मित्रांनो आपण ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही म्हण ऐकली असेल पण सव्वा लाखाच्या भुंग्याची हकीकत तुम्हाला माहीत नसेल. ही भुंग्याची गोष्ट संबंधित आहे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत खांडेरायशी, जेजूरी गडाशी.
महाराष्ट्राच्या इतिहासात जेजुरी या तीर्थस्थळ याला खूप महत्त्व आहे. आपल्यापैकी अनेक जण लग्न झाल्यानंतर जेजुरीच्या खंडेराया च्या दर्शनासाठी गेले असाल. जेजुरीला आपल्या नव्या नवरीला घेऊन गड चढावा लागतो. पूर्ण गड चढता नाही आला तर मान म्हणून जेजुरी गडाच्या पाच पायऱ्या तरी (पत्नीला उचलून घेऊन) नव्या नवरदेवाला चढावे लागते.
इथे चैत्र, पौष आणि माघ महिन्यातील जत्रेवेळी होणारा मोठा उत्सव आणि त्यायोगे होणारी भंडाऱ्याची उधळण हा देखील एक बघण्यासारखा सोहळा असतो. (जेजूरीबद्दल अधिक माहिती साठी इथे क्लिक करा)
जेजूरी बद्दल एवढी माहिती महाराष्ट्रातील सर्वांना असते. या जेजुरी गडाची अनेक ऐतिहासिक घडामोडी जोडलेले आहे.. जेजुरी परिसरातील ऐतिहासिक घटना प्रसंगावर अनेक पौराणिक ऐतिहासिक आख्यायिका उपलब्ध आहेत.
याच जेजुरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी राजे यांची भेट झालेली आहे असा देखील इतिहास आहे. शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यासाठी खंडोबास नवस केला होता. तो नवस फेडण्यासाठी सोन्याची मूर्ती त्यांनी मंदिराला अर्पण केली. याचा वेळी आपल्या तीर्थरुपांना भेटण्यासाठी या जेजुरी गडावर आले होते. असे वर्णन चिटणीस बखरीत आढळते.
या जेजुरीच्या खंडेरायाच्या प्रतापाची साक्ष देणारी एक मोठी हकीकत इतिहासात घडलेली आहे. या जेजूरी गडावर त्याकाळच्या जगातील सर्वात सामर्थ्यशाली बादशहाला, औरंगजेबला नतमस्तक व्हावे लागले होते.
हिंदुस्तानचा हा बादशहा जेव्हा शिवछत्रपतींचे स्वराज्य बुडविण्याच्या मिषाने महाराष्ट्रात आक्रमण करण्यासाठी आला. त्याने ठिकठिकाणी छावण्या टाकून त्या त्या भागावर कब्जा करणे चालवले. तेव्हा जेजुरी लोणंद परिसरामध्ये शिरवळ, धावडवाडी या ठिकाणी देखील औरंगजेबाच्या सैन्याचे तळ होता. या ठिकाणहूनच त्याचे सैन्य आजूबाजूच्या परिसरातील अनेक ठिकाणी स्वाऱ्या करण्यास जात. आजही या परिसरात मुस्लीम लोकांची संख्या जास्त आढळते.
औरंगजेबाने अनेक मंदिरांवर हल्ले केले. त्याच्या दुर्दैवाने त्याने जेजूरी गडावर देखील हल्ला केला. आतल्या शिबंदीने गडाची सर्व दारे बंद केली. नेहमीप्रमाणे औरंगजेबाने या किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावण्याची आज्ञा दिली. बादशहाची आज्ञा म्हणजे साक्षात दैवी आदेश. हुकुमाची अंमलबजावणी सुरू झाली. सुरुंग लावण्यासाठी तटबंदीला छिद्रे पाडण्यात आले. परंतु ना गडाला सुरुंग लावून उडवता आले न जेजुरी गड ताब्यात आला. असे कसे घडले. कारण एक चमत्कार घडला.
गडाला सुरंग लावण्यासाठी जेंव्हा तटबंदीला छिद्रे पाडण्यात आले तेव्हा त्या छिद्रातून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी औरंगजेबाच्या सैन्यावर हल्ला केला. तेव्हा औरंगजेबाचे सैन्य इकडे तिकडे पळून गेले. औरंगजेबास मल्हारी मार्तंड यांचा प्रताप कळून चुकला. औरंगजेबाने कान पकडून खंडोबाची माफी मागितली आणि नवस केला की, “हे मल्हारी मार्तंडा, या भुंग्याच्या संकटातून सोडवा, तुम्हाला मी सव्वा लाख रुपायांचा सोन्याचा भुंगा अर्पण करीन.” आणि अशी शरणागती पत्करल्यानंतर भुंग्याचा उपद्रव थांबला. अशी कथा आहे.
पुढे औरंगजेबाने हात रूमालाने बांधून आपला नवस पुरा केला. आणि मल्हारी देवाला “मललुखान” असे नाव दिले. यामुळे आजही या भागातील मुस्लीम लोक मल्हारीला “मललुखान” या नावानेच पुकारतात.
आज हा भुंगा पाहायला मिळत नाही कारण पुढे ई. स. 1850 मध्ये हा भुंगा चोरीला गेला अशी माहिती आपल्याला ब्रिटिश गॅझेटियर मध्ये मिळते.
पुढेही, पेशवाई मध्ये जेंव्हा रघोबादादांनी नारायण रावांचा खून केला. तेंव्हा नारायण रावाची पत्नी गोदावरीबई या गर्भार होत्या. तेंव्हा त्यांना पुत्र होईपर्यंत पेशवाईतील कारभार बारभाईंनी सांभाळला.
या गोदावरीबाईंना पुत्र व्हावा म्हणून नाना फडणवीसांनी याच जेजुरीच्या खंडेरायाला नवस केला होता. “हे खंडोबा, गंगाबाईस पुत्ररत्न होऊ दे. तिला पुत्र झाल्यास तुझ्या मंदिरास मी एक लाख रूपये अर्पण करीन.” पुढे जेव्हा गंगाबाईना पुत्ररत्न (पेशवा सवाई माधवराव)झाले. तेव्हा नानांनी आपला नवस पूर्ण केला.
या बाबींवरून आपल्याला जेजुरीचे दैवी महात्म्य तर कळतेच पण त्या बरोबरच ऐतिहासिक महत्व देखील लक्षात येते. अनेक लोकगीतांमधून ही कथा/लोककथा आजही आपल्याला ऐकायला मिळते.
यासारख्या अनेक कथा जेजुरी गडाशी निगडित आहे. त्या नंतर पुढील काळात इथे टाकू.
तोपर्यंत….. येळकोट.. येळकोट… जय मल्हार!