अर्धसत्य Ardhsatya

गोविंद निहिलांनी हे नाव हा लेख वाचणाऱ्या बऱ्याच जणांना ठाऊक नसेल कदाचित. एक चांगले चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून ते नावाजलेले असले तरी करण जोहर, यशराज फिल्म्स च्या सिनेमावर वाढलेल्या पिढीला हा दिग्दर्शक माहिती असण्याची शक्यता थोडीशी धुसरच आहे.

ज्याला आज आपण Parallel Cinema किंवा समांतर सिनेमा म्हणून ओळखतो त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. वेगळे विषय निवडायचे आणि त्यावर डोकं सुन्न करेल असं भाष्य करणारे चित्रपट बनवायचे यात त्यांचा हातखंडा. इतका की त्यांच्या नावे सहा National Award आहेत. आता नॅशनल अवॉर्ड मिळवणारे चित्रपट आणि त्यांचे दिग्दर्शक कसे रटाळ असतात असा सूर कोणी लावेल. पण या दिग्दर्शकाच्या नावे पाच Filmfare Award देखील आहेत. व्यावसायिक सिनेमाच्या प्रवाहाने गोविंदजींचे कर्तृत्व मान्य करणे म्हणजे सिनेमाच्या बाबतीत हा माणूस किती सिद्धहस्त आहे याचा पुरावाच. त्यांनी आक्रोश, तमस, द्रोहकाल, असे काही गाजलेले चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत.

तर अशा या गोविंद निहिलानिंचा एक गाजलेला सिनेमा आहे. अर्धसत्य नावाचा. एका इमानदार पोलीस अधिकाऱ्याच्या कथेवर बेतलेला सिनेमा. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेमध्ये इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची होणारी घालमेल आणि घुसमट हा या चित्रपटाचा विषय.

अनंत वेलणकर नावाचा इमानदार अधिकारी PSI म्हणून मुंबई पोलीस जॉईन करतो. त्याची निष्ठा, उत्साह आणि आदर्श वादातीत असतात. परंतु रुजू झाल्यावर त्याला दिसू लागते की ही यंत्रणा किती किडलेली आहे. आतून किती पोखरलेली आहे. गुंड, माफिया आणि पोलीस आतून कसे मिळालेले आहेत. रामा शेट्टी हा स्थानिक गुंडांचा डॉन यांच्यात द्वंद्व चालते. रामा शेट्टी वेलणकर ला आम्हाला सामील हो म्हणून लालूच देतो. पण वेलणकर त्याला भीक घालत नाही. एक छेडखाणीच्या गुन्ह्यातील गुंडांना मारहाण केली म्हणून त्याला स्थानिक आमदाराच्या मागणीवरून सस्पेंड केले जाते. पण एक राजकीय माध्यस्थांच्या मदतीने त्याचे निलंबन हटवण्यात येते. राजकारणी आणि गुंड यांचे साटेलोटे पाहून वेलणकर हादरून जातो.

रामा शेट्टीच्या एक गुंडांची मृत्यूपूर्व जबाणीत त्याला शेट्टीविरुद्ध जबर्दस्त पुरावा हाती लागतो. पण वरिष्ठ अधिकारी त्याला रामा शेट्टीला अटक करू देत नाही. वेलणकरला यामुळे अत्यंत अपमानीत झाल्यासारखे वाटते. यासारख्या अनेक घटनांनी वेलणकर व्यथित होतो. एकदा एका पकडलेल्या चोराला मारहाण केल्यामुळे त्या चोराचा मृत्यू होतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा वेलणकर सस्पेंड केल्या जातो. त्यावेळेस देखील राजकीय माध्यस्थांचा वापर करून तो पुन्हा पदावर रुजू होण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु ते यशस्वी होत नाही.

क्लायमॅक्स सीन मध्ये वेलणकर रामा शेट्टीला भेटण्यासाठी जातो. रामा शेट्टी त्याचे स्वागत तर करतो. तो वेलणकर ला ऑफर देतो की वेलणकर चे प्रकरण तो सांभाळून घेईल. बदल्यात त्याने रामा शेट्टी सोबत हातमिळवणी करावी. आणि या एका क्षणी वेलणकर प्रचंड भडकतो. त्याला आपल्यातील नपुंसकतेचा राग येतो. आणि त्यातच तो रामा शेट्टीचा खून करतो. आणि नंतर स्वतःला कायद्याच्या स्वाधीन करतो. इथे चित्रपट संपतो.

या संपूर्ण चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना शोभावी अशी एक कविता या चित्रपटात आलेली आहे. अर्धसत्य नावाची. किंबहुना चित्रपटाचे नावच त्या कवितेवरून घेतले आहे. दिलीप चित्रे यांनी ही कविता लिहिली आहे. खूप खोल आणि अर्थपूर्ण कविता आहे. ती कविता इथे खाली देत आहे.

चक्रव्यूह में घुसने से पहले,
कौन था मैं और कैसा था,
ये मुझे याद ही न रहेगा.
चक्रव्यूह में घुसने के बाद,
मेरे और चक्रव्यूह के बीच,
सिर्फ एक जानलेवा निकटता थी,
इसका मुझे पता ही न चलेगा.
चक्रव्यूह से निकलने के बाद,
मैं मुक्त हो जाऊं भले ही,
फिर भी चक्रव्यूह की रचना में,
फर्क ही न पड़ेगा.
मरूं या मारूं,
मारा जाऊं या जान से मार दूं,
इसका फैसला कभी न हो पाएगा.
सोया हुआ आदमी जब,
नींद से उठकर चलना शुरू करता है,
तब सपनों का संसार उसे,
दोबारा दिख ही न पाएगा.
उस रोशनी में जो निर्णय की रोशनी है,
सब कुछ समान होगा क्या?
एक पलड़े में नपुंसकता,
एक पलड़े में पौरुष,
और ठीक तराजू के कांटे पर,
अर्धसत्य.

व्यवस्थेसमोर हतबल होऊन गुढगे टेकणाऱ्या नपुंसक मानसिकतेला किंवा व्यवस्थेविरुद्ध लढतांना आपण टिकू शकणार नाही, (पराभूत होऊ) हे माहिती असून देखील व्यवस्था बदलण्याची हिम्मत ठेवणाऱ्या पौरुषाला या कवितेद्वारे दिग्दर्शकाने समोर ठेवले आहे.

मरूं या मारूं,
मारा जाऊं या जान से मार दूं,
इसका फैसला
कभी न हो पाएगा.

या शब्दात या भ्रष्ट व्यवस्थेच्या चक्रात अडकलेल्या प्रामाणिक व्यक्तीची उद्विग्नता व्यक्त होते.

चक्रव्यूह से निकलने के बाद, 
मैं मुक्त हो जाऊं भले ही,
फिर भी चक्रव्यूह की रचना में,
फर्क ही न पड़ेगा.

हे व्यवस्थेचे चक्रव्युव्ह भेदून जरी मी बाहेर पडलो तरी या व्यवस्थेत काहीच बदल होणार नाही याची विषण्ण जाणीव वेलणकर ला आहे. मारून किंवा मरून, कशानेही ही व्यवस्था बदलणार नाही कारण सुष्ट आणि दुष्ट यांचा झगडा माणसा इतकाच आदिम आहे, माणसा इतकाच प्राचीन आहे.

जाता जाता या सिनेमाविषयी विशेष बाब सांगतो. ती म्हणजे या चित्रपटाची कथा मराठी लेखक श्री. दा. पानवलकर यांच्या सूर्य या कादंबरीवर बेतलेली आहे. मराठी नाटककार विजय तेंडुलकर यांनी तिचे एका सशक्त पटकथेत रूपांतर केलेले. आवर्जून सांगायचे म्हणजे या चित्रपटाचा खलनायक रामा शेट्टी च्या रूपातील सदाशिव अमरापूरकर यांची अप्रतिम भूमिका. अमरापूरकरांनी या पात्रामध्ये जणू प्राण ओतले आहे.

खरं तर सिनेमासाठी गोविंद निहिलांनी यांना खलनायक म्हणून नवा चेहेरा हवा होता. तेंव्हा विजय तेंडुलकरांनी त्यांना सदाशिव अमरापूरकर यांचे नाव सुचवले. तेंडुलकर त्यांना अमरापूरकर भूमिका करत असलेल्या एका मराठी नाटकाला घेऊन गेले. अमरापूरकरांची भूमिका पाहून गोविंदजींनी त्यांची निवड पक्की केली. अमरापूरकरांनी साकारलेल्या या थंड डोक्याच्या, खुनशी खलनायकाने पुढे हिंदी चित्रपट सृष्टीतील खलनायकीचे मापदंडच बदलून टाकले. त्यांना या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. अमरापूरकरांचा हा पहिलाच चित्रपट होता.

अजून जास्त काय सांगु?.

तेंडुलकरांची पटकथा, निहिलांनीचे दिग्दर्शन, ओमपुरी आणि सदाशिव अमरापूरकरांचा अभिनय, स्मिता पाटीलची सहज पण दमदार भूमिका, गुलाबी स्वप्न न दाखवता आयुष्याचे भीषण वास्तव दाखवणारी पटकथा, या एकेका कारणासाठी हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे. पण केवळ या कवितेसाठी देखील हा चित्रपट पाहता येईल.

असा मराठी माणसांच्या मंदियाळीने नटलेला हा चित्रपट आणि कविता तुम्हाला अवश्य आवडेल अशी आशा करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: