वाराणसी’ अवघा पव्हा नीगाला : येके दोघे राहीली : तीयें दुख करूं लागली : गोसावीयांतें म्हणति ‘काइ करूंजी : अवघा पव्हा गेला : आम्ही राहीलों :” गोसावीं म्हणीतले : “आम्ही तुमतें नेउनु :” जीए दीसी पव्हा गेला : वाराणसी पावला :तीए दीसी तीयें जनें नेली : तीये अवघेन लोकें देखीली : तेयांतें पूसीलें : “तुम्हीं के नीगालीति?” “ना आजिचि नीगालों :” तेयां आश्चर्य वाटलें : गोसावी आजीचि नेली : एतुकेनि माघौतीं तेधवांचि आणीली : आवघेयां लोकां आश्चर्य जालें : “आजीचि नेली : आजीचि आणीली :” आणि तीये म्हणति : “गोसावी आम्हांसि वाराणसी भेटले : गांवीची म्हणति : “गोसावी गांवीचि असति :” मग तेयांसि वीस्मो जाला : ।।
तीर्थयात्रेला जाणारा जथा निघाला. एक दोघे जण मागे राहिले. ते दुःख करू लागले. ते गोसावींनी म्हणतात की आता काय करू जी? अवघे लोक गेले . आम्ही मात्र मागे राहिलो. गोसावी त्यांना म्हणाले, ” आम्ही तुम्हाला नेऊ. ज्या दिवशी निघालेला जत्था वाराणसीला पोचला, त्या दिवशी हे मागे राहिलेले लोक त्यांनी वाराणशीला नेले. त्यांना वाराणसीला पोचलेल्या लोकांनी बघितले. त्यांना विचारले. “तुम्ही केंव्हा निघालात?” “आम्ही आजच निघालो.” त्यांना आश्चर्य वाटले. गोसावींनी ही मंडळी जशी ज्या दिवशी नेली त्याच दिवशी परत देखील आणली. सर्वांना आश्चर्य झाले. आजच नेले आणि आजच परत देखील आणले. ते लोक सांगत की गोसावी आम्हाला वाराणसीत भेटले. गावाचे लोक सांगत की गोसावी तर इथेच होते. त्या सर्वांना याचा विस्मय वाटला.