इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला की नाही हे ठरवण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची आहेत असे श्री शांतीभूषण यांना वाटत होते. सरकारने असे करण्यास नकार दिला. कारण सांगितले की ही कागदपत्रे द्यावी की नाहीत यासंबंधी राज्याला (state) काही विशेष अधिकार (Privileges) आहेत. ज्या कागदपत्रांची मागणी राजनारायण यांचा पक्ष करत होता त्याला नाव होते ब्लू बुक (BLUE BOOK). आणि त्यामध्ये पंतप्रधान प्रवासात किंवा दौऱ्यावर असताना त्यांच्या संरक्षणासाठीचे नियम आणि मार्गदर्शक सूचना समाविष्ट होत्या. या पुस्तिकेत असे नमूद होते की पंतप्रधान दौऱ्यावर असताना संबंधित राज्याने त्यांच्या संरक्षणाचा आणि त्यांच्या बैठका आणि सभांची व्यवस्था करायची. या व्यवस्थेचा खर्च देखील ज्या राज्यात हा दौरा आहे त्या राज्याने करायचा. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री पंतप्रधान पदावर असेपर्यंत असाच दंडक होता.