सोशल मीडियावरील कचऱ्यात कधीकधी खूप चांगले हिरे-माणिक सापडतात. ही अशीच एक कविता नाना पाटेकर च्या नावावर आहे. नाना या कवितेचा कवी आहे की नाही हे पक्के माहीत नाही. पण कविता मात्र छान आहे. आवडली आहे म्हणून तुमच्या सोबत शेअर करतोय
आभाळाला भिंती घातल्या आणि मी घरंदाज झालो..
वाट्याला आलेला खिडकी येवढा आभाळाचा तुकडाच
माझा अवकाश बनून राहीला..
सुर्याला फुंकर घालुन
घरच्या दोन पणत्यामध्ये दिवाळी मानत आलो..
भिंतीवरली सावली फक्त मोठी झाली
बाकी सगळच आक्रसून गेल..
जाणिवा, संवेदना,कक्षा आणि काही काही..
नेमक्या चार चांदण्यांची खिड्कीच
जगण्याची चौकट बनली..
एक नियमीत मरण
रोज जगण्याची सवय झाली..
त्याचीच भलावण करत राहीलो..
भल्या मोठ्या आभाळाची सवय सुटलेली..
एवढ मोठ तरंगत आभाळ पाहुन,
कोसळेल काय वाटायला लागत..
चांदण्यांचा खच पाहुन
डोळे गरगरायला लागतात..
समोरच्या चिरंतन अंधारातुन पट्कन
कोणी अंगावर येइल काय,वाटायला लागतं..
मग पुन्हा चार भिंतीत स्वताला चिणून घेतो..
मी असा का झालो असुरक्षित,
कधी निघणार मी बाहेर?
मीच बांधलेल्या थडग्यातून..
खरतर हा आभाळाचा मंडप
माझ्यासाठीच आहे ना?
कधी चिमटनार मी आकाशाला?
कधी लिंपणार या चांदण्या मी माझ्या केशात?
क्षितिजावरील सुर्याकडे मान वर करून पह्ताना,
कधी फुलणार इंद्रधनुष्य माझ्या डोळ्यात?
मला या चार भिंतीच्या बाहेर पडायला हव..
मखमली अंधाराच्या पलिकडे,
खुप प्रेम करणारा हात
असेल माझी वाट पाहत..
कदाचित मी प्रेम करण विसरलो आहे...
थोडा हात लांब करुन
अंधाराला छेदण्याची गरज आहे...
कोणी येणार का बरोबर?
पहिल्यांदा अंधार अंगावर घेऊ,
मग आकाश लांब नसेल