
आजपासून बरोबर 286 वर्षापूर्वी दिल्लीत भयंकर लूट आणि नरसंहार घडला होता. हा इतिहास खरे तर सआदत खानापासूनच सुरू करायला हवा. अवध घराण्याचा संस्थापक ज्याला सआदत खान नावाने इतिहासात ओळखले जातो. त्याचे मूळ नावं होते मीर मोहम्मद आमीन.
सआदत खान मूळचा इराणचा. इराणमधील निशापूरचा. त्याकाळी असे अनेक जण मध्यपूर्वेतून भारतात आपले नशीब आजमावण्यासाठी येत. अर्थातच ,औरंगजेब हयात असेपर्यंत तरी मुघल साम्राज्य जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते. आपण आज ज्याला मध्य पूर्व म्हणतो त्या प्रदेशातील साहसी मुस्लिम तरुणांना, व्यापाऱ्यांना, इस्लामी धर्मगुरू व जाणकारांना मुघल साम्राज्यात मुबलक संधी उपलब्ध होत्या.
जागा बदलली की नशीब बदलते असे म्हणतात. त्याप्रमाणे सआदत खान ही आपले नशीब आजमावण्यासाठी इराणहून भारताकडे निघाला. सआदत खानाचे वडील आणि भाऊ या आधीच भारतात आलेले होते. त्याचे वडील पटण्यास स्थायिक झाले होते.
सआदत खान ई. स. 1708-09 च्या सुमारास भारतात आला खरा पण जेव्हा तो पाटण्यास पोहोचला तेव्हा त्याला समजले की आपले वडील या आधीच अल्लाला प्यार झाले आहेत. आता पाटण्यात थांबण्यात काही अर्थ नव्हता. सआदत खानाला आता दिल्ली खुणावू लागली.
तो दिल्लीला आला त्यापूर्वीच सम्राट औरंगजेब इसवी सन 1707 ला मृत्यू पावला होता. आणि मुघल परंपरेला अनुसरून दिल्ली दरबारात शह-कटशहांचे राजकारण जोऱ्यात सुरू झाले होते. मुघल सत्ता आणि मुघल बादशाह अत्यंत कमकुवत बनली होती. मुघल बादशहा मदिरा-मदिराक्षी यातच गुंग झाले. वेगवेगळ्या प्रादेशिक सत्ता स्वतंत्र होऊ लागल्या. त्यांनी मुघल साम्राज्याचे लचके तोडण्यास सुरुवात केली. स्वतः मुघल सरदार, मानसबदारांनी आपली जहागीर, वतन, सुभा यांचा कारभार स्वतंत्रपणे चालवण्यास सुरुवात केली. खुद्द दरबारी मंडळी बादशहाला जुमानेशी झाली. बुद्धिबळाच्या पटावर प्यादी बलवान झाली आणि राजा दुबळा ठरू लागला. अन्तर्गत राजकारणामुळे 1707 (औरंगजेबाचा मृत्यू) ते 1720 या तेरा वर्षात सात बादशाह बदलले. काही तर तीन महिने इतक्या अल्प काळ बादशाह राहिले .
दिल्लीची सर्व सत्ता सूत्रे सय्यद बंधूंनी (दोघे मुघल दरबारी होते) आपल्या हाती घेतली होती. हे दोन सय्यद बंधू होते हसन अली आणि हुसेन अली. काहीं बादशहांना सय्यद बंधूंनी सिंहासनावरून पायउतार केले तर काहींची हत्या करण्यात आली. (जहांदर शाह, फर्रुखसियर, रफी उद दरजात आणि रफी उद दौला)
यातील हसन अलीचा दिवाण, राय रतनचंदच्या मदतीने मीर मोहम्मद ने फार्रुखसियर या मुघल बादशहाच्या दरबारात चंचू प्रवेश मिळवला. पुढे 1722 मध्ये बादशहा मोहम्मद शहा (रंगीला) आणि सय्यद बंधू च्या झगड्यामध्ये सआदत खानाने बादशहाची बाजू घेतली. त्याने हसन अली सय्यद च्या हत्येमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या कर्तबगारीचे बक्षीस म्हणून मीर मोहम्मदला आग्र्याची सुभेदारी प्राप्त झाली. त्याच सोबत ‘सआदत खान बुऱ्हान-उल-मुल्क’ चा खिताब ही मिळाला. परंतु या भागातील मुघल सत्ते विरुद्ध उभ्या राहिलेल्या जाटांचा बंदोबस्त न करता आल्यामुळे पुढे त्याची बदली करण्यात आली. त्याला अवधचा सुभेदार म्हणून पाठवण्यात आले.
अवध मध्ये त्याकाळी लखनऊचे शेखजादे खूप सामर्थ्यशाली बनले होते. एक तर ते सुन्नी होते. आणि दुसरे म्हणजे त्यांनी दिल्लीच्या सत्तेला आव्हान दिले होते. सआदत खानाने आपल्या हुशारीने या शेखजाद्यांचा बंदोबस्त केला आणि लखनऊ वर आपला ताबा प्रस्थापित केला.
अवधचा नवाब बनल्यावरही त्याला दिल्लीच्या राजकारणात रस होता. त्यामुळे अवध वर आपला अंमल बसवून झाल्यानंतर त्याने आपल्या मुलीचा निकाह आपल्या पुतण्याशी म्हणजे सफदरजंग शी लावून दिला. त्याने सफदरजंग ला अवधमध्ये आपला प्रभारी नेमले. अशाप्रकारे सादत खान दिल्लीच्या राजकारणामध्ये भाग घ्यायला मोकळा झाला.
मुघल सत्तेसाठी अनेक लढायांमध्ये भाग घेऊन त्याने लढवय्या म्हणून नाव कमावले. याचाच परिपाक म्हणून 1739 साली इराणच्या नादिर शहाने जेव्हा दिल्लीवर आक्रमण केले तेव्हा या आक्रमणास तोंड देण्यासाठी सआदत खानाला पाचारण करण्यात आले.

नादिरशहाची आगे कूच रोखण्यासाठी सआदत खान त्यावर चाल करून गेला. २३ फेब्रुवारी १७३९ रोजी दोन्ही सैन्याचा करनौल जवळ (यमुना) नदीच्या काठावर संघर्ष झाला. फक्त तीन तास चाललेल्या या युद्धात नादिर पेक्षा सहा पट सैन्य असूनही, प्राणप्रणाने लढूनही तो ही लढाई हरला. केवळ हरलाच नाही तर मरता मरता देखील वाचला. लढाईत अतिशय गंभीर जखमी अवस्थेत असताना त्याला नादिरशहाच्या सैन्यातीलच एका शिपायाने वाचवले. हा शिपाई इराण मधील निशापूरचा त्याच्या गावाजवळचा होता. जीव वाचला खरा पण त्याला कैद करण्यात आले. आणि नादिरशहा समोर उभे करण्यात आले. जीव तर वाचला होता. परंतु नादीर शाह जिवंत सोडेल याची खात्री नव्हती.
नादिरशहा ने सआदत खानाला विचारले की – “आपण दोघे एकाच भागातले. आपला धर्मही एकच. आपण दोघेही शिया पंथाचे. असे असून देखील तू माझ्या विरुद्ध का लढला?“
यावर सआदत खानाने मोठ्या चतुराईने उत्तर दिले. तो म्हणाला – “बादशहा, मी जर असे केले नसते तर हिंदुस्थानच्या दरबारातील सर्व दरबारी मंडळींनी मला दगाबाज, गद्दार म्हटले असते. मी तुमच्यासोबत हात मिळवणी केली असा आरोप माझ्यावर लावला असता. आलम हिंदुस्थानात ‘फारसी’ किंवा ‘इराणी’ हा शब्द दगाबाजी आणि विश्वासघात या शब्दांचा प्रतिशब्द बनला असता. भविष्यात ‘फारसी’ शब्द शिवी म्हणून वापरला गेला असता. केवळ ‘फारसी’ नावाची लाज राखण्यासाठी मी तुमच्यावर आक्रमण केले.
या उत्तराने नादिर शहा खूप प्रभावीत झाला. सआदत खानाविषयी त्याचे मत अनुकूल बनले. इतकेच काय तर पन्नास लक्ष रुपयांचे खंडणी वसूल करावी आणि परत फिरावे असा त्याचा निर्णय झाला. सआदत च्या मार्फतच दिल्ली दरबाराला 50 लाखाची मागणी करण्यात आली.
परंतु सआदत खान व दिल्ली दोन्हींच्या नियतीने काहीतरी वेगळेच वळण घेणार होते. केवळ दैवयोगाने सआदत खान वाचला होता. निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्याने नादीरशहाच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर देखील उत्पन्न केला होता. परंतु दैव देते आणि कर्म नेते या म्हणीप्रमाणे त्याने या या निष्ठेलाच तिलांजली देत दिल्ली दरबाराशी गद्दारी करत दिल्लीसाठी आणि नंतर स्वतःसाठी देखील आफत ओढवून घेतली.
तर झाले असे की, सआदत इकडे नादिरशहाशी लढाईत गुंतला असता दिल्लीतील राजकारणाने वेगळे वळण घेतले. मुघल दरबारातील मीर बक्षी या दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वाच्या व शक्तिशाली पदावर असणाऱ्या शम्स उद्दौला खान दुर्राण याचा मृत्यू झाला. या पदासाठी त्याकाळी मुघल दरबारात अनेक शक्तिशाली दावेदार होते. हे पद सआदत खानाला देऊ म्हणून बादशहाने त्याला वचन दिलेले होते.
परंतु सआदत खानाला डावलून हे पद त्याचा प्रतिस्पर्धी, दख्खनचा सुभेदार, निजाम उल मुल्क, चिन किलीच खान ला देण्यात आले. निजाम ऊल मुल्क हा हैदराबाद संस्थानाचा संस्थापक मूळपुरुष आणि पहिल्या बाजीरावचा प्रतिस्पर्धी. निजाम उल मुल्क ला मीरबक्षी बनवण्यात बादशहाचीच संमती असावी अशी त्याची खात्री झाली. वचन देऊनही बादशहाने हे पद आपल्याला दिले नाही यामुळे सादत खान खूपच जास्त नाराज झाला. द्वेषाने आंधळा होऊन त्याने असे काही पाऊल उचलले की ज्यामुळे दिल्लीच्या इतिहासाला वेगळे वळण लागले आणि त्याचा स्वतःचा ही अंत झाला.
त्याने नादीर शहाला सांगितले की, ज्या 50 लाख रुपयांची खंडणी वसूल करून तो परत फिरणार आहे ही रक्कम दिल्लीच्या बादशहासाठी फारच मामूली आहे. एवढीशी रक्कम तर स्वतः सआदत खान त्याच्या अवध प्रांतातून त्याला वसूल करून देऊ शकतो. त्याने नादिर शहाला दिल्ली कडून वीस कोटी रुपये खंडणी मिळवून देण्याचे कबूल केले आणि दिल्लीवर यासाठी आक्रमण करण्याचे आमीष दाखवले. नादिरशहाला काय पैसा नको होता? तोही तयार झाला. त्याने सआदत खानालाच आपला वकील ए मुतालिक नेमला. १८ मार्च १७३९ रोजी जेव्हा दिल्ली ताब्यात घेण्यात आली तेव्हा त्या दिवशी सआदत सतत नादिर शाहच्या सोबत हजर होता.
जेव्हा सआदत खानने नादिर शाहला वचन दिलेले दागिने आणि पैसे वसूल करून देण्यात अपयशी ठरला तेव्हा त्याने नवाबाला (सआदत) शिवीगाळ केली आणि त्याच्या तोंडावर थुंकला. सआदत खानासाठी हा अपमान असह्य होता. अपमान सहन न झाल्यामुळे अवध घराण्याच्या या कर्तबगार संस्थापकाने शेवटी विष प्राशन करून आत्महत्या केली. १९ मार्च १७३९ रोजी त्यांचे निधन झाले.

नादिरशहा ची खंडणी अजून वसूल झाली नव्हती. सआदत मृत्यू पावल्यावर नादिरशाह दिल्लीतच होता. पुढे, कुठून कुणास ठाऊक, दिल्लीत अशी अफवा पसरली की नादिरशहा मारल्या गेला आहे. दिल्लीतील लोकांच्या एका जमावाने नादिरशहा च्या सैनिकांच्या एका तुकडीवर हल्ला केला. तीन हजार सैनिक मारले गेले. हे कमी होते की काय म्हणून दुसऱ्या दिवशी स्वतः नादिरशहा मशिदीत नमाज पडण्यासाठी जात असताना त्यावर कोणीतरी गोळी झाडली. नादिरशहाच्या सुदैवाने आणि दिल्लीवासीयांच्या दुर्दैवाने तो थोडक्यात बचावला परंतु त्याचा एक अधिकारी यात मारला गेला.
पुढचा इतिहास सर्वांना ठाऊकच आहे. इतिहासकार सर जदूनाथ सरकारांनी नादिर शाहच्या या लूटी चे आणि कत्तली चे सविस्तर वर्णन लिहून ठेवले आहे.

नादिरशहा अक्षरश चवताळला. नादिरशहा ने इतिहासात कुप्रसिध्द असलेली ‘दिल्लीची कत्तल’ घडवून आणली. त्याने आपल्या सैन्यास दिल्लीत सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला. तो 22 मार्च 1739 ला सुनहरी मशिदीत आला. नगारे आणि तुतारींच्या घोषात त्याने आपल्या सैनिकांसमोर आपली तलवार म्यानातून बाहेर काढून हवेत उंच धरली. सैनिकांसाठी हा कत्ल-ए-आम चा आदेश होता.
