मग आमचे गोसावी उदीयांचि श्रीप्रभूगोसावीयांसि सामोरें बीजें करीति : श्रीप्रभू पैलीकडौनि बीजें करीति : एरएरा गोसावीयांसी पाळीसि आसन होए : श्रीप्रभू खेळु करीति : कदाचीत खेत्रासी बीजें करीति : मार्गी मातांगें पानाची पातळि करूनि ठेविली : तीएवरि जीए वेळे जो पदार्यु ते दोणे भरूनि ठेविले असती : एकी दोनां हुरूडा : १ : एकी दोनां नीमुरू :२ : मग एकी दोणां ओंबीया : ३ : एकी दोणां चणेयांचे सोले : ४ : एकी दोणां घोळाणा’ : ५ : एकी दोनां तुरीचे सोले : ६ : एकी दोनां लांकांचे सोले : ७ : एकी दोणां वाटाणेयांचे सोले : ८ : एकी दोनां कोवळींकोवळी वाळुकें : ९ : एकी दोणां उसांचीया पेरीयां : १० : एकी दोनां उदक भरूनि ठेविलें :११ : ऐसें तो नीच ठेवी : वरि एकी पातळीया झांकी : श्रीप्रभूगोसावी बीजें करीति : श्रीप्रभूगोसावी देखौनि चवकति : तेथ आसन होए : आरोगण होए : दोणांचें उदकपान करीति : मग ते दीसी आमचेयां गोसावीयांसि प्रसादु होए : मग एरएरां दोहीं देवांचा प्रसादु तेया मातांगासि होए : एरी दीसी तो दुणां दोणे ठेवी : ऐसे खेळतखेळत श्रीप्रभूगोसावीं दाभवीहीरीसि बीजें केलें : आमचां गोसावीं श्रीप्रभूचा खेळ पाहातपाहात बीजें केलें : दर्भाळां खेळु : “मेला जाए :” म्हणौनि घरोघरी आरोगण करूनि मग दर्भेस्वरी खेळु केला : मग श्रीप्रभूप्रमेस्वरपुरा बीजें केलें : पीवळतळौलीयावरि आमचे गोसावी बोळवीत आले : तेथ राहुनि भाळस्तळावरि श्रीकरू ठेवुनि जवं श्रीप्रभूगोसावी रीधपुराआंतु बीजें करीति तवंवेन्ही पाहाति : मग मागौतें दाभवीहीरी बीजें करीति : ऐसे आमचे गोसावी नीच श्रीप्रभूसि साउमे जाति : मागौतें बोळावीत जाति : ऐसी प्रतदीनी एरएरां गोसावीयांसि पीवळतळौलीयांसि भेटि होए : कदाचीत एकाधीये वेळे श्रीप्रभूगोसावी बीजे न करीति : तीए दीसी आमचे गोसावी बीजे न करीति : मग प्रमेस्वरपुराकडे भाळस्तळावरि श्रीकरू ठेवुनि पाहातचि असति : मग गोसावी मागौतें दाभवीहीरी बीजें करीति : मग एउनि दाभवीहीरीसि पाणीपात्र करीति : दर्भाळां सीळेवरि श्रीचरणे उदक घालीति : मां पाणीपात्र घालीति : आरोगण होए : दर्भेस्वरी उतरीलीकडे देउळी दखिणामुख : तेथ अवस्थान : पहुडु होए : ऐसें वीस दीस दाभवीहीरी अवस्थान : दर्भेस्वरिचेया बाळाणेयावरि आसन होए : ।। .