अंबड शहरांमध्ये 2011 सालापासून काही होतकरू तरुणांचा एक चांगला गट दरवर्षी यशवंत व्याख्यानमालेचे आयोजन करतो. या वर्षी 2020 साली या व्याख्यान माले ने आपले दहावी पुष्प गुंफले. मराठवाड्यामधील ग्रामीण भागात आणि अंबड सारख्या शहरात तरुणांनी दहा वर्ष एक उत्कृष्ट व्याख्यानमाला सुरू करणे आणि ती दहा वर्षे यशस्वीपणे राबवणे हे मला वाटतं त्यांच्या कामाची आणि यशाची पावती आहे. पद्मश्री रवींद्र कोल्हे, सुपर थर्टी चे जनक प्रा. आनंद कुमार, हनुमंतराव गायकवाड, साहित्यिक डॉ. रा. र. बोराडे आणि डॉ. उत्तम कांबळे, विधिज्ञ असीम सरोदे, मुक्ता दाभोळकर अशांसारख्या दिग्गज वक्त्यांना बोलावून त्यांनी अंबड सारख्या मराठवाड्यातल्या आमचा भागांमध्ये हा ज्ञानाचा वटवृक्ष रुजवला. अशा या व्याख्यानमाले मध्ये 2012 साली मी युपीएससी स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मला व्याख्यानाचे पुष्प गुंफण्याची संधी मिळाली. यशवंत व्याख्यानमाले ने दशकपूर्ती चा मुहूर्त साधून व्याख्यान माले मध्ये ज्यांचे ज्यांचे व्याख्यान झाले त्यांच्या व्याख्यानांची एक स्मरणिका काढली. माझे व्याख्यान ध्वनिमुद्रित केलेले नसल्यामुळे मला माझे व्याख्यान पुन्हा लिहून काढण्याचे विनंती करण्यात आली. व्याख्यानमालेत व्याख्यान देऊन दहा वर्ष झाल्यानंतर मला ही विनंती ती करण्यात आली होती. त्यामुळे मी त्या विषयावर जे काही बोललो होतो ते जसे आठवले तसे थोडक्यात लिहून काढले आहे. हा लेख त्या स्मरणिकेत प्रकाशित करण्यात आलेला आहे. तोच लेख मी आज इथे तुमच्यासोबत शेअर करतो आहे.
प्रस्तावना
सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व जेष्ठ मंडळी आणि माझ्या बंधू, भगिनींनो. आज मला या व्याख्यानमालेत मी कसा घडलो या विषयावर बोलायचे आहे. याचा विचार करताना मी जेव्हा सिंहावलोकन करतो तेंव्हा एक गोष्ट जाणवते की मी कुठल्याही खेडेगावातील सर्वसामान्य मुळासारखाच घडलो. अगदी ठळक सांगायचं म्हणजे छोटं गाव, जिल्हा परिषदेची शाळा, दहावीपर्यंत गावात शिक्षण. दहावीनंतर एस टी ने प्रवास करून तर काही दिवस शहरात राहून केलेले शिक्षण. शहरात आल्यानंतर गावाच्या मुलाची बावरलेली अवस्था, मनाची घालमेल, शहरी भागाशी जुळवून घेतांना होणारी दमछाक, आर्थिक अडचणी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मार्गदर्शनाचा दुष्काळ. या सर्व चक्रातून गावातला जवळपास प्रत्येक तरुण कधी ना कधी जातो. मी देखील त्याला अपवाद नव्हतो. मग आज मी जे मिळवला आहे किंवा ज्याला यश म्हणून संबोधता ते मला कसे मिळाले? काहींना वाटेल की हा केवळ योगायोग आहे किंवा ज्याला आपण दैव किंवा नशीब म्हणतो त्याचा यात खूप मोठा वाटा आहे. परंतु त्यासोबत जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा अशा अनेक घटना व्यक्ती प्रसंग आणि निर्णय मला दिसतात की ज्यांचा माझ्या घडण्यात खूप मोठे योगदान राहिले आहे. मी कसा घडलो हे जर मला सांगायचं असेल तर या घटना व्यक्ती आणि प्रसंगाच्या सूत्रातून आज मला ती गोष्ट गुंफावी लागेल.
प्राथमिक शिक्षण
कुठल्याही खेडेगावातील मुलासारखे माझे शिक्षण देखील गावच्या प्राथमिक शाळा चितेपिंपळगाव या शाळेत झाले. पत्र्याच्या दोन खोल्या असलेल्या या शाळेनेच माझे बालपण घडवले. नंतर तिथे पिंपळगावचे स्वामी विवेकानंद विद्यालयात माझे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण झाले. साधारणपणे खेड्यातल्या शाळा असतात तशाच या दोन्ही शाळा होत्या पण मग यात वेगळं काय घडलं? संसाधने इमारती याबाबतीत या शाळा खेड्यातल्या कुत्री कुठल्याही शाळे सारख्याच होत्या परंतु आज माझे असे ठाम मत आहे की शाळेतला विद्यार्थी हा शाळेमुळे घडत नसून त्या शाळेतील शिक्षकांमुळे घडतो. योगायोगाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा आम्हाला प्राथमिक शाळेत जोशीसर विजया मॅडम किर्ती देशपांडे मॅडम यासारखे चांगले शिक्षक लाभले. अभ्यासक्रमातील शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या, त्याही अगदी तळमळीने. आणि या गोष्टींमुळेच आमच्या बालपणातच काही चांगल्या गोष्टी मनात रुजल्या.
माध्यमिक शाळा
चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर गावात स्वामी विवेकानंद विद्यालय नावाने एक चांगली शिक्षण संस्था उपलब्ध होती. गावच्या दूध डेरी च्या इमारतीत भरत असलेली ही शाळा आम्ही पाचवीला गेल्यापासून आमच्या सोबतच बहरत गेली. आठवी ते दहावी या इयत्ता आधीपासूनच या शाळेत होत्या. आम्ही पाचवीला गेल्यावर पाचवीचा वर्ग सुरू झाला आणि जसे जसे आम्ही पुढे शिकत गेलो तसतसे सातवी पर्यंतच्या इयत्ता या शाळेत सुरू झाल्या. तुटपुंजी संसाधने शिक्षकांना अत्यल्प पगार शैक्षणिक साहित्याची वानवा या सर्व अडचणींवर मात करत या शाळेने उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले. याचेही कारण पुन्हा तेच की चांगले विद्यार्थी घडवण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेली शिक्षक मंडळी. गावातल्या शाळेने कधीही पाहू नये ती स्वप्ने या शाळेने पाहिली आणि तशीच स्वप्ने पाहण्याची सवय त्यांच्या विद्यार्थ्यांनाही लावली. अभ्यासक्रमातील शिक्षांतर या शाळेने उत्तम रित्या दिलेच परंतु त्याही व्यतिरिक्त एक चांगला सुजान विद्यार्थी घडवण्यासाठी येथील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. कुठल्याही चांगल्या शहरी शाळेत नसतील असे उपक्रम या शाळेत राबवले जात. वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा व्याख्याने मासिक व्याख्यानमाला भित्तीपत्रके आणि यासारखे अनेक उपक्रम या शाळेत राबवले जात. मला वाटतंय शिक्षणासोबतच काळाचे, समाजाचे, आणि परिस्थितीचे भान आणि जाण या गोष्टींमुळे आमच्यामध्ये निर्माण झाली असे मला वाटते. शहरात एखाद्या स्पर्धेच्या निमित्ताने गेल्यानंतर जेव्हा आमचा सामना शहरी विद्यार्थ्यांशी व्हायचा तेव्हा त्यांच्यातील व आमच्यातील शैक्षणिक व वैचारिक फरक आम्हाला जाणवायचं आणि आम्ही त्यामुळे थोडेसे बुजयचो देखील. परंतु शिक्षकांची अपार जिद्द आणि मेहनत आणि त्यांचे मार्गदर्शन यामुळे नंतर नंतर आम्ही अशा प्रसंगात उभे राहायला शिकलो पुढे जायला शिकलो आणि टक्कर घ्यायलाही शिकलो. मला आठवतं आमच्या शाळेतील तुकाराम गावंडे, बापू काकडे, अर्चना घोडके, एकनाथ गावंडे, जनार्दन गवळी, मी स्वतः आणि यासारखे अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या स्पर्धेत मग ते वकृत्व असो वाद-विवाद असो किंवा खेळ असो प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणात का होईना यशस्वी होऊन यायचे. मातीत घडलेल्या या हिऱ्या-मोत्याचे मोल जाणले ते आमच्या शिक्षकांनीच. यथामति यथाशक्ति त्यांनी आम्हाला भरभरून दिले आणि हीच शिदोरी पुढच्या वाटेवर आम्हाला कामी आली. शाळेवरील यास विश्वासामुळे माझ्या आजोबांनी जवाहर नवोदय विद्यालयात माझी निवड झालेली असताना देखील मला गावच्या शाळेतच ठेवले.
