यात एकूण २७ प्रकरणांत स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, जलव्यवस्थापन, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, शिल्पकला इत्यादी अनेक क्षेत्रांमधल्या भारतीयांच्या विलक्षण कामगिरीचे दाखले दिले आहेत. कुतुबमिनारजवळ बाराशे ते पंधराशे वर्षे न गंजता उभा असलेला लोहस्तंभ, १८०० वर्षांपासून वापरात असणारे कलानाई धरण, अदृश्य होणाऱ्या शाईमध्ये लिहिलेले अग्रसेन महाराजांचे चरित्र ही त्यापैकी काही उदाहरणे. सोमनाथ मंदिराजवळच्या किमान दीड हजार वर्षे जुन्या असणाऱ्या ‘बाणस्तंभा’वर ‘या स्थानापासून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या सरळ रेषेला कुठेही अडथळा नाही’ अशा अर्थाची संस्कृत ओळ कोरलेली आहे. आज तंत्रज्ञानाच्या साह्याने याची सत्यता पडताळता येते, तेव्हा इतक्या पूर्वी हे भौगोलिक ज्ञान भारतीयांकडे कसे आले याचे नवल वाटत राहते. सांकेतिक भाषेतल्या साहित्याबद्दलच्या पुस्तकातल्या माहितीचा आवर्जून उल्लेख करायला हवा.
१) जैन मुनी कुमुदेंदू लिखित ‘सिरी भूवलय’ ग्रंथ : हा जणू रामायण, महाभारत तसेच अन्य प्राचीन ज्ञानसाहित्याचा एनसायक्लोपिडियाच आहे. याच्या प्रत्येक पानावर ‘सुडोकू’सारख्या २७ x २७ चौकटींमध्ये १ ते ६४ दरम्यानच्या संख्या लिहिल्या आहेत. या संख्यांशी संबंधित विशिष्ट अक्षरे ठराविक क्रमाने कशी वाचायची याचे काही संकेत आहेत. ते वापरून हा ग्रंथ एकूण १८ लिप्या आणि ७१८ भाषांमधून वाचता येतो, अशी माहिती उपलब्ध आहे. त्यापैकी कन्नड, मराठी, तमिळ, तेलुगु प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून यातील काही मजकुराचे अनेक जैन संस्थांच्या प्रयत्नांमुळे ‘वाचन’ करण्यात यश आले.
२) ‘कटपयादी संख्यापद्धती’ : अक्षरांना विशिष्ट क्रमांक देऊन त्यातून गुप्तसंदेश देण्यासाठीची ही पद्धती वापरून ‘गोपीभाग्यमधुव्रात-शृङ्गिशोदधिसन्धिग | खलजीवितखाताव गलहालारसंधर ||’ ही काव्यपंक्ती लिहिली गेली. यात कृष्णाला केंद्रस्थानी घेऊन वर्तुळाकार फेर धरणाऱ्या गोपिकांचे वर्णन असले तरी यातील एकेका अक्षराचे कटपयादी संख्यासंकेतानुसार वाचन केले असता वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘पाय’ या स्थिरांकाची (३.१४) दशांश चिन्हाच्या पुढच्या ३१ स्थानांपर्यंतची किंमत मिळते! एवढा विलक्षण ज्ञानवारसा खंडित होण्याची कारणे पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात विशद केली आहेत. बाराव्या शतकापासून भारतावर होणाऱ्या सततच्या इस्लामी आक्रमणांमध्ये इथली मठ-मंदिरे, ग्रंथसंपदा यांचे अतोनात नुकसान झाले. बख्तियार खिलजीने तब्बल तीन महिने केलेल्या नालंदा विद्यापीठाच्या विद्ध्वंसाचे वर्णन वाचून मन विषण्ण होते. पुढे युरोपीय वसाहतवाद्यांनी आपल्या लुटीत अनेक ग्रंथ भारतातून नेले. अशा प्रतिकूलतेतही काही ग्रंथ तग धरून राहिले. ‘सुश्रुतसंहिते’मध्ये मांडलेले ‘प्लास्टिक सर्जरी’चे तंत्र, भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’ ग्रंथातले काटकोनाच्या कर्णाबद्दलचे सूत्र, नागार्जुनाच्या ‘रसरत्नाकर’ या ग्रंथातले ‘आसवन विधी’चे (डिस्टीलेशन) वर्णन इ. उदाहरणे त्या काळातील भारतीयांच्या ज्ञानाची साक्ष देतात. प्रख्यात शास्त्रज्ञ आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी ‘हिंदू केमिस्ट्री’ या आपल्या ग्रंथात भारतीयांनी प्राचीन काळी केलेल्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल लिहून ठेवल्याने महत्त्वाची माहिती जगासमोर आली.
प्रस्तुत पुस्तक हे ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ या मराठी पुस्तकाचा देविदास देशपांडे यांनी केलेला उत्तम अनुवाद आहे. भारताच्या ज्ञानपरंपरेत विविध प्रांतांमधून मिळालेल्या योगदानाची दखल पुस्तकात घेतली गेली आहे. लेखनासाठी प्राचीन भारतीय ग्रंथ, परदेशी प्रवाशांनी भारताबद्दल लिहून ठेवलेली निरीक्षणे, भारतीय आणि विदेशी अभ्यासकांच्या नोंदी यांचा आधार आहे. माहिती आणि रंजकता यांचा उत्तम मेळ असणारे हे पुस्तक भारताच्या ज्ञानवारशाकडे पुन्हा एकदा वळण्याची आवश्यकता अधोरेखित करते.
ट्रेझर ट्रोव्ह ऑफ इंडियन नॉलेज,
लेखक : प्रशांत पोळ
प्रकाशक : प्रभात प्रकाशन
पाने : २०८, किंमत : ३०० रु.
साभार – मटा