पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात वापरात असलेले अनेक शब्द आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यातलाच एक शब्द म्हणजे भगूने. भगूने म्हणजे स्वयंपाक घरात वापरायचे एक भांडे. आज आपण पातेले म्हणतो तसे.
पूर्वीच्या काळी शेतकरी कुटुंबात एखादे धातूचे पातेले असायचे. पितळ, जर्मल किंवा स्टेनलेस स्टील चे. बाकी भांडी ही मातीची असायची. अर्थातच घराची कारभारीण हे भांडे अनेक कामासाठी वापरायची. पाहुण्यांचे चहापाणी यात व्हायचे, भाकरी करताना पिठात पाणी घालण्यासाठी याचा वापर व्हायचा. एखादे कालवण, कोरड्यास या भगोण्यात बनवले जायचे. भाज्यांचे किंवा सांडग्याचे पीठ कालवण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. असे हे भगोणे त्या कारभरणीला हरघडी उपयोगी पडायचे.
मुळात सर्व प्रकारच्या कामात उपयोगी पडणारे हे भांडे बहुगुणी होते. मजबूत, न फुटणारे हे भांडे धुवायला सोपे, वापरायला सुटसुटीत आणि दिसायलाही चांगले. आशा या भांड्याला ‘बहुगुणी’ हे नाव अगदी समर्पक होते. हे भांडे प्रत्येकाच्या पाकघरात असायचेच. अशा या बहुगुणी चे उच्चार बदलून त्याचे झाले ‘भगूने’ किंवा भगोणे.