गोसावी आसनी उपविष्ट असति : एकू दीस गावीचे माहाजन बैसले असति : तवं गोसावी हास्य करूनि श्रीकर कुसकरीले : तवं काळे जाले : मग तेहीं पूसीलें : “जी जी : श्रीकर काळे कां जाले?” गोसावी म्हणीतलें : “सारंगधरीचे भोपे सारंगधरासि आर्ती करीत होते : ते चांदोवेयासि आगी लागली : ते एथौनि वीझवीली :” तवं तेयांसि आश्चर्ये जालें : तोचि मासू : तोचि दीसू लीहुनि पाठवीला : तवं साचचि : मग तेहीं म्हणीतलें : “साच : तै गोसावी एथ होते :” ऐसा वीस्मो जाला : ॥.
गोसावी आसनावर बसलेली असतात. गावचे महाजन त्यांच्यासोबत बसलेले असतात. तेव्हा गोसावी हास्य करतात. आणि स्वतःचे हात चोळतात. त्यांचे हात काळे पडलेले असतात. ते बघून गावचे महाजन विचारतात. की “हात काळे का झाले?” गोसावी म्हणतात, “सारंगधराचे भोपे सारंगधराची आरती करत होते. तेंव्हा चांदव्यास आग लागली. ती विझवल्यामुळे माझे हात (श्रीकर) काळे झाले.” तेव्हा महाजनास आश्चर्य वाटले. त्याच दिवशी महाजनांनी हा वृत्तांत लिहून पाठवला. खात्री करून घेतली. तिकडून त्यास कळले की, हे सत्य आहे. असा प्रसंग घडला होता. गोसावींनी सांगितलेली घटना घडली हे खरे परंतु गोसावी तर येथे माझ्यासमोर होते. असा त्यांना विस्मय झाला.