KANAA by Kusumagraj कणा

शेअर करा

सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.

ओळखलत का सर मला?
पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली
गेली घरट्यात राहून
माहेरवाशीन पोरी सारखी
चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी
बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली
होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुनी पापण्यांमध्ये
पाणी थोडे ठेवले
कारभारनीला घेउनी संगे
सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे
चिखल गाळ काढतो आहे
खिशा कडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत सर
जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार तरि
मोडला नाही कणा
पाठी वरती हात ठेऊन
नुसते 'लढ' म्हणा !

शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: