marathi_shala

मराठी शाळा जिंदाबाद Education in marathi medium or english medium?

शेअर करा

खाजगी शाळांच्या मनमानी आणि पैसे ओरबाडण्याच्या वृत्तीला कंटाळून प्रशांत मोदी या पालकाने  मागील वर्षी साताऱ्यातील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मुलाला काढून साताऱ्यातीलच जिल्हापरिषदेच्या श्री प्रतापसिंह हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. त्याविषयीचे त्यांचे मनोगत –

खाजगी शाळांच्या मनमानी आणि पैसे ओरबाडण्याच्या वृत्तीला कंटाळून मी माझ्या मुलाला मागील वर्षी साताऱ्यातील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून सातारा शहरातील  जिल्हा परिषदेच्या श्री प्रतापसिंह हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. माझा मुलगा अगदी नर्सरीपासून इंग्रजी माध्यमात होता. गेली आठ वर्षे इंग्रजी माध्यमात शिकल्याने थेट मराठी माध्यमात घातल्यानंतर काय होऊ शकते, याविषयी जाणून घेण्याची माझ्या जवळच्या पालकमित्रांची तीव्र इच्छा असल्याने हा लेख.

गेली आठ वर्षे इंग्रजी माध्यमात शिकल्याने सुरुवातीला दोन आठवडे थोडे गोंधळाचे होते, परंतु मराठी मातृभाषा असल्याने आणि शाळेत, घरी,  तसेच आजूबाजूला सर्व जण मराठीमध्ये संवाद साधत असल्याने आकलन  वेगाने झाले. आठ दिवसांतच मुलगा शाळेत रुळला.

शिकविण्याची पद्धत अगदी मैत्रीपूर्ण, समजायला सोपी, ओघवती; त्यामुळे शैक्षणिक दर्जा समतोल राहून सर्व विषयांत गती आली. शिकविणारे शिक्षक हे एमएड असल्याने त्यांनी विविध मुलांशी विविध पद्धतीने शिकविण्याच्या कला आत्मसात केलेल्या असतात जणू. आवर्जून उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे मराठी माध्यम असून इंग्रजी विषय शिकविण्याची खास लकब, हातोटी उल्लेखनीय आहे. मुलांना जे प्रोजेक्ट्स दिले जातात ते शाळेतच मुलांकडून करून घेतात. एक स्थानिक सहल शाळेने काढली होती, त्याचा अहवाल मुलानांच बनवायला सांगितला. उत्कृष्ट अहवाल सादर करणाऱ्यांना प्रशस्तिपत्रक आणि रोख पारितोषक दिले. अशा विविध गोष्टींद्वारे प्रतापसिंह शाळेत मुलांना शिकवले जाते.

पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अतिशय उत्तम संवाद असतो. तुम्ही वेळ घेऊन अगदी दररोज म्हटलं तरी आपल्या मुलाच्या विविध विषयांच्या शिक्षकांना भेटू शकता. गेल्या चार महिन्यांत मुलाची प्रगती सांगण्याकरिता मला आठवड्यातून एकदा तरी फोन येतो. मुलाकडून घरी काय करून घ्यायचे असल्यास ते सांगितले जाते. दोन वेळा तर शाळाबाहेरचे निमंत्रित प्राध्यापक मुलांना शिकवायला आणले  होते, खासकरून इतिहास आणि  गणित विषयांसाठी.

या वर्षीच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शाळेला जरी सुट्टी असली, तरी घरी प्रत्येक दिवशी मर्यादित होमवर्क, ऑनलाईन लेक्चर्स अशा गोष्टी होत्या, जेणेकरून कोरोना काळात मुलांचे जे नुकसान झालेय ते भरून निघावे. एकंदरीत मुलांना दर्जात्मक शिक्षण कसे मिळेल याकडे प्रतापसिंह शाळेचे पूर्ण लक्ष असते.

एक जूनपासून जी मुले स्कॉलरशिपला बसली आहेत, त्यांचे वर्ग सुरू झाले असून मुलांना कोणताही ताण / जास्तीचा गृहपाठ न देता पद्धतशीरपणे अभ्यास करवून घेतला जात आहे. शिक्षणाव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रत्येक मुलाला खालील गोष्टी विनामूल्य पुरविल्या जातात :

शाळेचा नवीन कोरा गणवेश.

नवीन कोरी पुस्तके आणि वह्या, संपूर्ण स्टेशनरी साहित्य.

प्रत्येक महिन्याला धान्य, डाळ, प्रोटिन बार्स.

स्थानिक सहली, वर्षातून दोन तरी असतात.

मुलांना विविध सामाजिक, धार्मिक गोष्टींमध्ये सक्रिय राहण्यासाठी निकोप स्पर्धात्मक वातावरण.

फक्त मुलांसाठीच विविध प्रोजेक्ट्स आणि त्याचे साहित्यसुद्धा.

शाळांतर्गत स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या मुलांना रोख बक्षिसे / पारितोषके.

अनेक उपक्रमांचे आयोजन, जेणेकरून मुलांना बाहेरील प्रत्यक्ष जगात व्यवहारज्ञान आणि स्टेज डेअरिंगसाठी प्रोत्साहन मिळावे.

एकंदरीत शाळेच्या शैक्षणिक दर्जाबाबत मुलगा आणि आम्ही पालक एकदम समाधानी आहोत. इंग्रजी माध्यमात असताना जितका त्याचा शैक्षणिक प्रगतीचा आवाका (मार्क्स) होता तितकाच त्याने शिक्षक आणि आईच्या साहाय्याने राखला. प्रतापसिंह शाळेत मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये आमच्या मुलाने प्रावीण्य मिळविल्याबद्दल प्रशस्तिपत्र आणि रोख रुपये दोनदा मिळाले.

माझी आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने शाळेतून विनामूल्य मिळणाऱ्या गोष्टी (धान्य इत्यादी) आम्ही गरजवंतांना देतो. माझा मुलगा इंग्रजी माध्यमात असताना कोविड काळात नवीन पुस्तके आणि स्टेशनरी न घेता मुलाला विश्वासात घेऊन पुस्तकांच्या झेराक्स काढून वापरायला लावल्या. त्याचे दोन वर्षांचे एकूण नऊ हजार रुपये वाचले होते, ते त्याला पिगीबँकसाठी रोख दिले.

shikshan-min

तर सांगायचा मुद्दा हा की भाषा हे ज्ञान मिळविण्याचे माध्यम आहे. हे ज्ञान पक्के होण्यासाठी, त्याचा पाया भक्कम होण्यासाठी मातृभाषेतून शालेय शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.

प्रशांत मोदी (लाटकर)

संपर्क – ९१४५५०००१२


शेअर करा

Leave a Reply

error: