‘माहादाइसें द्वारावतीएसि गेली होती. तीएं हीवरळीएसि भेटलीं : “जी जी : आम्ही स्रीचांगदेओराउळा गोसावियांचीये गुंफे गेलो होतो : तेथ एक पुरूख बैसले होते : तेयांचीये’ मुखींहूनि रूपेयाचीया सरीया : सरीया ऐसीया नीगति : तें तैसें काइ जी ?” “बाइ : ते तेयांची लाळ : ” “जी :जी :” मीयां तेयांतें पुसिलें : “तुम्हांसि नावं काइ?” “ना : माहादमुनि : तुम्ही कोणाचे अनुग्रहीत?” “ना : अनंतमुनिचे : तुमचे अनंतमुनि कोणाचे अनुग्रहीत?” “ना : स्रीचांगदेओराउळा गोसावियांचे :” तुम्हीं काइ म्हणा?” “ना : अनंतु अनंतु ऐसें म्हणों :” “तुमचे अनंतमुनि काइ म्हणति?”
महादाईसा द्वारकेस जाते. तिथे तिची भेट हिवरळी एस भेटली. आम्ही श्री चांगदेव राऊळांच्या गुफेस भेट देते. तेथे एक पुरुष बसलेले असतात. त्यांच्या मुखातून रुप्याच्या सऱ्यासारखे काहीतरी निघत होते. ते काय? असा प्रश्न ती विचारते. ती त्या पुरुषाची लाळ होती असे तिला उत्तर मिळते. पुढे महादाईसा त्या पुरुषास विचारते की तुमचे नाव काय? तर त्यांनी उत्तर दिले की माहाद मुनी. तुम्ही कुणाचा अनुग्रह घेतला? उत्तर मिळाले की अनंत मुनींचा. यावर पुन्हा प्रश्न केला जातो की अनंत मुनी कोणाचे अनुग्रहित. तर उत्तर मिळाले की श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे. महादाईसा विचारते की, तुम्ही काय म्हणता? आम्ही अनंतु ..अनंतु असे म्हणतो. तुमचे अनंत मुनी काय म्हणतात?
ना : वीद्या आणि पुरुखू माहाराष्ट्रीं असति :” “श्रीचांगदेओराउळी गोसावीं कोणी परी बीजें केलें : तें तूम्ही जाणा?” “ना : तें आम्ही नेणों :” यावरि सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : श्रीचांगदेओराउळी कोणी परी बीजें केलें ऐसें ते केवि जाणति : ते कव्हणीचि नेणति : तें तुम्हांसि एथौनि सांघिजैल :”
विद्या आणि पुरुष महाराष्ट्री आहेत असे म्हणतात. श्रीचांगदेव राऊळ गोसावी यांनी कुठे प्रयाण केले हे तुम्हाला माहीत आहे का? असे विचारता उत्तर मिळते की “नाही आम्हाला ते ठाऊक नाही” यावर सर्वज्ञ महदाईस म्हणतात की “बाई, श्रीचांगदेव राऊळ यांनी कुठे प्रयाण केले हे कोण जाणतो? कुणीच नाही. पण ते तुम्हाला माझ्यापासून कळेल.”
सर्वतें म्हणीतलें : “बाइ : काउरळीची कामाक्षा : ते हटयोगिनी : तीया बहुत सीधसाधक तपापासौनि ढाळिले : ते पुरूखांची साब्दी प्रसीधि आइकौनि रतिचीया चाडा आली :” तेथ ब्रम्हचर्याची प्रवृति : स्रीचांगदेओराउळासि गुंफे आसन होतें : ते रतिचीया चाडा भीतरि एओं बैसली : तवं नैएवे : मग वीनविलें : “जी जी : मज रति देयावी जी :” स्रीचांगदेवोराउळी म्हणीतलें : “एथ ब्रम्हचर्याची प्रवृति : एथ स्रीदतात्रप्रभूची आज्ञा असे : स्रीप्रभूची आज्ञा लंघुनि भीतरि एओं नये :”
सर्वज्ञ पुढे म्हणतात, “बाई, काऊरळीची कामक्षा नावाची हठयोगिनी होती. तिने अनेक सिद्ध साधक तपापासून पथभ्रष्ट केले होते. ती गोसावींची ख्याती ऐकून त्यांना रती करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे आली. चांगदेव राऊळ ब्रह्मचारी होते. ते आपल्या गुफेमध्ये बसलेले होते. कामाक्षा बाहेर येऊन बसली आणि तिने राऊळ प्रभूंनी विनवले की मला रतीप्रेम द्यावे. त्यावर श्री चांगदेव राऊळ तिला म्हणाले की आमची प्रवृत्ती ब्रह्मचर्याची आहे. आम्हाला श्री दत्तप्रभूंची आज्ञा आहे. ती आज्ञा उल्लंघून तू आत येऊ नकोस.
एतुलेनि ते गुंफेचां द्वारी सात अहोरात्रे उभींचि होती : एकु पाओ भीतरि : एकु बाहीरि : ऐसा तीचा आग्रहो देखौनि श्रीचांगदेओराउळी योगअभ्यासें तें पुर त्येजिलें : आणि ते भीतरि आली : पाहे तवं पुर त्येजिलें : तीया म्हणीतलें : “पुरूख खेळीनले : ऐया रे : पुरूख कैसे हटीए ! पुरूखीं देह त्येजिलें : आणिकां पुरूखांतें हटें जींकों ए : तैसें यातें जींकों नये : मां पुरूख सामर्थ्याचे !” ऐसें म्हणौनि नीगाली : तेथिचां भोपी नीक्षेपु केला : सर्वज्ञ म्हणीतलें : बाइ : श्रीचांगदेओराउळांसि मागुतें तें पुर स्वीकारावेयाची प्रवृति होती : परि तेही लाहो केला :”।।
हे ऐकल्यानंतर ती गुहेच्या द्वारी अहोरात्र सात दिवस उभीच होती. एक पाय गुफे आत आणि एक पाय बाहेर ठेऊन उभी राहिली. तिचा हा हट्ट पाहून श्री चांगदेव राऊळांनी योगाभ्यासाच्या द्वारे आपल्या शरीराचा त्याग केला. कामाक्षा ने आत येऊन पाहिले तर काय तर गोसावींनी शरीर त्यागलेले.
ती म्हणते, “पुरुष कसले हट्टी. पुरुषांनी देह त्यागिला. इतर पुरुषांना हट्टाने जिंकता आले तसे यांना जिंकणे शक्य झाले नाही. हे पुरुष सामर्थ्यवान आहेत. असे म्हणून ती निघाली. तिथे त्यांच्या शरीराचा निक्षेप केला. सर्वज्ञ पुढे म्हणाले की “बाई, श्रीचांगदेव राऊळांना ते शरीर स्वीकारायचे होते परंतु …