हजारो शस्त्रधारी सैनिक रस्त्यावर उतरले आणि दिसेल त्याची कत्तल करत सुटले. दिल्लीच्या रस्त्यांवर एक भयंकर दृश्य उभं राहिलं होतं. निर्दोष असो किंवा दोषी, पुरुष असो किंवा महिला, लहान असो किंवा मोठे—कोणालाही सोडले गेले नाही. हजारो निष्पाप नागरिक यात मारल्या गेले. अनेक स्त्रियांनी आपली अब्रू वाचवण्यासाठी आत्महत्या केल्या. मालमत्तेची प्रचंड प्रमाणात जाळपोळ आणि नासधूस करण्यात आली. दुकाने आणि बाजार च्या बाजार पेटवण्यात आले. घरे पेटवण्यात आली. दिल्ली अक्षरशः बेचिराख करण्यात आली. खुद्द दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला याला नादिर शाह समोर अक्षरशः जीवाची भीक मागावी लागली. काही तासांनी जेंव्हा नादीर ने पुन्हा आपली तलवार म्यान केली तेंव्हाच ही कत्तल थांबली. सहा तासांपर्यंत हा हिंसाचार चालू होता.
अनेक दिवस रस्ते मृतदेहांनी भरले होते. उद्ध्वस्त केलेल्या घरांच्या शिल्लक लाकडाचा उपयोग करून चिता पेटवल्या गेल्या, मृतदेह जाळले गेले. यमुना नदीच्या काठावरही एक भयाण दृश्य होतं. असंख्य मृतदेह गोळा करून नदीत टाकण्यात आले. शेवटी, मृतदेहांची विल्हेवाट लावल्यानंतरच रस्त्यांवरची शांतता परत आली, पण त्या भयानक आठवणी दिल्लीवर कायमस्वरूपी कोरल्या गेल्या. एका अंदाजानुसार, काही तासातच सुमारे 20 ते 30 हजार बायका पुरुष आणि लहान मुलेदेखील या कत्तलीत मारल्या गेली. जवळ जवळ 10 हजार बायका पोरांना गुलाम करण्यात आले. असे म्हणतात की दिल्ली सतत 57 दिवस जळत होती. (57 दिवसांनंतर नादिरशाह इराणला परत निघाला)

नादिरशहा ने आता वीस कोटी रुपये वसूल करण्यासाठी दिल्ली लुटली. याच लुटीत त्याने मुघलांकडील कोहिनूर हिरा आणि मुघलांचे प्रसिद्ध तख्त-ए-ताऊस (मयूर सिंहासन) हिरावून घेतले. जगातील सर्वात श्रीमंत साम्राज्यापैकी एकाला लुटल्यावर ही लूट इतकी प्रचंड होती की त्याला ती 700 हत्ती, 4000 उंट आणि 12000 घोड्यावर लादून न्यावी लागली असे म्हणतात. विन्सेन्ट स्मिथ लिहितो, “नादिर शाहने सुमारे साडेतीन शतकांमध्ये जमलेली दिल्लीतील संपत्ति दिल्लीतल्या लोकांकडून पद्धतशीरपणे आणि निर्दयपणे गोळा केले.”

जी आग आपण दुसऱ्यासाठी लावतो तिच्यात आपलाही जीव जाण्याचा धोका असतो. ईर्षा, मत्सर, द्वेष यामुळे माणूस आंधळा होतो म्हणतात ते खरे. नादिरशहाला २० कोटीचे प्रलोभन न देता जर सआदत परत फिरला असता तर?
तर….
कदाचित 50 लक्ष खंडणी घेऊन नादिर परत फिरला असता. कदाचित सआदत आपले पुढील आयुष्य सन्मानाने जगला असता. नादीरच्या मनात तर मानाचे स्थान मिळालेले होतेच. दिल्लीतही त्याच्या प्रतिष्ठेला फार काही धक्का लागला नसता. कदाचित नादिर दिल्लीला आला देखील नसता. कदाचित दिल्लीही बेचिराख झाली नसती. कोहिनूर भारतातच राहील असता, हजारो जणांचा जीव वाचला असता….. कदाचित.
परंतु इतिहासात जर-तर ला फारसा काही अर्थ नसतो. कधी कधी इतिहासाचा धडा कटू अनुभवातूनच शिकायला मिळत असतो.
Discover more from गुऱ्हाळ
Subscribe to get the latest posts sent to your email.