छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील जंगल संपत्ती,निसर्ग संपत्ती कमी होऊ नये म्हणून एक आज्ञापत्रच काढले होते.आपल्या राज्यातील निसर्गदत्त जंगल संपत्तीची, वृक्षठेव्याची कशी काळजी घ्यावी, याविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्पष्टपणे या आज्ञापत्रात मांडले आहेत.आधुनिक काळाप्रमाणे प्रदूषण किंवा पर्यावरणाचा असमतोल नसणाऱ्या त्यांच्या काळातही त्यांनी वृक्षसंपत्तीचे मोठेपण जाणून घेतले होते. गडावरील वृक्ष संवर्धनाबाबतच्या या आज्ञापत्रावरून त्यांची पर्यावरणाबाबतची दूरदृष्टी दिसून येते.
‘गडास येण्या-जाण्याचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तरी ते मोडून, त्यावरील झाडी वाढवून, आणखीकडे परके फौजेस येता कठीण यैसे मार्ग घालावे. या विरहित बलकुबलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सार्वकाल चालो देवू नयेत. समयास तेच प दिंडी अथवा दरवाजा याचा राबता करून सामान सर्वदा नेत जावे. गडाची राखण म्हणजे क़मरग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्यें येक काठी तेही तोडूं न घ्यावी. बलकुबलीस
त्या झाडीमध्यें हषम बंदुकी घालावयाकारणें जागे आसो द्यावे. गडासभोवती नेहमी मेटे आसावी. घेरियाची गस्त करत जावी. गस्तीचा जाब मेटकरी यांणी देत जावा. गडाखालतें इमारतींचे घर किवा घराभोवती दगडाचे कुसू सर्वयैव आसों न द्यावें. गडावरील झाडे जीं आसतील ती राखावी. या विरहित झाडे, आंबे, फणस, चिंचा, वड, पिपल आदिकरून थोर वृक्ष व निंबें. नारिंगे आदिकरून लाहन वृक्ष, तैसेच पुष्पवृक्ष, वल्ली, किंबहुना प्रयोजक-अप्रयोजक जें झाड होत आसेल तें गडावरी लावावें, जतन करावें, समई तितकेंहीं लांकडे तरी प्रयोजनास पडतील.’
“आरमार तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदीवरून थोट लाकूड असावे लागते. ते आपल्या राज्यामध्ये अरण्यामध्ये सागवानांदी वृक्ष आहेत. त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजुर लेहून हुजूराचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहीत जे लागेल ते परमुकिहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदि करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची. परंतु र त्यांस हात लाऊ न द्यावा. काये म्हणोन की ही झाडें वर्षा दो वर्षांनी होतात यैसें नाही. रयंतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुकाळ जतन करून वाढवली ती झाडें तोडिलियावरी त्यांचे दु:खास पारावर काये? येकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य कराणारासहित स्वल्पकालेच बुडोन नाहिसेंच होते.
किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडपणाचा दोष पडतो. या वृक्षच्या आभावें हानीही होते. याकरितां हे गोष्ट सर्वथा होऊं न द्यावी. कदाचित येखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामतून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे न्यावे.’