Yerwali येरवाळी

साधारण 90 च्या दशक आधी ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी हा शब्द अनेकवेळा ऐकलेला असेल. 90 च्या नंतर जन्मलेल्या अनेकांच्या कानावरून हा शब्द गेला असण्याचा संभव देखील आहे. ग्रामीण भागातल्या व्यक्तीकडून तो कधीतरी आपण ऐकलेला असणार. “येरवाळीच निघालो होतो. तेंव्हा कुठं संध्याकाळ होईपर्यंत पोचलो.” असं वाक्य किंवा “उद्या येरवाळीच निघावं लागेल” असं वाक्य मी आणि माझ्यासारख्यांनी अनेकदा ऐकलेलं आहे.

येरवाळी म्हणजे ‘लवकर’ असा साधारणतः त्याचा अर्थ आहे. येरवाळी निघाले पाहिजे म्हणजे नेहेमीपेक्षा लवकर निघाले पाहिजे, भल्या पहाटे निघाले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. हा शब्द वेळदर्शक, कालदर्शक आहे. आणि विशेष म्हणजे तो कितीही ग्राम्य किंवा गावठी शब्द वाटत असला तरी तो संस्कृत शब्दाचे अपभ्रंश रूप आहे. नाही ना पटत?

येरवाळी हा शब्द संस्कृत मधल्या अपरवेळा या शब्दापासून निर्माण झालेला आहे. अपर म्हणजे दुसरी किंवा परकी. अशी अपर वेळ म्हणजे परकी वेळ. म्हणजेच नेहमीपेक्षा वेगळी किंवा आधीची वेळ.

वारवलय हा संस्कृत शब्द देखील याचा उगम मानल्या जातो. वार म्हणजे दिवस. वलय म्हणजे तेज. म्हणजे ज्या वेळी दिवसाचे तेज जाणवण्यास सुरुवात होते तो वेळ. म्हणजे पहाटेची वेळ. असा हा उद्भव तत्सम असलेला शब्द वापरायला हरकत नसावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: