आपल्या भारताच्या पुर्वेस ओडिसा नावाचे एक राज्य आहे बऱ्याच जणांनी ओडिसाला भेट दिली असेल. ओडिसा मध्ये पुरि या शहरामध्ये भगवान जगन्नाथाचे सुंदर असे मंदिर आहे. पुरी मध्ये दरवर्षी साधारणतः आषाढ महिन्या मध्ये रथयात्रा निघते. या पुरीशी, भगवान जगन्नाथाशी आणि तेथील राजे पुरुषोत्तम देवांशी संबंधित अशी ही एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे.
आज आपण ज्याला ओडीसा राज्य म्हणून ओळखतो त्या प्रदेशांमध्ये पंधराव्या शतकामध्ये गजपती घराण्याचे राज्य होतं. या घराण्याचे राजे श्री पुरुषोत्तम देव हे पुरी च्या श्री जगन्नाथाचे मोठे भक्त होते.
एकदा ते दक्षिण भारतात तीर्थयात्रेसाठी गेले. तिथे कांचीच्या राजाच्या निमंत्रणावरून पुरुषोत्तम देव हे कांची मध्ये काही दिवस अतिथी म्हणून राहिले. येथेच त्यांची भेट कांची ची राजकुमारी पद्मावती शी झाली. पद्मावती ही खूप सुंदर, सुशील आणि बुद्धिमान होती. पुरुषोत्तम देव आणि पद्मावती हे दोघेही एकमेकांना आवडले. आणि हे जाणून कांचीच्या राजाने पुरुषोत्तम देवांसमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला. पुरुषोत्तम देवांनीही हा प्रस्ताव सहर्ष स्वीकारला.
काही दिवस कांचीमधला पाहुणचार स्वीकारून ते आपल्या राज्यामध्ये परत आले. थोड्याच दिवसात श्री जगन्नाथाची रथयात्रा सुरू होणार होती. पुरुषोत्तम देव हे भगवान जगन्नाथाचे मोठे भक्त होते. राजांनी या उत्सवाची तयारी मोठ्या जोरात सुरू केली.
श्री जगन्नाथाच्या रथयात्रे मध्ये भगवान जगन्नाथ म्हणजेच श्रीकृष्ण, त्यांची बहीण सुभद्रा व बंधु भगवान बलभद्र म्हणजेच बलराम आणि सुदर्शन म्हणजेच श्री विष्णूचे चक्र अशा सर्वांची खूप भव्यदिव्य अशी यात्रा निघते. यातील प्रत्येक देवाचा एक स्वतंत्र मोठा लाकडी रथ बनवला जातो. हे रथ साधारण पन्नास एक फूट उंचीचे असतात आणि हे रथ दरवर्षी नव्याने बनवले जातात. या रथामध्ये या देवतांच्या लाकडी मूर्त्यांना ठेवले जाते. या मूर्त्यांना विग्रह असे म्हणतात. या देवतांना रथसहित अगणित भक्तगण आपल्या हातांनी मोठ्याओढतात.ही प्रथा ओडीसा राज्यांमध्ये फार प्राचीन काळापासून सुरू आहे. आषाढाच्या महिन्यात साधारणतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ही रथयात्रा असते. अनेकांनी ही रथयात्रा प्रत्यक्ष्यात अथवा टीव्हीवर बघितली असेलच.
या रथयात्रेचे निमंत्रण अर्थातच कांचीच्या राजांनाही देण्यात आले. परंतु कांची चे राजे कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी हा रथयात्रेचा सोहळा पाहण्यासाठी आपल्या मंत्र्याला पाठवले. रथयात्रा बघण्या बरोबरच हा मंत्री अधिकृत रित्या विवाहाचा प्रस्ताव पुरीच्या राजघराण्या समोर ठेवणार होता. या मंत्र्यांचे पुरी मध्ये स्वागत करण्यात आले आणि त्याच्या पाहुणचाराची तसेच रथयात्रेचा भव्य सोहळा दाखवण्याची ही व्यवस्था करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी रथयात्रेचा तो भव्य सोहळा सुरू झाला. घंटानाद शंख, टाळ, ढोल या सर्वांच्या नादाने आसमंत निनादून गेले. भक्तमंडळी रथ यात्रेमध्ये भक्तीरंगामध्ये बेभान होऊन भजन आणि नर्तन करू लागले. कांचीच्या मंत्र्याने अशा प्रकारचा अभूतपूर्व भव्यदिव्य सोहळा यापूर्वी बघितलेला नव्हता. सुंदर अशा सजवलेल्या भव्य रथांमध्ये अतिशय सुंदर रित्या कोरलेल्या आणि रंगवलेल्या भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मनमोहक मुर्त्या ठेवण्यात आलेल्या होत्या.
या रथाच्या समोर स्वतः सम्राट पुरुषोत्तम देव हे हातात झाडू घेऊन रस्त्याची सफाई करत होते. ओडिसा राज्यात ही प्रथाच होती म्हणाना. हे राज्य देवाचे आणि देवा मुळेच आपल्याला प्राप्त झाले अशी कृतज्ञता बाळगून त्या काळचे राजे जगन्नाथाचा रथ यात्रेमध्ये नम्रपणे सामील होत. या देवाच्या चरणी सेवा रुजू व्हावी म्हणून सोन्याची मूठ असलेल्या झाडूने राजा स्वतः रथाचा मार्ग झाडायचा आणि त्यानंतर स्वतःच्या हाताने चंदनाच्या पाण्याने रथाच्या मार्गावर सडा शिंपडत असे.
परंतु कांचीच्या मंत्र्याला ही परंपरा आणि त्यामागचे संदर्भ माहीत नव्हते. त्यामुळे हे दृश्य पाहून तो एकदम अवाक राहिला. त्या काळामध्ये झाडू मारणे हे खूप कमी दर्जाचे काम समजले जायचे. समाजातला अत्यंत खालचा मानला जाणारा वर्ग हे काम करायचा. आणि इथे तर राजाने केवळ हातात झाडूच धरला नव्हता तर तो स्वतः रस्ताही साफ करत होता.
आता मात्र हद्द झाली होती. मंत्र्याला हे सगळे काही बघणे सहन झाले नाही. कुणालाही न कळवता गुपचूप पणे तो त्याच दिवशी कांची ला परतण्यासाठी निघाला. कांची ला पोहोचल्यानंतर त्याने सर्व दरबारा समोर त्याने घडलेला वृत्तांत कथन केला. त्याने रथयात्रेत दरम्यान जे जे काही पहिले ते साद्यंत कांचीच्या राजा दरबारा समोर उघडपणे सांगितले.
कांची चा राजा ही या सर्व वर्णनामुळे क्रोधीत झाला. आपल्याला फसवण्यात आले आहे असे समजून तो अत्यंत क्रोधीत झाला. बरे झाले आपण मंत्र्याला जगन्नाथ पुरी ला पाठवले अन्यथा माझ्या मुलीचा आणि या राज्याच्या राजकुमारीचा विवाह एखाद्या सफाई कामगाराची झाला असता असे त्याला वाटले. यानंतर त्याने ठरवले की राजकुमारी पद्मावती साठी स्वयंवर रचावयाचे आणि देशोदेशींच्या राजांना या स्वयंवरासाठी निमंत्रण पाठवायचे पुरुषोत्तम देवांना मात्र याचे निमंत्रण पाठवायचे नाही असे ठरले.
ठरल्याप्रमाणे स्वयंवराची तयारी सुरू झाली. इकडे पुरुषोत्तम देवांना देखील कांचीच्या मंत्र्याचे असे गुपचूप गायब होणे खटकले. त्यांनी आपले हेर या कामी लावले आणि याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. हेरांनी कांची दरबारात घडलेली इत्यंभूत बातमी पुरुषोत्तम देवांसमोर सादर केली.
आता क्रोधित होण्याची पाळी हे पुरुषोत्तम देवांची होती. “मी कांचीच्या राजा विरुद्ध युद्धाची घोषणा करतो” असे मोठ्या रागाने त्यांनी दरबारात जाहीर केले. “कांची चा राजा आणि त्याची मुलगी या दोघांनाही मी बंदी बनवेन. चला युद्धाच्या तयारीला लागा” अशी आज्ञा त्यांनी केली.
घोषणे प्रमाणे अर्थातच काही दिवसांनी पुरुषोत्तम देवांनी कांची वर आक्रमण केले. दोन्ही राज्यांमध्ये घनघोर युद्ध झाले. परंतु या युद्धामध्ये पुरुषोत्तम देवांची दारुण पराभव झाला. पुरुषोत्तम देवांना अपमानकारक रित्या माघार घ्यावी लागली. या सर्व घडामोडींमुळे राजकुमारी पद्मावती देखील चिंतेत होती. मनातून तिला वाटत होते की आपला विवाह हा पुरुषोत्तम देवांशीच व्हावा.
दारुण पराभवाचे दुःख सोबत घेऊन पुरुषोत्तम देव हे भगवान जगन्नाथ समोर जाऊन उभे राहिले. त्यांनी देवासमोर झगडा मांडला. ते म्हणाले “हे देवा, मी तुझ्याच सेवेसाठी हाती झाडू घेतला आणि तू माझाच असा पाणउतारा घडवून आणला. तू तुझ्या भक्ताची लाज राखू शकला नाही. मी तुझी तन, मन, धनाने सेवा केली आणि त्याचे हेच का फळ मला प्राप्त झाले? भगवंता हा माझा अपमान नाही तर हा तुझ्या भक्ताचा अपमान आहे हे लक्षात ठेवा”. शांत मनाने, डोळे मिटून ही प्रार्थना देवासमोर करताना त्यांना अंतर्मनात देवाची साद ऐकू आली. “ऊठ पुरुषोत्तमा, पुन्हा एकदा युद्धाची तयारी कर. यावेळी मी स्वतः तुझ्यासोबत असेल”.
पुरुषोत्तम देवाने डोळे उघडून बघितले तर आजूबाजूला कुणीच नव्हते समोर फक्त भगवान जगन्नाथ परंतु देवाचा हा असा कौल मिळाल्यामुळे त्यांनी पुन्हा सर्व सामर्थ्यानिशी युद्धाची तयारी केली.
पुरुषोत्तम देवाने युद्धाची सज्जता झाल्यावर पुन्हा एकदा सर्व सैन्यानिशी कांची कडे कूच केले. इकडे भगवान जगन्नाथ आणि भगवान बलभद्र यांनी सैनिकाचा वेश धारण करून कांची कडे प्रयाण केले. बरेच अंतर पार केल्यानंतर त्यांना तहान लागली. त्यांनी रस्त्याच्या कडेला ताक विकणाऱ्या एका स्त्रीकडे पिण्यासाठी ताकाची मागणी केली. तिने दोन करे भरून ताक भगवान जगन्नाथ व भगवान बलभद्रांना दिले. जेव्हा तिने पैशाची मागणी केली तेव्हा सैनिकी वेषातील भगवान जगन्नाथाने आपल्या हातातील मुद्रा तिला दिली. तिला सांगितले की उद्या या रस्त्यावरून आमचा राजा कांची कडे प्रयाण करेल तेव्हा त्याला ही मुद्रा दाखव आणि या ताकाचे पैसे त्याच्याकडून घे. असे म्हणून दोघे तिथून निघाले.
दुसर्या दिवशी राजा त्या वाटेवरून जात असताना ताक विकणाऱ्या म्हातारीने राजासमोर झुकून प्रणाम केला. राजांना आदल्या दिवशी घडलेली सारी हकीकत सांगितली. त्याचबरोबर त्या सैनिकाने दिलेली ती मुद्रा हि तिने पुरुषोत्तम देवांना दाखवली. ती मुद्रा बघतच पुरुषोत्तम देवांना खूप हर्ष झाला त्यांनी भगवान जगन्नाथाची ती मुद्रा ओळखली. आता त्यांना युद्धासाठी खूप हुरूप आला.
कांची ला पोहोचल्यानंतर त्यांनी घनघोर युद्ध केले. आणि कांची चा राजा आणि त्यांची कन्या या दोघांनाही बंदी म्हणून त्याने पुरीस आणले.
राज दरबारात सगळ्यांसमोर पुरुषोत्तम देव म्हणाले “तू तुझ्या मुलीचा विवाह दुसरीकडे करणार होतास. मी देवासमोर झाडू मारत होतो यामुळेच तू असे केलेस ना. तर मग तुझ्या डोळ्यात देखतच तुझ्या या मुलीचा विवाह मी खरोखरच्या एखाद्या सफाई कामगाराशी लावतो की नाही बघ.”
आणि पुरुषोत्तम देवांनी आपल्या मंत्र्याला आदेश दिला की एखादा चांगला झाडू मारणारा शोध आणि त्याचा विवाह पद्मावती शी लावून दे. तोपर्यंत पद्मावती चा तुझ्या घरी सांभाळ कर. हे ऐकल्यावर मात्र कांचीच्या राजाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पुरुषोत्तम देवांच्या या हुशार मंत्र्याला पद्मावती ची खूप दया आली. तिचा काहीही दोष नसताना तिला ही शिक्षा मिळते आहे याचे त्याला फार वाईट वाटले. परंतु पुरुषोत्तम देव हे फार कठोर आहेत आणि त्यांना कितीही सल्ला दिला तरी आपला निर्णय ते बदलणार नाहीत याची जाणीव त्या मंत्र्याला होती. पद्मावतीही या साऱ्यांमुळे फार दुखी झाली होती. परंतु तिला मंत्र्याने धीर दिला. असेच दिवसा मागून दिवस गेले. अधून मधून पुरुषोत्तम देव त्या मंत्र्याजवळ चौकशी करायचे. मंत्री देखील त्यांना उत्तर द्यायचा की अजून कोणी अनुरूप सफाई कामगार वर पद्मावती साठी त्याला सापडला नाही.
असेच महिन्यांमध्ये महिने निघून गेले आणि पुन्हा रथयात्रेचा समारोह सुरू झाला. पद्मावती आणि तिचा बंदिवान पिता या दोघांनाही बेड्या घालून रथयात्रेचा समारोह पाहण्यासाठी तेथे आणण्यात आले. रथयात्रा सुरू झाली आणि पुरुषोत्तम देवांनी प्रथम समोर झाडू मारायला सुरुवात केली. तेव्हा त्याला दिसले की पद्मावती ला घेऊन तोच मंत्री लगबगीने त्याच्या दिशेने येतो आहे. तो राजास म्हणाला “महाराजांचा जयजयकार असो. महाराज पद्मावती साठी मला अतिशय अनुरूप असा झाडूवाला वर सापडला आहे. आणि त्याच्याशी आपण पद्मावती चे लग्न आत्ता या इथेच लावून देऊया. असे म्हटल्यानंतर पुरुषोत्तम देव त्यास म्हणाले “ही रथयात्रा संपू दे. माझीही ही सेवा पूर्ण होऊ दे. पद्मावती चा वर पाहण्याची ही योग्य वेळ नाही.” आणि त्याने पुन्हा जगन्नाथाच्या रथा समोरील रस्ता झाडावयास सुरुवात केली.
परंतु तो मंत्री खूप बुद्धिमान होता. त्याने लोकांना उद्देशून मोठ्या आवाजात घोषणा केली की “नगर जन हो, मला महाराज पुरुषोत्तम देवांनी या सुंदर राजकुमारी साठी अनुरूप असा झाडू मारणारा वर शोधावयास सांगितले होते. आणि मी आनंदाने सांगू इच्छितो की असा सर्वात अनुरूप आणि सर्वात योग्य वर मला राजकुमारी साठी सापडला आहे. आज, आत्ता, इथे, या घडीला झाडू मारणारा सर्वात अनुरूप असा वर जर कोणी असेल तर ते आपले महाराज पुरुषोत्तम देव हे होय. त्यामुळे आपण त्यांना विनंती करू या की अशा या सर्वगुणसंपन्न राजकुमारीशी त्यांनीच विवाह करावा.
महाराज पुरुषोत्तम देव आणि पद्मावती दोघांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कांचीच्या महाराजांना ही त्यांची चूक उमजली होती. मंत्र्याने आपल्या बुद्धिमत्तेने पुरुषोत्तम देवांना चकित केले. पुरुषोत्तम देवांनी ही कांचीच्या महाराजांना उदार मनाने माफ केले. आणि भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि सुभद्रा या आपल्या आराध्य देवतांच्या उपस्थिती मध्ये त्यांनी पद्मावती शी विवाह केला.
अशी ही साठा उत्तराची कहाणी पच उत्तरी सुफल संपूर्ण.
Namskar sir ,
Thank you for the awesome story, amhala ya nimmitani odisa rajyavishayi tithlya culture vishayi mahiti milali, amhala tumhi lihleli goshta avadli👍
धन्यवाद.