कोहिनूर हिरा आणि दिल्लीतील भीषण कत्तल
नादिरशहा अक्षरश चवताळला. नादिरशहा ने इतिहासात कुप्रसिध्द असलेली ‘दिल्लीची कत्तल’ घडवून आणली. त्याने आपल्या सैन्यास दिल्लीत सरसकट कत्तल करण्याचा हुकूम दिला. तो 22 मार्च 1739 ला सुनहरी मशिदीत आला. नगारे आणि तुतारींच्या घोषात त्याने आपल्या सैनिकांसमोर आपली तलवार म्यानातून बाहेर काढून हवेत उंच धरली. सैनिकांसाठी हा कत्ल-ए-आम चा आदेश होता. हजारो शस्त्रधारी सैनिक रस्त्यावर उतरले आणि दिसेल त्याची कत्तल करत सुटले. हजारो निष्पाप नागरिक यात मारल्या गेले. प्रचंड प्रमाणात मालमत्तेची जाळपोळ आणि नासधूस झाली. दिल्ली अक्षरशः बेचिराख करण्यात आली. दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला याला अक्षरशः जीवाची भीक मागावी लागली. काही तासांनी जेंव्हा नादीर ने पुन्हा आपली तलवार म्यान केली तेंव्हाच ही कत्तल थांबली. असे म्हणतात की दिल्ली सतत 57 दिवस जळत होती. एका अंदाजानुसार, काही तासातच सुमारे 20 ते 30 हजार बायका पुरुष आणि लहान मुलेदेखील या कत्तलीत मारल्या गेली. जवळ जवळ 10 हजार बायका पोरांना गुलाम करण्यात आले.