सर्व अडथळे बाजूला सारून न्यायमूर्ती सिन्हा यांनी घटल्याच्या कामकाजास सुरुवात केली होती हे आपण मागच्या लेखांमध्ये बघितले. यानंतर सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे साक्षीदारांच्या साक्षी घेण्याचे होते.
साक्षीदारांच्या साक्षी आणि उलट तपासणी (Statements of Witnesses and Cross verification)
साक्षीदारांच्या साक्षी/जबान्या (statement) घेण्याचे काम 12 फेब्रुवारी 1975 पासून अलाहाबाद हायकोर्टामध्ये सुरू झाले. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची पहिली संधी इंदिरा गांधी यांच्या पक्षाला देण्यात आली. इंदिरा गांधी पक्षाचे वकील श्री खरे यांच्याद्वारे सर्वप्रथम जो साक्षीदार बोलवण्यात आला त्यांचे नाव होते पी. एन. हक्सर. हे अतिशय मोठं नाव होतं. कारण हे त्या काळातील योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. अर्थातच इंदिरा गांधी यांच्या खास मर्जीतील होते. ते श्री यशपाल कपूर यांच्या राजीनाम्यासंबंधी साक्ष देण्यासाठी आले होते.
पी. एन. हक्सर यांनी आपल्या साक्षीमध्ये नोंदवले की श्री यशपाल कपूर यांनी 13 जानेवारी 1971 रोजी त्यांना राजीनामा सादर केला आणि तो त्यांनी तिथल्या तिथेच तोंडी स्वीकार देखील केला होता. त्यांनी तर पुढे असे ही म्हटले की त्यांनी स्वतः चार जानेवारी 1975 रोजी योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून जो पदभार ग्रहण केला, तो पंतप्रधानाच्या तोंडी आदेशाद्वारेच ग्रहण केला होता. इंदिरा गांधी गटाद्वारे या मुद्दया चा आधार घेऊन यशपाल कपूर यांच्या राजीनाम्याच्या विषयाला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यांची उलट तपासणी (Cross examination) करताना राजनारायण यांचे वकील शांती भूषण यांनी त्यांना विचारले की –
तोंडी आदेशाद्वारे (oral orders) एखाद्या सरकारी नोकराला नियुक्त करता येते काय? यावर उत्तरादाखल हक्सर म्हणाले की जेवढे काही मला माहित आहे त्यानुसार तोंडी आदेशाद्वारे एखाद्या सरकारी नोकराची तात्पुरती नियुक्त करता येते आणि त्याविषयी संबंधित लेखी आदेश मागाहून काढता येतो.
त्यांना शांती भूषण यांनी पुढील प्रश्न विचारला की -असे (तोंडी नियुक्ती करणे किंवा राजीनामा तोंडी स्वीकारणे) कुठल्या नियमाद्वारे किंवा कायद्याद्वारे करता येते हे जरा सांगता का?
त्यावर हक्सर म्हणाले की असा कुठला नियम मला तरी माहिती नाही परंतु नियुक्ती करणारा अधिकारी असे करतो करू शकतो.
शांती भूषण यांनी अजून पुढे त्यांना विचारले की-
तुम्ही पंतप्रधान सचिवालयामध्ये कार्यकारी सचिव पदापर्यन्त पोचले. इतक्या प्रदीर्घ सरकारी कामकाजाच्या अनुभवात असा तुम्हाला कुठला नियम माहिती आहे का ज्यामध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी OSD (ज्या पदावर यशपाल कपूर होते) म्हणून एखाद्याची नियुक्ती केवळ तोंडी आदेशाद्वारे करता येईल?
यावर परत हक्सर म्हणाले की –
असा कुठलाही नियम त्यांना माहिती नाही. परंतु त्यांना वाटते की भारत सरकारच्या सचिवाकडे अतिशय विस्तृत असे अधिकार दिलेले आहे आणि तो अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची नियुक्ती तोंडी आदेशाद्वारे करू शकतो.
इंदिरा पक्ष द्वारे सर्वात महत्त्वाचा साक्षीदार अर्थात श्री यशपाल कपूर हेच असणार होते. त्यांची जबानी (statement) 18 फेब्रुवारी 1975 ला सुरू झाली. कपूर यांची साक्ष व उलट तपासणी दोन दिवस चालली. आपण मुख्य साक्षीदार आहोत आणि सत्ताधारी पक्ष आपल्या पाठीशी आहे जाणिवेमुळे श्री यशपाल कपूर यांनी जबांनी देताना कोर्टा समोर जातांना जरा ताठयातच होते. ते अशा काही प्रकारे कोर्टसमोर वागले जे एरवी औद्धत्यपूर्ण (arrogance) वाटले असते. साक्षीदाराच्या जागेवर उभे असताना यशपाल कपूर हे दोन्ही हात आपल्या खिशात घालून उभे होते. आणि साक्षीदाराच्या कठड्यात सतत मागे पुढे होत होते. आपल्या पाठीमागे असणाऱ्या अमर्याद शक्तीचे प्रदर्शन करणारे त्यांचे छद्मी हास्य होते.
त्यांना आपली साक्ष इतकी महत्त्वाची वाटली नसावी. त्यांनी आपल्या साक्षी मध्ये अनेक चुका केल्या. काही गोष्टी लपवण्याच्या नादात ते घोडचुका (blunders) करून बसले. याची जाणीव इंदिरा गांधी पक्षाचे वकील श्री खरे यांना देखील झाली होती. म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधींना साक्षीदार म्हणून पाचारण करण्याचे ठरवले.
जॉर्ज ऑरवेल यांची Animal Farm नावाची प्रसिद्ध कादंबरी आहे. ते एक राजकीय प्रहसन (Political Satire) देखील आहे. या कादंबरीमध्ये प्राण्यांच्या रूपाने राजकीय व्यवस्थेवर भाष्य केलेले आहे. या कादंबरीत – “All Animals Are Equal.” अशी समानता असलेली राजकीय व्यवस्था असते. परंतु जेंव्हा नेपोलियन नावाचे डुक्कर सत्ता ताब्यात घेतो तेंव्हा तो या नियमात बदल करतो. “All Animals Are Equal but Some Animals Are More Equal Than Others” म्हणजे “कायद्यासमोर सर्वजण समान आहेत परंतु काही जण त्यातल्या त्यात जास्त समान आहेत.” म्हणजे जेंव्हा भ्रष्ट राजकारणी व्यवस्थेत शिरकाव करतात तेंव्हा “कायद्यासामोर सर्व समान” या वचनाचे धिंडवडे कसे निघतात याचा प्रत्यय इंदिरा गांधींच्या साक्षी दरम्यान पाहण्यात आला.
इंदिराजींच्या या साक्षी साठी न्यायमूर्ती सिन्हा समोर असा प्रस्ताव ठेवण्यात आला की इंदिरा गांधींची साक्ष घेण्यासाठी एक आयोग (Commission) नेमण्यात यावा जो दिल्लीत बसून काम करेल. इंदिरा गांधींना विचारल्या इंदिरा गांधींना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी त्यांना आगाऊ (In advance) देण्यात यावी आणि कुठल्या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे किंवा देऊ नये हे आयोगाने ठरवावे. परंतु ही विचित्र मागणी न्यायमूर्ती सिन्हा यांनी उडवून लावली. इंदिरा गांधींनी स्वतः अलाहाबाद उच्च न्यायालयात यावे आणि आपली साक्ष द्यावी असे ठरले.
इंदिरा गांधी या स्वतः साक्षीदार म्हणून या खटल्यामध्ये येणार हे जेव्हा उत्तर प्रदेशचे माजी महाधिवक्ता (former Advocate – General) पंडित कन्हैयालाल मिश्रा यांना कळले तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून ही चूक त्यांनी करू नये असा स्पष्ट सल्ला दिला. अर्थातच इंदिरा गांधींनी त्यांचा हा सल्ला मानला नाही.
या इंदिरा गांधींच्या कोर्टातील साक्षी विषयी असा एक गैरसमज आहे की इंदिरा गांधींना कोर्टात साक्ष देण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. प्रत्यक्षात इंदिरा गांधींनी स्वतः साक्षीदार म्हणून उभे राहायचे ठरवले होते. तसा सल्लाही त्यांच्या वकिलांनी त्यांना दिला होता.
इंदिरा गांधींच्या साक्षीची तारीख निश्चित करण्यात आली. 18, 19 आणि 20 मार्च, 1975. या साक्षी पुराव्यामध्ये आणि उलट तपासणी मध्ये काही त्रुटी राहू नये म्हणून दोन्ही बाजूचे वकील आणि पक्षकार अहोरात्र झटू लागले.
मधल्या काळात श्री शांतिभूषण यांनी काही वेगळे पुरावे शोधायला सुरुवात केली. इंदिरा गांधी सरकारी यंत्रणांचा आणि आपल्या पदाचा वैयक्तिक हितासाठी किंवा पक्षाच्या हितासाठी गैरवापर करतात असे सिद्ध करता येईल असा एखादा पुरावा. संघटन काँग्रेसच्या पक्षाच्या दिल्लीतील जंतर-मंतर येथील कार्यालयातून यासंबंधी काही कागदपत्रे मिळतील का यासाठी शांतिभूषण यांनी विचारणा केली.
जंतर-मंतरचे हे कार्यालय 1969 साली काँग्रेसमध्ये फूट पडेपर्यंत (अविभाजित) काँग्रेसचे कार्यालय होते. पक्ष फुटी नंतर स्थावर जंगम मालमत्तेची वाटणी झाली तेव्हा हे कार्यालय संघटन काँग्रेसच्या (Congress O) वाट्याला आले. या विनंतीचा मान राखून संघटन काँग्रेसच्या जंतर-मंतर कार्यालयाने ढीगभर कागदपत्रे श्री शांती भूषण यांच्याकडे पाठवली. त्यातली काही कागदपत्रे अतिशय रंजक होती. ज्याद्वारे इंदिरा गांधी यांची एक वेगळी बाजू समोर येणार होती. यातच एक अत्यंत महत्त्वपूर्ण कागद होता.
हा महत्वपूर्ण कागद म्हणजे त्या वेळचे हिमाचलचे उप-राज्यपाल, भद्री चे राजा यांनी त्या वेळच्या काँग्रेस अध्यक्ष श्रीमती इंदिरा गांधींना लिहिलेले पत्र. या पत्राद्वारे त्यांनी इंदिरा गांधींना कळवले होते की “लोकसभेच्या (1959 साली झालेल्या) मध्यावधी निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेशातील काँग्रेस पक्षाचा उमेदवार यशस्वीरित्या निवडून आला आहे. अशा प्रकारे श्रीमती इंदिरा गांधींनी सोपवलेल्या महत्त्वाच्या जबाबदारीची ही अत्यंत अवघड अशी परीक्षा मी पास झालो आहे” (The Congress candidate had been successful in the Lok Sabha by-election held in Himachal Pradesh. He said that he had thus passed the toughest test that Mrs Gandhi had put him through)
हे पत्र अत्यंत स्फोटक होते. राज्याचा उप-राज्यपाल हा तसे पाहिले तर सांविधानिक पद. उप राज्यपाल हा राजकीय दृष्ट्या तटस्थ असतो, किंवा असायला हवा. निवडणुकांमध्ये तर तो तटस्थ असायलाच हवा. परंतु या पत्रांमधून असे ध्वनीत होत होते की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी एका पक्षाच्या अध्यक्षांनी म्हणजेच इंदिरा गांधींनी या उपराज्यपालालाच कामाला लावले होते. या पत्रातून श्री शांतिभूषण यांना हे दाखवून द्यायचं होते की इंदिरा गांधी यांना पक्षाच्या कामासाठी शासकीय यंत्रणा कामाला लावण्याची जुनी सवय आहे. शांती भूषण यांनी हे पत्र इंदिरा गांधी विरुद्ध उलट तपासणी (cross examination) दरम्यान वापरण्याचे ठरवले.
या महत्त्वाच्या खटल्याचे दैनंदिन वर्तमान वर्तमानपत्र आणि आकाशवाणी इत्यादी प्रसार माध्यमांमध्ये येत होते. पी एन हक्सर आणि यशपाल कपूर यांच्या उलट तपासणीचेही वृत्तांत रंजक पद्धतीने प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. तिथपर्यंत प्रसारमाध्यमांनी या खटल्यामध्ये तेवढा रस घेतला नव्हता. कारण तोपर्यंत हा खटला म्हणजे एखाद्या सर्वसामान्य माणसाने पंतप्रधानांना अडचणीत आणण्यासाठी कुणाच्यातरी पाठबळाने केलेली खेळी असेच या खटल्याला समजले जात होते. परंतु यात जेव्हा इंदिरा गांधी साक्षीदार म्हणून येण्याचे ठरले तेंव्हा हा खटला एकदम प्रकाश झोतात आला. प्रसार माध्यमांची उत्सुकता शिगेला पोचली. देशाच्या इतिहासात तोपर्यंत कधीही पंतप्रधान पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती साक्षीदार म्हणून कुठल्याही कोर्टासमोर उभा राहिला नव्हता (राष्ट्रपती वराह वेंकट गिरी यांचा अपवाद सोडला तर).
पहिला दिवस
खटल्याचा दिवस उजाडला. कोर्टामध्ये पोलिसांद्वारे अतिशय कडक बंदोबस्त करण्यात आलेला होता. पक्षकार आणि त्यांचे वकील यांनाच केवळ प्रवेश देण्यात आला होता. या व्यतिरिक्त काही पत्रकार आणि काही पैरोकार (Special attorneys – जे या खटल्याशी संबंधित होते आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी ते मुख्य वकिलांना काही मदत करू शकत होते अशा व्यक्ति) कोर्टात प्रवेश देण्यात आलेला होता. इतर वेळी न्यायमूर्ती सिन्हा हे कोर्ट नंबर पाच मध्ये बसायचे. परंतु या खटल्यामुळे इतर कोर्टांच्या कामकाजामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून हा खटला कोर्ट नंबर 24 मध्ये होणार होता. कोर्ट नंबर 24 हे न्यायालयाच्या इमारतीमध्ये शेवटच्या टोकाला होते. सकाळी नऊ वाजेपासूनच कोर्टाभोवती गर्दी जमायला सुरुवात झाली. 24 नंबर कोर्टामध्ये अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती त्या दिवशी उपस्थित होत्या. मधु लिमये, शाम नंदन मिश्रा, पिलू मोदी, रवी राय यासारखे विरोधी पक्षातील अत्यंत वजनदार नेते त्या दिवशी कोर्टात हजर होते. इंदिरा गांधींची उलट तपासणी पाहण्यासाठी ते थेट दिल्लीहून अलाहाबादला आले होते. इंदिरा गांधी यांच्या पक्षातर्फे श्रीमती इंदिरा गांधी यांचे पुत्र श्री राजीव गांधी यांच्या पत्नी श्रीमती सोनिया गांधी या देखील यावेळी कोर्टामध्ये उपस्थित होत्या. राजनारायण यांचा स्वभाव फटकळ होता. त्यामुळे इतर वेळी त्यांना कोर्टामध्ये उपस्थित राहण्यास त्यांचे वकील शांतीभूषण मनाई करत. परंतु त्या दिवशी त्यांना कोर्टात उपस्थित राहू देण्यास शांतीभूषण राजी झाले. अर्थात शांत राहण्याच्या अटीवर.
ठीक सकाळी दहा वाजता खटला चालू होणार होता. दहास दोन मिनिटे बाकी असताना न्यायमूर्ती जे. एल. सिन्हा यांनी कोर्टात प्रवेश केला. सर्वजण उठून उभे राहिले. यानंतर सिन्हा यांनी जाहीर केले की कोर्टाच्या कामकाजाच्या नियमानुसार साक्षीदार कोर्टात आल्यास कोणीही उभे राहू नये. परंतु इंदिरा गांधींनी प्रवेश करतच काही लोक उभे राहिलेच. साधारणपणे साक्षीदार हे साक्षीदारांसाठी असलेल्या कठड्यात उभे राहतात. परंतु इंदिरा गांधींसाठी न्यायमूर्तींच्या उजव्या हाताला न्यायाधीशांच्या आसनाच्या उंची एवढे एक विशेष आसन लावण्यात आले होते. त्यावर इंदिरा गांधी स्थानापन्न झाल्या. त्या शांत आणि स्थिर वाटत होत्या.
इंदिरा गांधींची साक्ष
इंदिरा गांधींचे वकील श्री खरे ना साक्ष घेण्यासाठी बोलवण्यात आले त्यांच्या चर्ये वरून ते उत्साहित दिसत होते. या साक्षींमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे ठरणार होते एक म्हणजे स्वतः इंदिरा गांधी उमेदवार कधी बनल्या? दुसरे म्हणजे यशपाल कपूर यांनी राजीनामा कधी दिला? श्री खरे यांनी इंदिरा गांधींची घेतलेली साक्ष याच मुद्द्यांविषयी होती. या साक्षी दरम्यान त्या जे काही सांगणार होत्या ते या खटल्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार होते.
श्री खरे यांच्या प्रश्नावर इंदिरा गांधींनी मान्य केले की त्यांनी डिसेंबर 1970 मध्ये लोकसभा बरखास्त केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. पुढे इंदिरा गांधी म्हणाल्या की त्यांना जेवढे आठवते आहे त्यानुसार त्यांना पत्रकारांद्वारे प्रश्न विचारण्यात आला की विरोधी पक्षातील लोक म्हणत आहेत की पंतप्रधान आपला मतदारसंघ रायबरेली च्या ऐवजी गुडगाव करणार आहेत. मला जेवढे आठवते त्यानुसार मी या प्रश्नाचे उत्तर दिले होते की मला गुडगाव मधून उमेदवार म्हणून उभे राहायचे नाहीये.
श्री खरे: तुम्ही पत्रकार परिषदेत विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर ‘No, I am not’ असे दिले होते का?
श्रीमती गांधी: मला फक्त तेव्हा एवढेच म्हणायचे होते की मी गुड़गाव मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही. तसेही या गोष्टीला आता खूप दिवस झालेले आहेत मला ठळक जास्त काही आठवत नाही. परंतु माझ्या या उत्तराचा अर्थ असा कधीही नव्हता की मी माझा मतदारसंघ बदलणार नाही. त्याचा सरळ अर्थ फक्त एवढाच होता की मी गुडगाव मधून निवडणूक लढवणार नाही.
श्री खरे: काय एक फेब्रुवारी पूर्वी तुम्ही कधीही श्री यशपाल कपूर यांना रायबरेली मधून तुमची उमेदवारी जाहीर करण्यासाठी सांगितले होते काय?
श्रीमती गांधी: जिथे मी एक फेब्रुवारी 1971 पूर्वी निवडणूक लढवण्याचेच ठरवले नव्हते तिथे त्यापूर्वी मी कुणालाही माझी उमेदवारी जाहीर करण्यासाठी कसे काय सांगू शकते सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
यशपाल कपूर यांच्या राजीनाम्या विषयी प्रश्न विचारल्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी म्हणाल्या की जानेवारी 1971 च्या दुसऱ्या आठवड्यात कधीतरी श्री यशपाल कपूर यांनी त्यांच्याजवळ कार्यमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा त्यांनी यशपाल कपूर यांना सांगितले की नीट विचार करा आणि अंतिम निर्णय घ्या यानंतर 13 जानेवारी रोजी श्री कपूर मला येऊन भेटले आणि त्यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय ठाम असल्याचे मला सांगितले यानंतर मी संमती दिली आणि त्यांना पी एन हक्सर यांना भेटून उर्वरित सोपस्कार (formalities) पूर्ण करण्यास सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की माझ्या माहितीनुसार पंतप्रधान सचिवालयाचे मुख्य पी एन हक्सर हे यशपाल कपूर यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी सक्षम होते.
वायुसेनेचे (Airforce) विमान वापरण्यासंबंधी त्यापुढे म्हणाल्या की त्यांनी वायुसेनेला त्यांच्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टर्स वापरण्यासंबंधी कुठल्याही प्रकारच्या विशिष्ट सूचना केल्या नव्हत्या. तसेच रायबरेलीचे जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांना प्रचाराच्या सभेसाठी कुठलीही व्यवस्था करण्यासंबंधी मी कुठल्याही सूचना केलेल्या नव्हत्या.
ही साक्ष साधारणतः तासभर चालली.
इंदिरा गांधींची उलट तपासणी
आता शांतीभूषण यांची पाळी होती. त्यांच्यासाठी आज खूप महत्त्वाचा दिवस होता. भारताच्या एखाद्या पंतप्रधानाला कोर्टात प्रश्न विचारणारे, उलट तपासणी घेणारे ते पहिले व्यक्ती होते आणि हे वर्तमानपत्रातून सर्व देशाला कळणार होते. या खटल्याचे किती दूरगामी राजकीय परिणाम होणार याचा अंदाज त्यांना होता.
