शेअर म्हणजे एखाद्या व्यवसायातील किंवा उद्योगातील तुमचा गुंतवणुकीच्या रूपातील हिस्सा किंवा मालकी. शेअर चा शब्दशः मराठी अर्थ म्हणजे वाटा किंवा हिस्सा. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करत असतात तेव्हा खरं तर तुम्ही त्या कंपनीच्या मालकीत भागीदार बनत असतात. तुमची त्या कंपनीत मालकी किती प्रमाणात आहे हे एकूण शेअरच्या प्रमाणात तुमच्याकडे किती शेअर आहेत यावर ठरते. समजा एखाद्या कंपनीचे शंभर शेअर्स आहेत. आणि त्यातले जर दहा शेअर तुम्ही खरेदी केले. तर तुम्ही त्या कंपनीचे दहाव्या हिश्श्याचे किंवा 10 टक्क्यांचे मालक किंवा भागीदार आहात.
कंपनी शेअर विक्रीला का काढते?
एखादा उद्योग किंवा व्यवसाय जेव्हा वाढीला लागतो तेव्हा त्याला अजून वाढ करण्यासाठी सर्वात जास्त गरज पडते ती भांडवलाची. भांडवल उभे करण्यासाठी कंपन्यांकडे वेगवेगळे पर्याय असतात. सर्वात सोपा आणि सर्वांना माहीत असलेले पर्याय म्हणजे स्वतःचे पैसे किंवा मित्र नातेवाईक यांचे पैसे व उद्योगात गुंतवणे. दुसरा उपाय म्हणजे बँकेकडे जाणे आणि बँकांकडून कर्ज घेणे. पण हा उपाय थोडा किचकट आहे. काहीजण व्हेंचर कॅपिटल फंडा कडून सुद्धा भांडवल उभे करतात. हे एक प्रकारचे कर्जच असते. वरील दोन्ही प्रकारात घेतलेले भांडवल परत तर करावेच लागते. त्यासोबत बहुतांश वेळा त्यासोबत व्याजही द्यावे लागते. त्यामुळे कंपनीच्या भांडवलावर आणि नफ्यावर परिणाम होतो.
यामुळे भांडवल उभा करण्यासाठी तिसरा एक पर्याय कंपन्यांनी वाढतात निवडतात. यामध्ये कंपन्यांचे शेअर विक्रीला काढून सामान्य माणसांकडून भांडवल उभे केले जाते. जो व्यक्ती कंपनीचे शेअर खरेदी करतो तो आपला पैसा कंपनीला वापरण्यासाठी देतो. त्याबदल्यात त्याला शेअर्स ची मालकी मिळते. कंपनीला हा पैसा एकदा मिळाला म्हणजे नेहमीसाठी वापरण्यास मिळतो. हा पैसा गुंतवणूकदारास परत करायची गरज नसते. तसेच यावर कुठले व्याजही देणे बंधनकारक नसते. तरीदेखील सामान्य गुंतवणूकदार कंपन्यांचे शेअर खरेदी करून गुंतवणूक करतात. यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा काय फायदा?
गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये (शेअर्समध्ये) गुंतवणूक का करतात?
सामान्य गुंतवणूकदार एखाद्या नामांकित आणि चांगल्या कंपनीतच पैसे गुंतवत असतो. म्हणजे किमान ती कंपनी चांगली आहे आणि ती पुढे भविष्यात वाढेल, मोठी होईल, असा त्याला भरवसा असतो. या विश्वासाच्या जोरावर तो कंपनीत शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करतो. जर त्याच्या भरावश्याप्रमाणे कंपनीने वाढ केली तर त्याच्या शेअरच्या किमती देखील वाढ होते. आणि ही झालेली वाढ हा एक प्रकारे त्याने कंपनीत केलेल्या गुंतवणूकीवरचा त्याचा नफा असतो. या शेअर्स ना तो कधीही विकू शकतो. शेअर्स विकून कंपनीतील आपली गुंतवणूक, मूळ भांडवल आणि नफ्या सहित परत मिळवू शकतो. अर्थात, त्याच्या अंदाजाच्या विरुद्ध जर कंपनीला घोटाळा झाला किंवा कंपनी विकास पावली नाही तर त्याची गुंतवणूक तोट्यात जाते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना ही जोखीम गुंतवणूकदाराला माहीत असायला हवी. आणि बहुतांशी तशी ती त्याला माहिती असते.