ब्लॉग बद्दल

गुऱ्हाळ म्हणजे जिथे उसापासून गूळ बनवतात अशी जागा. प्रथम ऊसापासून रस काढतात. नंतर त्याला एका कढईमध्ये उकळतात. त्या रसावर प्रक्रिया करतात. मग त्या रसापासूनच मधुर गोड असा गूळ तयार होतो.

गुऱ्हाळ असे नाव या ब्लॉग ला का बरे? असा विचार तुमच्या मनामध्ये येईल. आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी ऐकतो, बघतो, वाचतो. अनेक व्यक्तींना भेटतो, त्यांना अनुसरतो. हे सर्व आपण डोळसपणे करत नाही. त्यामुळे व्यक्ती, विचार यांचे आपण विश्लेषण करत नाही. त्यांना तपासून पाहत नाही. आपण डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतो.

एखादा विचार आपल्या राजकीय धार्मिक किंवा आर्थिक विचारांशी जुळणारा असेल तर आपण तो डोळे झाकून स्वीकारतो. बऱ्याच वेळा आपल्याला वाटते की एखादी माहिती, एखादा विचार योग्य आहे. परंतु त्या विचारा मागचे अनेक पदर आपल्याला माहीत नसतात. मग एक दिवस त्या बद्दलची दुसरी बाजू आपणास माहीत होते. आणि मग आपल्याला जाणवते. आपण किती चुकीचा विचार इतके दिवस आपण उराशी बाळगला.

तेव्हा अशा सगळ्या व्यक्तींबद्दल, विचार, घटनांबद्दल आणि एकंदरीतच आजूबाजूच्या भवतालाबद्दल जाणून घ्यावे. त्यातले चांगले वाईट असे ओळखून घ्यावे. उत्तम गोष्टींचा अर्करुपी रस काढून, त्यातील टाकावू विचार चोथ्या प्रमाणे बाजूला काढावा. आणि मग उरलेला मधुर असा गोड विचार, जो गुळा सारखा उत्तम, आणि टिकाऊ असेल, तो मांडणे हे या ब्लॉग चे उद्दिष्ट आहे.

आपल्या परंपरा, इतिहास, संस्कृती, धर्म, अध्यात्म, अर्थकारण आणि राजकारण यातील बारकावे समजून घेण्यात रस आहे अशा सर्व लोकांसाठी हा ब्लॉग आहे. खरे हिरो, चांगली पुस्तके, इतिहासातील अज्ञात बाबी, मराठी आणि हिंदी भाषेतील उत्तम साहित्य, काव्य, राजकारण याबद्दल भरपूर रोचक लिखाण इथे वाचायला मिळेल.

शक्य आहे की इथे मांडलेला एखादा विचार आपणास पटणार नाही. त्यात काही बदल करणे आवश्यक आहे असे देखील आपणास वाटेल. असे वाटल्यास तुम्ही लेखाच्या शेवटी अवश्य कमेंट करा. लेखकाशी वाद घाला. तुमच्याकडील तथ्य मांडून त्याचा मुद्दा खोडून काढा. तुमच्या विचारांचे इथे स्वागत आहे. याही पुढे जाऊन जर तुम्हाला आपले मत विस्तृत मांडायचे असल्यास, एखादी नवी गोष्ट सर्वांना सांगायची असल्यास [email protected] या ईमेल वर मला कळवा. नव्या लेखकांचे इथे स्वागतच आहे.

इथे प्रदर्शित करण्यात आलेले मत हे त्या त्या लेखकांचे वैयक्तिक मत आहे. या वेबसाइटवर टाकण्यात आलेले लेख हे केवळ मार्गदर्शनपर आहेत. त्याबद्दलची कुठलीही जबाबदारी ब्लॉगची नसेल.

बाकी सर्वांना चांगल्या विचारांचा अर्क रुपी गूळ चाखायला मिळावा ही या ब्लॉग मागची प्रामाणिक इच्छा आहे.

error: