पडू आजारी

शेअर करा

बालपणीच्या किरकोळ आजारपणात ही काय मजा असते.

सर्वजण काळजी घेतात. शाळा नाही, अभ्यास नाही. कुठल्याही कामाला हात लावायचे नाही. मस्त लोळणे, आराम करणे. खाण्या पिण्याचे सगळे नखरे झेलायला सारे तय्यार.

अशा आजारपणाला खरेच का नाक मुरडावे?

पडु आजारी। 
मौज हीच वाटे भारी॥ धृ॥

नकोच जाणें मग शाळेला,
काम कुणी सांगेल न मजला,
मउ मउ गादी निजावयाला,
चैनच सारी।
मौज हीच वाटे भारी।।१।।

मिळेल सांजा, साबूदाणा,
खडिसाखर, मनुका, बेदाणा,
संत्रीं, साखरलिंबूं आणा;
जा बाजारीं।
मौज हीच वाटे भारी।।२।।

भवतीं भावंडांचा मेळा,
दंगा थोडा जरि कुणिं केला,
मी कावुनि सांगेन तयाला,
'जा बाहेरी.'
मौज हीच वाटे भारी।।३।।

कामें करतिल सारे माझी,
झटतिल ठेवाया मज राजी,
बसेल गोष्टी सांगत आजी,
मज शेजारी।
मौज हीच वाटे भारी।।४।।

असलें आजारीपण गोड
असूनि कण्हती कां जन मूढ ?
हें मजला उकलेना गूढ-
म्हणून विचारीं।
मौज हीच वाटे भारी।।५।।
                                            - भानुदास

शेअर करा

Leave a Reply

error: