स्त्रीत्वाचा गाभा जगभरात सारखाच असतो. प्रतिकूल परिस्थितीत चिवटपणे टिकून राहणारा. ‘तितीक्षा’ हा शब्द प्रत्यक्ष जगणारा. अनेक वर्षांपूर्वी मी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना कमी दिवसांची बाळं जगण्याचं प्रमाण फार कमी होतं. एक दिवस राउंडमध्ये सीनिअर मॅडमना सांगितलं की सकाळी एक कमी दिवसांचं बाळ जन्मलं आहे. बाळाची प्रकृती कशी आहे वगैरे काहीही न विचारता आधी त्यांनी प्रश्न केला ‘‘मुलगा की मुलगी?’’ मला अगदीच अनपेक्षित होता हा प्रश्न. मी उत्तरले ‘‘मुलगी.’’ ‘‘मग जगेल ती; अगं पुढे जन्मभर परिस्थितीशी सामना करतच जगायचं आहे तिला!’’ त्यांच्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवाचे बोल होते ते. वेगवेगळय़ा स्तरांतील स्त्रियांची दु:ख वेगवेगळी असू शकतात. संकटांचे प्रकार वेगवेगळे असतात, पैशाची उपलब्धता कमी-जास्त असते, सारखी असते ती आयुष्यात टिकून राहण्याची मनाची लवचीकता. रेझिलिअन्स!
.. हे सगळं आठवलं ते ‘इसेन्शियली मीरा’ हे पुस्तक वाचताना. ‘क्रॉसवर्ड’ सारख्या दुकानातील हारीने मांडलेल्या पुस्तकातून एखादं चाळायला उचलण्यासाठी अनेक कारणं असतात. जसं की लेखक प्रसिद्ध असतो, मुखपृष्ठ नजर खेचून घेतं, पुस्तकाबद्दल ऐकून माहीत असतं. पण हे पुस्तक उचललं कारण लेखिकेचं आणि माझं नाव सारखंच आहे, मीरा कुलकर्णी!
लेखिका मीरा कुलकर्णी ही भारतातील सौंदर्यप्रसाधन निर्मितीतली फार मोठी उद्योजक. ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ नावाच्या लग्झरी आयुर्वेदिक कंपनीची सीईओ. (या कंपनीची उत्पादने हयात, ताज अशा अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये, राष्ट्रपती भवनातील अति महत्त्वाच्या सूट्समध्ये वापरली जातात.) ‘फॉच्र्युन इंडिया’च्या ‘मोस्ट पॉवरफुल बिझिनेस वुमन’च्या यादीत हिचं नाव सलग १० वर्ष झळकत होतं. हे सारं तिनं व्यक्तिगत आयुष्यातल्या ‘सिंगल मदर’ या कप्प्यातील सगळय़ा जबाबदाऱ्या पेलून करून दाखवलं. हे आत्मकथन आहे मीरा कुलकर्णीचं. ही कथा तिच्या वैयक्तिक आयुष्याची तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तिच्यातल्या उद्योजकाच्या जन्माची आणि वाढण्याची आहे.
आयुष्याचं चित्र काढताना त्यात ‘बॅकग्राउंड’, ‘मिडल ग्राउंड’ आणि ‘फोरग्राउंड’ असणारच. ‘कुलकर्णी’ होण्याआधीची मीराची पार्श्वभूमी एका उच्चभ्रू पंजाबी कुटुंबाची! दिल्लीत मोठा बंगला, हृषीकेशला मोठी जागा. लॉरेटो कॉन्व्हेंट शिमलामध्ये शालेय शिक्षण. ‘मिडल ग्राउंड’ खडबडीत, रुक्ष, कुठे थोडी हिरवळ असलेलं. लवकर लग्न, खूप श्रीमंतीचा अनुभव आणि नंतर पतीच्या व्यसनांमुळे अनुभवावा लागलेला कौटुंबिक हिंसाचार. असं असताना फोरग्राउंडवर तिने व्यवसायात हिमतीने घेतलेली झेप कुणालाही अचंबित करेल अशी. आणि तसंही, चित्र काय आणि जगणं काय, नेहमीसाठी परफेक्ट कधी नसतंच.
स्वत:ची गोष्ट लिहिणं तसं खूप कठीण असतं. कुणी आपल्याला त्रास दिलेला असेल, तर ती व्यक्ती किती वाईट, असं काहीसं मांडलं जातं. पण मीरा अशाही व्यक्तीतले चांगले गुण लिहिते. व्यक्ती आणि वर्तन यात ती फरक करू शकते. ती म्हणते ज्याच्यामुळे तिला त्रास झाला त्या व्यक्तीचं त्या क्षणीचं वागणं ती विसरली नाही पण त्या व्यक्तीला तिने क्षमा केली. ही गोष्ट तिने साक्षीभावाने सांगितली आहे. छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून तिची ही गोष्ट पुढे सरकते. यात भावनांमध्ये वाहात जाणं नाही की शब्दांचा फुलोरा नाही. तरी तिची गोष्ट वाचकाला बांधून ठेवते. तिच्या जगण्यात एक स्वप्नाळूपण आहे. त्या स्वप्नांवर ठाम राहण्याची वृत्ती आणि आयुर्वेदावरचा गाढा विश्वास आहे.
पैसा आहे, मग काय कठीण आहे, असं वाचकांना वाटू शकतं. पण पैसा आयुष्यात सगळं नाही देऊ शकत. दोलायमान भावना, कौटुंबिक हिंसाचार याला तोंड द्यायला, त्यातून हिमतीने बाहेर पडायला भावनेला कुठे तरी बांध घालावाच लागतो. मीरा पतीचं घर सोडून आली तेव्हा तिला दोन मुलं होती. मुलीला वडिलांच्या घरीच राहायचं होतं. ती फक्त मुलाला घेऊन वडिलांकडे आली. काळजाचा एक तुकडा सासरघरी ठेवून येताना तिची काय अवस्था असेल माहीत नाही. तिला वडिलांचा भक्कम आधार होता. रोजच्या जगण्यासाठी लगेचच काही कमवायची गरज नव्हती. पण आई-वडील थोडय़ाच दिवसांच्या अंतराने काळाच्या पडद्याआड गेले आणि मग मीरा एकटी पडली.
बहिणीचा मानसिक आजार, तिने आर्थिक स्तरावर दिलेला त्रास, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, या प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकलेली असताना तिला वाटलं की कुणाचा तरी आधार असावा. तिने राजू कुलकर्णी नावाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं, पण त्यांचा संसार अल्पायुषी ठरला. ते वेगळे राहू लागले. मीरा लिहिते की एक गोष्ट मात्र खरी, की राजू कुलकर्णीच्या रूपाने मला एक चांगला मित्र मिळाला. जो आमची कुठलीही अडचण त्याची समजून मदत करत राहिला.
मुलांच्या जबाबदाऱ्या थोडय़ा कमी झाल्यावर वयाच्या चाळिसाव्या वर्षी तिने एक लाखाच्या भांडवलाच्या बळावर घराच्या गॅरेजमध्ये उद्योग सुरू केला. आधी सुगंधी मेणबत्त्या बनवण्याचा आणि नंतर आयुर्वेदाची काही तत्त्वं वापरून साबण तयार करण्याचा. हा उद्योग पुढे पाहता पाहता आयुर्वेदातील ज्ञान वापरून सौंदर्यप्रसाधनं निर्माण करण्याच्या क्षेत्रातील एका अग्रगण्य कंपनीत रूपांतरित झाला. ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ हे त्या कंपनीचं नाव, जे तिचं वनस्पतींशी आणि वनौषधींशी नातं सांगतं. कंपनीची नोंदणी करताना मीरानेच लोगो तयार केला. एका गोलामध्ये एक मोठा वृक्ष आणि त्याभोवती लिहिलेलं कंपनीचं नाव. आयुर्वेदातील तत्त्वांवर आधारलेली उत्तम प्रतीची सौंदर्यप्रसाधनं बाजारात नाहीत, हे तिने हेरलं होतं आणि त्याच दिशेने तिने प्रवास सुरू केला. उद्योगाचं मोठं साम्राज्य एखाद्या छोटय़ा बीजापासून फोफावू शकतं, हे तिचा हा प्रवास सिद्ध करतो.
आयुर्वेदात वर्णन केलेल्या पद्धतींचा अवलंब करून पंचेंद्रियांना सुखावणारी सौंदर्यप्रसाधनं तयार करणं हे तिच्या कंपनीचं ध्येय. त्यासाठी वनस्पतींचे सर्व भाग हाताने गोळा केले जातात. त्यात वापरलेली तेलं हातघाणीत काढलेली आणि शुद्ध असतात. यात तडजोड करायला ती कधीच तयार नसते. मूळ पद्धतीत जेवढा वेळ प्रक्रियेसाठी सांगण्यात आला आहे, तेवढाच वेळ देऊन उत्पादनं तयार केली जातात.
या पुस्तकात ती म्हणते की ज्या सौंदर्यप्रसाधनात वापरण्यात आलेले सर्व घटक हे खाण्यायोग्य असतात, तीच प्रसाधनं त्वचेवर वापरली जावीत. पदार्थाची शुद्धता हे ‘फॉरेस्ट इसेन्शियल’चं एक मार्गदर्शक तत्त्व आहे, असं मीराला वाटतं. तिने उत्तराखंडमधील लोडसी गावी फॅक्टरी उभारली आहे.
आजूबाजूच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या स्त्रियांना तिने आवश्यक वनस्पती गोळा करण्याचं काम दिलं आहे. तिच्या या कंपनीमुळे तिथल्या बायकांच्या स्वत:च्या बँक खात्यात पहिल्यांदाच पैसे जमा झाले. हे महिला सबलीकरण तिच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तिचे अनुभव सांगताना ती म्हणते, ‘‘लोक आपल्याला सुरुवातीला हसतात. तू हे कसं करू शकशील किंवा तुझी पद्धत अगदीच अशक्य कोटीतली आहे, असं म्हणतात. पण आपल्या डोक्यात आपलं स्वप्न पक्कं असेल, त्यासाठी मेहनत करायची तयारी असेल तर काही ना काही मार्ग निघतोच निघतो.’’
तिच्या आजीने एकदा सांगितलं होतं, ‘‘तू जे काही करशील ते बेस्ट कर.’’ हेच ‘फॉरेस्ट इसेन्शियल’च्या यशामागचं सूत्र आहे. ही प्रसाधनं आणि उत्पादनं तयार करण्याच्या पद्धती जाणून घेण्यासाठी तिने कोचीजवळच्या खेडय़ांपासून ते हृषीकेशजवळच्या डोंगराळ भागांपर्यंत अनेक गावं पालथी घातली. आयुर्वेदाचा अभ्यास असलेल्या अनेक वैद्यांकडून माहिती घेतली. ती स्वत:ही आयुर्वेदाचा अभ्यास करत आहे.
अशा स्वरूपाचा उद्योग उभा करण्यासाठी ध्यास घेणं महत्त्वाचं असतं. तिचं पहिलं उत्पादन होतं साबण! हा साबण आयुर्वेदाच्या मानकांप्रमाणे तयार केला जावा आणि तरीही वापरास सुलभ असावा, यासाठी तिने बराच काळ प्रयोग आणि प्रयत्न केले. प्रयोग कधी फसतात, कधी आग लागत असे. पण शेवटी तिला हवा तसा साबण तयार झाला. तो वाळण्यासाठी चार आठवडे थांबून तिने जेव्हा तो वापरून पाहिला, तेव्हा त्याच्या मऊशार फेसाने तिचा श्रमपरिहार झाला. हयात हॉटेलने विचारणा करून तिची उत्पादनं ठेवायला सुरुवात केल्यावर तिने ठरवलं, की फक्त पंचतारांकित हॉटेल्सनाच उत्पादनं विकायची.
सुरुवातीला सगळे म्हणत, एवढे स्वस्त साबण बाजारात असताना हा महाग साबण कोण घेणार? पण मीरा हे जाणून होती की गुणवत्ता असेल तर थोडे जास्त पैसे मोजायला ग्राहक होतात. तिच्या कंपनीने तयार केलेल्या अनेक प्रसाधनांच्या बाबतीतही तिला हाच अनुभव आला.
मागे वळून पाहताना ती म्हणते, ‘फॉरेस्ट इसेन्शियल’ माझ्यासाठी तिसऱ्या अपत्यासारखं आहे, ज्याला माझा जास्त वेळ आणि जास्त लाड मिळाले. प्रत्येक मूल आपलं आपलं नशीब घेऊन येतं. या माझ्या अपत्याचं नशीब हळूहळू उघडत जाणार होतं. आज या कंपनीची स्वत:च्या मालकीची ११५ दुकानं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ब्रँडने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. अनेक सेलिब्रिटी त्याचे ग्राहक आहेत.
वैयक्तिक आयुष्यातल्या गमतीच्या, आनंदाच्या, दु:खाच्या, भीतीच्या अशा अनेक आठवणी तिने या पुस्तकात लिहिल्या आहेत. तिचं स्वत:ला उद्योजक म्हणून घडवणं, भावतं. ती सांगते, ‘‘लोक म्हणतात, की मी जन्मजात उद्योजक आहे. मी ही कंपनी सुरू केली तेव्हा बिझिनेस कशाशी खातात हेही मला माहीत नव्हतं. मला फक्त यशस्वी होण्याची आंतरिक तळमळ होती आणि त्यासाठी मेहनत करायची तयारी. दोन सहकाऱ्यांना घेऊन जेव्हा मी गॅरेजमध्ये उत्पादन सुरू केलं तेव्हा आम्ही सगळेच नवीन होतो. शुद्ध पदार्थ मिळवणं, त्यावर प्रक्रिया करणं, आम्ही चुकांमधून शिकत गेलो. मानकांमध्ये कुठेही तडजोड करायची नव्हती. साधा हिशेब ठेवणं, बनवलेलं उत्पादन हाताने पॅक करणं, लेबल लिहिणं इथपासून दुकानासाठी जागा शोधणं, तिथे उत्पादनं आकर्षक पद्धतीने मांडणं इथपर्यंत सगळी कामं सुरुवातीला मी स्वत:च केली. त्यात सुधारणा घडवल्या. सहकाऱ्यांना शिकवलं. त्यातूनच आज एक मिलियन डॉलर कंपनी उभी आहे.’’
एखादं उत्पादन तयार झालं की आता बास, असं म्हणून ती कधीच समाधानी होत नाही. आणखी नवीन काय बनवता येईल, यात अजून काय सुधारणा करता येतील ह्याचा विचार सतत तिच्या डोक्यात सुरू असतो. म्हणूनच तिची कंपनी एवढी वर्षे सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात स्थान टिकवून आहे.
मीरा म्हणते, ‘‘व्यवसायातील यशासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो. मी ज्यांना आयुष्याच्या प्रवासात भेटले त्यांच्यामुळे आणि केवळ त्यांच्यामुळेच मी अनेक प्रकल्प यशस्वी करू शकले. जे एरवी कधी शक्य होतील असं वाटलं नव्हतं.’’ एखादी इमारत उभी करणं असो, की शून्यातून उद्योग उभारणं; सोपं काहीच नसतं. हृषीकेशच्या जागेत बांधकाम करताना तिच्या जागेची वीज आणि पाण्याची जोडणी तोडली गेली. ती पुन्हा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये रडकुंडीला येईपर्यंत खेटे घालावे लागले. फॅक्टरी उभारताना अनंत अडचणी आल्या. शुद्ध ताजं साहित्य पुरवणारी साखळी निर्माण व्हायला अनेक वर्ष लागली, उत्पादन निर्मितीतले काही प्रयोग सपशेल फसले. कधी पैशांची कमतरता भासली. तिच्यावर प्राणघातक हल्लादेखील झाला, पण मीरा या लढय़ात टिकून राहिली. हे पुस्तक अशा व्यक्तीची गोष्ट सांगतं, जी कुठल्याही प्रसंगी हार मानायला तयार नाही.
लेखिका निवृत्त वैद्यकीय व्यावसायिक आहेत. [email protected]
साभार – दै. लोकसत्ता