शांती भूषण यांनी उलट तपासणी सुरुवात केल्यानंतर श्री यशपाल कपूर यांच्या सचिवालयातील कामाबद्दल काही दुसरी प्रश्न विचारले. यानंतर मात्र त्यांनी काँग्रेसच्या जंतर-मंतर कार्यालयातून प्राप्त केलेल्या पत्राचा वापर करण्याचे ठरवलं. सर्वप्रथम श्री शांतिभूषण यांनी श्रीमती इंदिरा गांधींना हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली तीन पत्रे दाखवले. हेतु हा की या पत्रांना इंदिरा गांधींनी ओळखावे की ही पत्रे 1959 च्या हिमाचलप्रदेशातील लोकसभा मध्यवधी निवडणुकांच्या (by-election) संबंधी आहेत.
श्री शांती भूषण: तुम्ही 1959 च्या निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी मदत करण्याबद्दल हिमाचल प्रदेशच्या उपराज्यपालांना पत्र लिहिले होते काय?
या प्रश्नावर इंदिरा गांधींचे वकील श्री खरे यांच्याद्वारे आक्षेप घेण्यात आला. तेव्हा श्री शांती भूषण यांनी ते पत्र इंदिरा गांधी यांना दाखवले.
श्रीमती गांधी: राज्यपालांनी या पत्रामध्ये वापरलेला परीक्षा हा शब्द चुकीचा आहे. परीक्षा म्हणजे काहीही असू शकते. परीक्षा म्हणजे निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासंबंधीची जबाबदारी, जी उपराज्यपालांची सर्वोच्च जबाबदारी असते, असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो.
हा प्रश्न आणि त्याचे उत्तर हे दोन्हीही खूप महत्त्वाचे होते. शांतीभूषण यांनी गोडपणे हे देखील दाखवून दिले की एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष राज्यपालांना कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासंबंधी कुठलीही जबाबदारी एक परीक्षा म्हणून कसा काय देऊ शकतो?
यानंतर इंदिरा गांधी यांना श्री यशपाल कपूर यांच्या राजीनामा विषयी बरेच प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नाच्या उत्तरा दाखल इंदिरा गांधी यांनी हे अमान्य केले की त्यांना निवडणुकीत मदत करण्यासाठी 1967 साली यशपाल कपूर यांना पदावरून मुक्त करण्यात आले होते. इंदिरा गांधी यांनी हे देखील मान्य केले ही राजीनामा देतानाच निवडणूक संपल्यानंतर श्री यशपाल कपूर यांना पुन्हा सचिवालयात पदावर घेण्यात येईल हे ठरलेले होते.
श्री शांती भूषण: तुम्ही श्री यशपाल कपूर यांना पुन्हा रुजू होण्याविषयी विचारले नव्हते काय?
श्रीमती गांधी: हो मी विचारले होते.
श्री शांती भूषण: श्री कपूर यांनी त्यांना रुजू करून घ्यावे म्हणून तसा एखादा लिखित अर्ज तुमच्याकडे केला होता काय?
श्रीमती गांधी: मला वाटतं, नव्हता केला. श्री कपूर हे एखाद्या संधीच्या शोधात होते आणि मला वाटले की सचिवालयात पुन्हा रुजू होण्यासाठी त्यांची इच्छा असेल म्हणून मी त्यांना कसे विचारले आणि ते सचिवालयात पुन्हा रुजू देखील झाले.
आता श्री शांती भूषण यांनी श्री कपूर यांच्या 1971 च्या राजीनामे विषयी काही प्रश्न इंदिरा गांधींना विचारले. त्यांनी सुचवले की इंदिरा गांधींच्या प्रचारात मदत करण्यासाठीच यशपाल कपूर यांनी राजीनामा दिला. यावर इंदिरा गांधींनी याच नकार दिला आणि म्हणाल्या की 13 जानेवारी रोजी मी रायबरेली मधून निवडणूक लढवणार हेच निश्चित झालेले नव्हते. शांत भूषण आणि इंदिरा गांधींना विचारले की श्री यशपाल कपूर यांच्या राजीनाम्याचा कुठलाही कागद तुम्हाला सादर करण्यात आला होता काय? यावर उत्तरा दाखल इंदिरा गांधी म्हणाल्या की मला सांगण्यात आले होते की श्री कपूर यांना 13 तारखेपर्यंत पगार देण्यात आलेला होता. श्री हक्सर यांनी देखील मला श्री कपूर यांनी 13 जानेवारीलाच राजीनामा दिल्याचे सांगितले. त्यांच्या राजीनामाचे गॅझेट मध्ये आलेले नोटिफिकेशन देखील मी पाहिले आहे. आणि 14 जानेवारी नंतर ते सचिवालयात देखील आले नाही.
श्री शांती भूषण: श्री यशपाल कपूर यांनी 14 जानेवारीलाच राजीनामा दिला हे तुम्हाला एवढ्या स्पष्टपणे कसे लक्षात आहे?
श्रीमती गांधी: कारण 13 जानेवारीला माझा आणि त्यांचं बोलणं झालं होतं
श्री शांती भूषण: काय तुम्ही स्वतः त्यांचा राजीनामा स्वीकारला होता?
श्रीमती गांधी: नाही.
