
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आपला भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला. परंतु हैदरबादसारखे मोठे संस्थान मात्र निजामाच्या राजकीय महत्वाकांक्षेपायी स्वतंत्र राष्ट्र होण्याच्या तयारीत होते. अनेक वीरांनी यासाठी लढा दिला. मोठा त्याग केला, आपल्या प्राणांचे बलिदान केले. या सर्वांच्या प्रयत्नातुन मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. म्हणून मराठवाड्यापुरता तरी १७ सप्टेंबेर, १९४८ हाच स्वातंत्र्यदिन आहे असे म्हणता येईल. तर आशा या महत्वाच्या दिनी मराठवाड्याशी आणि मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामशी संबंधित लेखमाला प्रकाशित करत आहे. दर आठवड्यास एक लेखप्रकाशित केला जाईल. काही ज्ञात-अज्ञात बाबी आपल्या सर्वांना माहिती व्हाव्यात हा हेतु. या शृंखले मधील पहिला लेख मराठवाडा मुक्ती संग्रामाविषयी विषयी.
प्रथम ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हैदराबादचा लढा हा केवळ संस्थानच्या विलीनीकरणाचा लढा नाही तर तो भारताच्या प्रादेशिक सलगतेचा आणि भारताच्या भारत म्हणून अस्तित्वात येण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. केवळ एका संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा या नात्याने आपण आता या लढ्याकडे पाहता कामा नये. भारताच्या कोणत्याही भूभागावर जेवढ्या उग्र स्वरूपामध्ये स्वातंत्र्याचे आंदोलन झाले तेवढ्या उग्र रूपात हैदराबादमध्ये झाले हे आपण विसरता कामा नये. कारण हा मुद्दा अतिशय आग्रहाने मांडावा अशी स्वामी रामानंद तीर्थांचीच इच्छा होती. आपण तो कसा मांडावा हे त्यांना कळत नव्हते. पण स्वामीजींचे आत्मवृत्त आपण वाचाल तर त्या आत्मवृत्तामध्ये तीन- चार ठिकाणी असा उल्लेख आहे की, वीस हजार सत्याग्रही तुरुंगात होते. खरे तर स्वामीजींच्या आत्मवृत्तात या भाकडांना काहीही महत्त्व नाही तरीही वीस हजार सत्याग्रही तुरुंगात होते याचा उल्लेख त्यांनी पुन्हा पुन्हा केला आहे.
मी स्वामीजींना विचारले की, हा आकडा पुन्हा पुन्हा लिहिण्यास पुनरुक्ती झाली असे आपणास वाटत नाही काय ? किती हजार याची आवश्यकता तुमच्या आत्मवृत्तात का ? तुमच्या ग्रंथात माहितीचा तपशील फारसा नाही. आकडेवारीत बोलण्यासाठी तुम्ही प्रसिद्ध नाही. मी असे प्रश्न विचारावे आणि स्वामीजींनी ते सहन करावे असेच आमचे गाढ आत्मीयतेचे संबंध होते.
माझ्या प्रश्नावर स्वामीजी म्हणाले, “खरा मुद्दा पुनरुक्तीचा नाही. महात्मा गांधीनी या देशात चैतन्याची एक लाट निर्माण केली. ही लाट या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरल्यावर आणि गांधींच्या पाठीशी अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे वीस एवढे दीर्घ स्वातंत्र्य आंदोलन असतानाही आणि ते स्वतः अलौकिक कर्तृत्वाचे असतानाही भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये एकोणीसशे तीस साली जे जास्तीत जास्त सत्याग्रही तुरुंगात गेले त्यांची संख्या दीड लक्ष आहे. चाळीस कोटी लोकसंख्येला दीड लक्ष हे प्रमाण घेतले तर चार कोटीला पंधरा हजार येतात. आमचे संस्थान एक कोटी साठ लक्ष वस्तीचे. आम्ही सहा हजार सत्याग्रही पाठविले असते तरीही आमच्या आंदोलनाची तीव्रता गांधीनी भारतभर केलेल्या आंदोलनाच्या बरोबर राहिली असती. या सहा हजारांची तिप्पट. अठरा हजार होते. याहीपेक्षा आमचे सत्याग्रही दोन हजारांनी जास्त होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा जेवढ्या उग्र स्वरूपात हैदराबादला लढला गेला तेवढ्या उग्र स्वरूपात तो इतरत्र कुठेही लढला गेला नाही हे कुणी तरी लक्षात घ्यावे यासाठी मी वीस हजार हा आकडा पुन्हा पुन्हा लिहिला आहे.
मी विचारले, “हे तुम्हीच का नाही लिहिले ?”
ते म्हणाले, “मीच या आंदोलनात नेता होतो. मी संन्यासी, संन्याशाने हे लिहिले तर त्यात त्याची अहंता दिसते. “
असो. हा मुद्दा आता आपणासमोर स्पष्ट झाला असेल. आणखीही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. ती गोष्ट अशी, भारतामध्ये जे सशस्त्र आंदोलनाचे प्रयत्न झाले त्यातला सर्वव्यापी व सर्वांत मोठा असा प्रयत्न बेचाळीस सालचे आंदोलन हा होय. या आंदोलनासंबंधी त्या वेळच्या इंग्रजी सरकारचे म्हणणे असे की त्यात नेते, अनुयायी आणि चिल्लर म्हणून एकूण दहा हजार लोक समाविष्ट झाले होते. काँग्रेसचे म्हणणे असे की या आंदोलनात सुमारे चाळीस हजार लोकांनी सहभाग घेतला. ठीक आहे. आपण चाळीस हजार हीच संख्या मान्य करू. याच वेळी बाजूला सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचाही संघर्ष चालू होता. या सेनेत बारा हजार लोकांचा सहभाग होता. शिवाय आठ-दहा हजार लोक सहानुभूती असणारे होते. हे सर्व गृहीत धरले तर सशस्त्र आंदोलनात सहभाग घेणाऱ्या भारतीयांची एका वेळची सर्वांत मोठी संख्या चाळीस हजार व एकूण संख्या साठ हजार येते. या आंदोलनाच्या तीव्रतेनुसार हैदराबाद संस्थानात एका वेळी दीड हजार अथवा एकूणं अडीच हजार सशस्त्र लोकांनी सहभाग घेतला असता तर त्या आंदोलनाची उत्कटता आणि तीव्रता भारतीय पातळीपर्यंत गेली असती.
प्रत्यक्षात हैदराबादच्या सशस्त्र आंदोलनात भाग घेणारांची संख्या एकवीस हजार होती. सत्याग्रह करणाऱ्यांतील बहुतेक सशस्त्र आंदोलनात सहभागी होते. सशस्त्र आंदोलनाची अधिकृत जबाबदारी स्टेट काँग्रेसने स्वीकारली. अखिल भारतीय काँग्रेसच्या इतिहासात आंदोलनाची जबाबदारी काँग्रेसने स्वीकारली अथवा आंदोलनाला मार्गदर्शन काँग्रेसने केले असे एकमेव आंदोलन हैदराबादचे आहे. उरलेल्या सगळ्या ठिकाणी काँग्रेसमध्ये असणाऱ्या मंडळींनीच आंदोलन केले असले तरी काँग्रेसने त्या आंदोलनाची जबाबदारी नाकारलेली आहे. बेचाळीसचे आंदोलन आपण केले असे अखिल भारतीय काँग्रेसचे म्हणणे नाही. सरकारने नेत्यांना अटक केल्यावर लोक प्रक्षुब्ध झाले आणि त्यांना आवरायला कोणीच नसल्याने त्यांच्या हातून जी हिंसा घडली असेल तिची जवाबदारी ब्रिटिशांवर आहे व त्या हिंसेला आपण जबाबदार नाही असे गांधींचे म्हणणे आहे. या उलट स्वामीजींचे म्हणणे आहे की, हिंसा त्यांच्या आज्ञेने झाली. आमच्या कृतिसमितीचे म्हणणे आहे की, झालेल्या सर्व हिंसेचे दायित्व आम्ही आमच्या डोक्यावर घेतो; कारण आम्ही सशस्त्र आंदोलन करीत असल्याने आमच्या आज्ञेने ती हिंसा झालेली आहे.
हैदराबादच्या आंदोलनाची ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ही यासाठी लक्षात ठेवायला पाहिजेत की, हा प्रश्न हिंसा – अहिंसेचा नव्हता. भारताची प्रादेशिक अखंडता शिल्लक राहते की नाही असा हा प्रश्न होता. जी उग्रता प्रश्नाची होती तीच आंदोलनाची होती. कृपया एक गोष्ट लक्षात घ्या, अखिल भारतीय नेत्यापेक्षा आमचे नेते योग्यतेने मोठे होते असे मला सुचवायचे नाही. आमचे सगळेच नेते अखिल भारतीय नेत्यांचेच अनुयायी होते. मी एवढेच सांगत आहे की, आमचे नेते भारतीय नेत्यांचे अनुयायी असल्याने का होईना, वातावरणाची अनुकूलता असल्याने का होईना, भोवताली भारतातून आम्हाला सारखे उत्तेजन मिळत होते म्हणून का असेना, कारणे कोणतीही असोत स्वातंत्र्याचा सगळ्यात उग्रतम असा लढा हैदराबादला झालेला आहे.
भांगडिया स्मारक व्याख्यानमालेतील नरहर कुरुंदकर यांच्या व्याख्यानातून साभार




