गोसावीयांसि येकी ठाई आसन जालें होतें : तवं मुगुताबाइया गोसावीयांतें देखिलें : आली : गोसावीयांसि दंडवत घातलें : श्रीचरणां लागौनि वीनवीलें : “जी जी : माझी पैहां प्राणकुटिका असे : तेथ गोसावीं बीजें करावें :” सर्वतें म्हणीतलें : “बाइ : यासि तेथ बीजें करावेयाची प्रवृति : मां तेथ बीजें केलें :” मग गोसावीयांसि कुसासन बैसों घातलें : जाउनि हे तेथ बैसलें : जटा सोडुनि श्रीचरण झाडिले : मग श्रीचरण प्रक्षाळण केलें : मग यासि बरवी वनपुष्पांची पुजा केली : मग दंडवत घालुनि : दोन्ही हात जोडुनि पुढां उभी ठेली : मग म्हणीतलें : ‘जी जी : माझेया तपाचें फळ आजि जालें जी :’ ‘तें कैसें बाइ?’ ‘ना जी : ऐसेया पुरूखांसी दरीसन जालें जी : ‘ ‘ऐसें होए :’ यासि कंदांमुळांफळांची आरोगण दीधली’ :
गोसावी त्या पर्वतावर एका ठिकाणी बसलेले असतांना योगिनी मुक्ताबाईनी त्यांना पाहिले. मुक्ताबाई आली. तिने गोसावींना दंडवत घातला. त्यांना विनवले. माझी पलीकडे पर्णकुटी आहे. तिथे तुम्ही पायधूळ झाडावी. गोसावी तिच्या पर्णकुटीस भेट देतात. योगिनी मुक्ताबाईने श्री चक्रधरांसाठी गवताचे आसन घातले. गोसावी त्या आसनावर स्थानापन्न झाले. तिने आपल्या जटांनी श्रीचक्रधरांचे पाय साफ केले. मग गोसावींचे चरण धुतले. मग सुंदर वन पुष्पांनी पूजा बांधली. मग दंडवत घातला आणि दोन्ही हात जोडून पुढे उभी राहिली. मग म्हणाली, ” माझ्या तपाचे फळ आज मला मिळाले. अशा महापुरुषांचे आज मला दर्शन घडले. मग श्री चक्रधरांना कंदमुळे अर्पण केली.
” गोसावी माहादाइसातें म्हणीतलें : ‘बाइ : कैसी बाइ नीहां तापस ! आंगिची लोंव पाहाळी गेली : हातापायांची नखें चुंभळि वळली : माथांचीया जटा भूइंसी काढति : सेवाळेले दांत : तीएं बैसति तरि तेयांचीया जटा भुइं पुजा होति : उभी ठाकति तरि तेयांचीया जटै भूइंसी काढति : बाइ : कैसी बाइ नीहां तापस !” ऐसें गोसावी माघुते पुढारें तोखति :
गोसावी महादाईसा ला म्हणतात, “बाई, मुक्ताई कसली तापस्विनी होती. साधना करण्यात इतकी मग्न होती की तिचे शरीराकडे अजिबात लक्ष देणे होत नव्हते. अंगावरचे लव (केस) इतके वाढले होते की ते पहाळी गेले. नखे इतकी वाढली की हातापायांच्या नखाच्या चुंभळी वाळलेल्या. डोक्यावरच्या जटा जमिनीपर्यंत पोचलेल्या. दात देखील शेवाळलेले झाले होते. ती बसली तर जटा भुईवर जमा होत. उभी ठाकली तरी जटा भुईपर्यंत पोचत. किती बाई थोर तापस्विनी.” असे गोसावी संतोष पावती.
माहादाइसी पुसिलें : “हां जी : तेयांचेया तपा कीतीसें वरीसें भरली जी?” सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ तेयांचेया तपासी : तेरासें वरीखां भरली आणि एणे तेथ बारा वरीखें राज्य केलें :” मग माहादाइसीं पूसिलें : “जी जी : तीएं तेथ असती तरि तेयांसि परावर्ण काइ?” सर्वशैं म्हणीतलें : “तेयाचीये आंगीं रोमावळि निगाली असे : तेणें तेयांचे देह आछादौनि गेलें असे :
महदाईसा विचारते, “तिच्या तपास किती वर्षे पूर्ण झाली?” सर्वज्ञ (श्री चक्रधारस्वामी) म्हणाले, “तेराशे वर्ष भरली. आणि मी तिथे बारा वर्षे राज्य केले” (वास्तव्य केले). मग महदाईसा विचारते की योगिनी मुक्ताबाई तिथे होती तर तिचा परावर्ण कसा?” त्यावर सर्वेश (श्री चक्रधर स्वामी) म्हणतात की तिच्या सर्व अंगातून रोमावळी निघाल्यामुळे तिचा सर्व देह अच्छादून गेला होता.
हे गोष्टि गोसावी वीज्ञानेस्वरीचेया नींबाबुडि विष्णुभटांवरि सांघीतली : “बा : कैसा ब्राम्हणु तापसु :”॥.
आ. प्रतीत ही लीळा पुढीलप्रमाणे आहे :
मुक्ताबाइये भेटि :॥
हे गोष्टि गोसावी वीज्ञानेस्वरीचीया नींबातळी वीष्णुभटांउपरि बाइसांप्रति सांघीतली : गोसावीयांसि नींबातळी आसन जालें : तंव जापीये वीष्णुभट गंगे संध्यास्नान करूनि येत होते : हातीं तांबवटी : तांबवटीए तुळसी : ऐसे वीज्ञानेस्वरा एत होते : गोसावीयांतें देखीलें : आणि साउमे आले : दंडवत केलें : श्रीचरणां लागले : गोसावीं श्रीकरें पाठि स्पर्सीली : “बाइ : ब्राह्मण कैसा तापसु : तीन्ही रीतु साधलीया असति :” बाइसी म्हणीतलें : “ हो बाबा : अवधी पाठि उन्हें कर्पली असे :” याउपरी सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइल तेही कैसी तापसी :” बाइसी म्हणीतलें : “बाबा : ते कोण?”
“बाइ : मुक्ताबाइ : वीक्रमाची राणी : भौहरीची भाउजैइ : भौहरि तयाचेया आवारा भीक्षे गेले : तंव तेहीं ताटी आइती भीक्षा करूनि ठेविली होती : तीये न्हातें होती : जैसा भौहरीचा भीक्षा शब्द आइकीला तैसीचि चोखणि लावीतें उठीली : केसांची वीरगुंठी घातली : ताट घेउनि दीगांबरेनी नीगाली : ते वरतें न पाहात नीगाले : तीयें पाठीचि नीगाली : दारवठा बोल्हाराउळ होता : तो बारी : तो बाहीरि हातीं धरूनि नीगाली : तीएं दोघे भर्तौहरीचेया गुरूची उपदेसीयें : एकवीधा अवस्ता पातली : सर्वांगी रोमा नीगाली : सर्वांगा तेचि आवेयेवा पांगरूण जाली: रोमा सर्वांगी पाहाळी गेली : जटै माथाचीया पाएघोळीया : हातींपाइची नखें चुंभळी वळली असति : तीये बैसति तरि तयाचीया जट मागा पुजा होति :…” यानंतर भेटीचा वृत्तांत सांगून झाल्यावर ‘बाइसीं पुसिलें : “बाबा तयासि काइ दीधलें ?” “बाइ : तयासि देहवीद्या दीधली : बोल्हो तो सीध जाला : तीये करदळीवनी असति : आणि हे तेथ बारा वरिखें होतें :'” ॥१६॥