श्री शांती भूषण: एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्याला विधिवत एखाद्या पदावर (नियुक्तीचे पत्र – appointment letter देऊन) नियुक्त करण्याच्या आधी तुम्ही त्या व्यक्तीला तोंडी आदेशाद्वारे एखादा पदभार ग्रहण करायला कधी सांगितले आहे असे तुम्हाला आठवते का? ( शांतीभूषण यांनी हा प्रश्न विचारला कारण स्वतः पी एन हक्सर यांनी कोर्टासमोर साक्ष देतांना तसे सांगितले होते की नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदी हक्सर यांची नियुक्ती इंदिरा गांधींनी तोंडी आदेशाद्वारेच केली होती)
श्रीमती गांधी: मी असं कधी केल्याचं मला तरी आठवत नाही.
श्री शांती भूषण: तुमच्या सचिवालयामध्ये तिथल्या प्रभारी सचिवाला तुमचा ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी तोंडी आदेशाद्वारे नेमण्याचा अधिकार कुठल्या नियमाद्वारे देण्यात आलेला आहे? असा कुठला नियम किंवा कायदा तुम्हाला माहिती आहे का?
श्रीमती गांधी: त्याला असे करता येईल असा कुठलाच नियम मला माहिती नाही. परंतु असे करायला मज्जाव करेल असाही कुठलाही नियम मला माहिती नाही.
श्री शांती भूषण: साधारण कुठल्या दिवसांपासून तुम्ही रायबरेली इथून उमेदवार म्हणून उभे राहणार आहात हे निश्चित झालं?
श्रीमती गांधी: मला आठवते तसे मी कमलापती त्रिपाठी आणि रायबरेली मधील स्थानिक कार्यकर्ते यांच्याशी बोलल्यानंतरच मी माझी उमेदवारी जाहीर केली आणि मला आठवते तसे हे 01 फेब्रुवारी 1971 नंतरच झाले.
या वरती शांती भूषण यांनी त्यांना 15 जानेवारी 1971 रोजी प्रकाशित झालेला वर्तमानपत्रातील बातमी दाखवली. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की काँग्रेस संसदीय समितीने पक्षाच्या खासदारांनी (संसदेच्या सभासदांनी) आपल्या सध्याच्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी असे ठरवण्यात आलेले आहे. याद्वारे श्री शांतिभूषण यांना सुचवायचे होते की ज्या आर्थिक इंदिरा गांधी देखील संसद सदस्य आहेत त्याअर्थी त्यांना सुद्धा हा निर्णय लागू होतो.
यावर इंदिराजींनी उत्तर दिले की असा काही निर्णय घेतलेला त्यांना माहिती नाही. आणि तसे देखील पंतप्रधान आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांनी कुठून उमेदवारी जाहीर करायची हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्या त्या नेत्यांना देण्यात येते. यानंतर श्रीशांतिभूषण यांनी इंदिरा गांधींना त्यांच्या दौऱ्याचा वेळापत्रक दाखवले या दौऱ्याच्या कार्यक्रमात 28 जानेवारी 1971 रोजी रायबरेली येथील दौऱ्यामध्ये सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे रायबरेली मध्ये नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जाण्याचे नियोजन दाखवण्यात आलेले होते. हा दौऱ्याचा कार्यक्रम दाखवून त्यांनी इंदिरा गांधींना विचारले
श्री शांतीभूषण: या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्याआधी तुमची संमती घेण्यात आली होती की नाही?
श्रीमती गांधी: होय. हा दौऱ्याचा कार्यक्रम माझ्या संमतीनेच जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु यात मी त्या दिवशी नामांकन भरायला जाणार आहे हे जे यात दर्शवलेले आहे ते मात्र चुकीचे आहे. नामांकनाचा हा कार्यक्रम या दौऱ्यामध्ये केवळ योगायोगाने जोडलेला असावा. मी रायबरेली मधून उभे राहायचे निश्चित केल्यास मला नामांकन भरता यावे म्हणून कदाचित दौऱ्यात हा कार्यक्रम जोडलेला असावा. मला असेही सांगण्यात आले होते की नामांकन दाखल केल्यानंतर सुद्धा मला नामांकन परत घेता येते.
यानंतर त्यांना वायुसेनेची विमाने आणि प्रचार दौऱ्यासाठी सभेमध्ये पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेड्स वगैरे तयारी विषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभा करतील असे देखील काही प्रश्न विचारण्यात आले जे निवडणुकीशी संबंधित नव्हते.
दिवसा अखेर कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत देखील उलट तपासणी संपली नव्हती. दुसऱ्या दिवशी पुन्हा इंदिराजी उलट तपासणीस सामोरे जाणार होत्या. पहिल्या दिवसाची उलट तपासणी संपल्यानंतर कन्हैयालाल मिश्रा यांनी इंदिरा गांधींना लिहिले “मी ऐकले की पहिल्या दिवशीचीउलट तपासणी सुरळीत झाली मला त्याचा आनंदही आहे. तरी देखील तुम्ही उलट तपासणीसाठी कोर्टात हजर राहायला नको होते या माझ्या मतावर मी कायम आहे.” मिश्रा यांची भविष्यवाणी खरी ठरणार होती. इंदिरा गांधींना त्यांचे म्हणणे न ऐकल्याबद्दल निश्चितच पश्चाताप होणार होता .
संध्याकाळी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांना शांतीभूषण यांच्या घरी चहापानाचे आमंत्रण होते. विरोधी पक्षातील सर्व नेत्यांचे मत पडले की इंदिरा गांधी उलट तपासणीस उत्तम प्रकारे सामोरे गेल्या. पिल्लू मोदींना ही उलट तपासणी काही आवडली नाही. ते शांतिभूषण यांना म्हणाले देखील – “तू तिची खेचत का नाही? तिला थोडं परेशान कर.” भूषण यांनी स्मितहास्य केले. ते म्हणाले की आज मी मुद्दामहून तिचा आत्मविश्वास वाढवला आहे. आहे. उद्या त्या सापळ्यात नक्की अडकणार आहेत. ते किती गांभीर्याने बोलत होते याचा अंदाज त्या दिवशी तिथे बसलेल्या कुणालाच आला नव्हता.
दुसऱ्या दिवशी कोर्ट पुनः सुरू झाले. शांती भूषण यांनी दुसऱ्या दिवशी केवळ नऊ मिनिटात आपली उलट तपासणी पूर्ण केली. आता बाजू पूर्णपणे उलटणार होती. दुसऱ्या दिवशी उलट तपासणी पुन्हा प्रश्नोत्तरे सुरू झाली
श्री शांतीभूषण: 13 जानेवारी नंतर तुम्ही श्रेयसपाल कपूर यांना पुढे कधी भेटला?
श्रीमती गांधी: 13 जानेवारी नंतर मी श्री कपूर यांना एक फेब्रुवारी 1971 ला रायबरेलीलाच भेटले
श्री शांतीभूषण: परंतु श्री यशपाल कपूर यांनी या कोर्टासमोर जबाब दिलेला आहे की 21 जानेवारी ते 26 जानेवारी 1971 दरम्यान ते दिल्लीतच होते आणि या कालावधीत ते तुम्हाला दोन वेळा भेटले. त्यांची ही साक्ष चुकीची आहे का?
श्रीमती गांधी: ते कदाचित बरोबर असतील. मी रोज असंख्य लोकांना भेटते. त्यामुळे मला खात्रीशीरपणे काही सांगता येणार नाही.
यानंतर श्रीशांतीभूषण यांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढण्याचे ठरवले.
1971 ते 75 या दरम्यान कधीतरी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) इंदिरा गांधी यांची उमेदवारी 29 जानेवारी रोजी जाहीर केली होती. ती ही रायबरेली मधून. AICC च्या या निर्णयाची प्रत अतिरिक्त कागदपत्र (additional written statement) म्हणून इंदिरा गांधींच्या वकिलांनीच जोडले होते.
इंदिरा गांधींच्या उलट तपासणीची सर्व तयारी भारतातले प्रख्यात कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांनी करून घेतली होती. जेव्हा उलट तयारीसाठी या खटल्याची कागदपत्रे ज्येष्ठ विधीज्ञ नानी पालखीवाला यांना पाठवण्यात आली तेव्हा कदाचित नजर चुकीने हा कागद त्यांना पाठवायचा राहून गेला. त्यामुळे नानी पालखी वाला यांनी इंदिरा गांधींची जय्यत तयारी करून घेतली. परंतु या कागदपत्राविषयी तयारी करायचे राहून गेले. इंदिरा गांधींना या कागद पत्रविषयी काहीच अंदाज नसल्यामुळे आदल्या दिवशी साक्षी दरम्यान त्यांनी आपल्या उमेदवारीबद्दल अनेक विसंगत विधाने केली होती.
रायबरेली मधून निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय आपण 01 फेब्रुवारी रोजीच घेतला होता या आपल्या भूमिकेवर त्या आदल्या दिवशीपर्यंत (साक्ष देतांना) ठाम होत्या. पण हा AICC चा कागद मात्र ओरडून सांगत होता की त्यांची उमेदवारी AICC ने 29 जानेवारी रोजीच जाहीर केली होती. याविरुद्ध जाईल असला कुठलाच पुरावा अस्तित्वात नाही अशी खात्री असल्यामुळे पहिल्या दिवशी त्यांचा एकंदर वावर आत्मविश्वासाचा होता.
त्यामुळे जेंव्हा उमेदवारीच्या तारखांच्या या विसंगती बद्दल शांतीभूषण यांनी विचारले असता त्या गडबडल्या.
श्री शांतीभूषण: तुमच्या मतदार संघाबद्दल निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे का?
श्रीमती गांधी: कॉंग्रेस पक्षाने माझ्या मंतदारसंघाबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाही. हो, परंतु एकदा मी निर्णय ठरला की तो पक्षाचा निर्णय असतो. कारण पक्षाने ही बाब (माझ्या मंतदारसंघाचा निर्णय ) माझ्यावर सोपवलेली आहे.
मग श्री शांतिभूषण यांनी श्रीमती इंदिरा गांधींचे लक्ष त्यांनी दाखल केलेल्या अतिरिक्त लिखित स्टेटमेंट कडे (ज्याचा उल्लेख वरती करण्यात आलेला आहे) वेधले. या स्टेटमेंट मध्ये त्यांनी हे मान्य केले होते की कोंग्रेस चे के एन जोशी यांनी इंदिरा गांधींच्या मतदार संघाविषयी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 29 जानेवारी 1971 रोजी जाहीर केलेला अंतिम निर्णय (इंदिरा गांधी रायबरेली मधून निवडणूक लढवणार आहे हा तो निर्णय) इंदिरा गांधींना कळवलेला होता.
आता मात्र इंदिरा गांधी गडबडल्या. स्वतःचा आत्मविश्वास त्या दाखवत असल्या तरी त्या अतिशय अस्वस्थ झाल्या. यावर त्यांनी थातूरमातूर उत्तर दिले की काल साक्ष देताना त्यांना या गोष्टी आठवल्या नाहीत.
शांती भूषण यांनी पुढे उलट तपासणी चालू ठेवली
श्री शांतीभूषण: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) 29 जानेवारी 1971 रोजी तुमच्या मतदारसंघाविषयी कुठलीही घोषणा केलेली नाही याविषयी तुम्ही ठाम आहात?
श्रीमती गांधी: AICC ने अशी कुठली घोषणा केली होती याविषयी मला तरी माहिती नाही.
श्री शांतीभूषण: मग एक सांगा की तुम्ही हे Additional Written Statement त्यावर सही करण्याआधी वाचले होते का?
श्रीमती गांधी: मी ते स्टेटमेंट सही करण्याआधी निश्चितच वाचले होते आणि माझ्या एकंदर क्षमतेनुसार त्यात जे काही लिहिले आहे ते बरोबर नमूद केलेले आहे हे मी काळजीपूर्वक तपासले होते. तरी देखील मला म्हणायचे आहे की हे Additional Written Statement कायदेशीर भाषेत लिहिलेले असल्यामुळे मला ते समजायला अवघड गेले.
हे विधान (statement) फार महत्त्वाचे होते.
शांतीभूषण यांना अजून बरेच प्रश्न विचारायचे होते. असे असून देखील त्यांनी आपली उलट तपासणी या मुद्द्यावरच थांबवली. कारण इंदिरा गांधींच्या या विधानामुळे त्यांना या खटल्यात जो फायदा मिळणार होता तो त्यांना गमवायचा नव्हता. इंदिरा गांधींनी हे विधान करून काय घोडचूक करून ठेवली होती तिथे उपस्थित असलेल्या सर्वसामान्य लोकांना कळले नाही. त्याचे महत्व श्री शांतीभूषण यांच्यातर्फे पुढे युक्तिवाद (argument) सुरु केल्यानंतर लक्षात येणार होते.
परंतु इंदिरा गांधींच्या या विधानाने वृत्तपत्रांना सनसनाटी हेडलाईन मिळाली होती. दुसऱ्या दिवशी बातमी वृत्तपत्रांमधून छापून आले-
‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पंतप्रधानाच्या उमेदवारी बाबत घेतलेला निर्णय पंतप्रधानांनाच माहिती नव्हता.’
दुसऱ्या एका वृत्तपत्राने छापले की
‘पंतप्रधानांना कायदेशीर भाषेत लिहिलेले समजत नाही.’
महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी देऊन झाल्या होत्या. साक्षी आणि उलट तपासण्या झाल्यानंतर कुठल्याही खटल्यामध्ये दोन्ही बाजू आपले दावे-प्रति दावे अटीतटीने लढवतात. दोन्ही बाजूंकडून उलट तपासण्या करून झाल्या होत्या. कोर्टासमोर वाद-प्रतिवाद हा 21 एप्रिल 1975 ला सुरू होणार होता. या दोन्ही बाजूंच्या वाद प्रतिवादामध्ये महत्त्वाच्या साक्षीदार इंदिरा गांधीच ठरणार होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून जय्यत तयारी सुरू झाली.
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद सुरू होण्यापूर्वी 16 एप्रिल रोजी अजून एक महत्त्वाची वाट घटना घडली होती. राजनारायण यांच्या वकिलाने लोकप्रतिनिधी कायद्यात (Representation of People (amendment) Act) करण्यात आलेल्या बदलांच्या संविधानात्मक योग्यतेबद्दल (constitutional validity) आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या मते या बदलांना पूर्वलक्षी प्रभावाने (retrospectively) लागू करणे हे संविधानाच्या कलम 14 चा भंग करणारे होते. राजनारायण हे जेलमध्ये कैदेत होते. सविनय कायदेभंगाच्या आरोपाखाली (civil disobedience) त्यांना अटक करण्यात आली होती. राजनारायण यांच्यासाठी हे नवीन नव्हते. भारत स्वतंत्र झाल्यापासून त्यांची ही 52 वी तुरुंगवारी होती. देश स्वतंत्र झाल्यापासून पुढच्या काळापैकी जवळपास अर्धा काळ त्यांनी तुरुंगात व्यतीत केला होता.
तोपर्यंत मधल्या काळात न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी महत्त्वाची कागदपत्रे तपासून घेतली होती 2 एप्रिल रोजी त्यांनी वादग्रस्त निळे पुस्तक देखील तपासले होते. ही सर्व तीच कागदपत्रे होती जी कोर्टात सादर होऊ नये म्हणून इंदिरा गांधी पक्षाने राज्याच्या विशेषधिकारचा (state privileges) मुद्दा वापरला होता. तुम्हाला या आधीच लेख आठवत असेल की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की न्यायमूर्ती सिन्हा ही कागदपत्रे तपासून हे ठरवतील की यातील कुठल्या कागदपत्रांवर विशेष अधिकार लागू आहे आणि कुठल्या कागदपत्रांवर नाही. हे सर्व सोपस्कार पार पाडून न्यायमूर्ती सिन्हा यांनी बहुतांश कागदपत्रे ही खटल्यामध्ये प्रदर्शित करण्यास उपलब्ध करून दिली आणि पुरावा म्हणून दाखल करून घेतली.
आता कोर्टात सुरू होणार होती खरी लढाई…