कॉलेज
गावच्या शाळेतून घडून निघाल्यानंतर आणि तिथे पहिल्या क्रमांकाने पास झाल्यानंतर देखील जेव्हा पुढील शिक्षणासाठी शहरात पाऊल ठेवले तेव्हा माझी हि अवस्था गावातल्या कुठल्याही बावरलेल्या मुलासारखी होती. याचा उल्लेख मी आधीच केला आहे. पहिला नंबर येणाऱ्या हुशार मुलाने त्यावेळी विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा हा काळानुरूप योग्य निर्णय होता. परंतु कॉलेजला ऍडमिशन झाल्यानंतर पहिली सहा महिने काहीच समजेना इंग्रजीचा मारा रेटताना आकलनाचे आणि समजून घेण्याचे सर्व प्रयत्न अपुरे पडू लागले. मोठा धनुर्धारी असल्या चा नावलौकिक मागे असतानाही अर्जुनाची अवस्था कुरुक्षेत्रावर झाली तीच अवस्था मी व माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांची शहरी शिक्षणा घेते वेळेस होते. परिस्थीतीशी वातावरणाशी नव्या मित्रांची नव्या शिक्षणपद्धतीत शी जुळवून घेता घेता गावच्या मुलांची चांगलीच दमछाक होते तशी माझीही झाली. अशा वेळी पाठीवर हात ठेवून लढ म्हणा री श्रीकृष्णा सारखी माणसे म्हणजे आमचे शाळेतील शिक्षक तसेच घरची मंडळी एवढीच होती. गावाकडची घरची परिस्थिती आणि शाळेत मिळालेली ज्ञानाची आणि लढण्याची शिदोरी या पाठबळावर आम्ही गावातील मुलांनी या शिक्षणाच्या खडतर वाटेवरून आम्ही पुढे गेलो. आपल्यात शहरात हुशार गणल्या जाणाऱ्या मुला इतकीच बुद्धी ग्रहणक्षमता आणि हुशारी आहे हे जाणवायचं पण आपल्या कमी पडणाऱ्या बाजून कशा सुधारायच्या हे त्यावेळेस कळायचे नाही. मग अशावेळी जो मार्गदर्शन करेल जे काही शक्य होईल त्या सर्व उपायांनी आम्ही गावातील काही मुले पुन्हा प्रयत्नाला लागायचो. पहिला क्रमांक द्यावा किंवा सर्वोच्च असावे या ऐवजी या नव्या प्रवाहात आपल्याला टिकता जरी आले तरी पुरे असे वाटण्या इतपत त्या वेळेसच्या सगळा मामला होता.
वाचन
या धामधुमीच्या काळात सुदैवाने एक गोष्ट अशी होती की जिच्यामुळे माझ्या मनात ऊर्मी जिज्ञासा चिकित्सा आणि लढण्याची जिद्द जागी ठेवली. ती गोष्ट म्हणजे वाचनाची लागलेली सवय. गावामध्ये नसतांना लहानपणी माझी आत्या आमचे वडील आजोबा आणि आई यांनी वाचनाचे सवय आम्हाला लावली. आत्या गोष्टी सांगायची वाचायला प्रवृत्त करायची आजोबा माझ्यासाठी पुस्तके घेऊन यायचे आमचे वडील ते वाचायला लावीत. गावात आणि घरात वर्तमानपत्र येत असे घरातील वडील मंडळींना वर्तमानपत्र वाचताना मी पाहिले होते त्यामुळे कळत नसले तरी वर्तमानपत्र चाळायची तरी सवय आम्हाला त्या काळात लागली. पुढे गावात प्रौढ शिक्षणाचे एक छोटेखानी वाचनालय सुरु झाले. हे वाचनालय आमचे शेजारीच वसंत काका पानसरे चालवत. त्यामुळे तिथे पुस्तके चालण्याचा वाचण्याचा एक नवा छंद जडला. हे पुस्तक घेत असे आणि वाचून परत करत असेल त्यामुळे वसंत काकांनी मला वेळोवेळी अनेक पुस्तके वाचायला संधी दिली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत असताना देखील चौथी ने च्या सुट्ट्यांमध्ये शिक्षकांनी शाळेच्या संचातून काही पुस्तके घरी वाचण्यासाठी दिली. याव्यतिरिक्त वाचनाची आवड निर्माण झाली आहे म्हणून माझे आजोबा वेळोवेळी माझ्यासाठी अधून-मधून पुस्तके घेऊन येत त्याकाळची ही पुस्तके गोष्टींची ऐतिहासिक शिवाजी महाराजांची थोर पुरुषांची क्रांतिकारकांची अशी असत. या पुस्तकांनी किती ज्ञान प्राप्त झाले यापेक्षा या पुस्तकांनी आम्हाला प्रेरणा दिली पुढेही अनेक प्रसंगी परिस्थिती हाताबाहेर असताना ज्या जिद्दीने मी गावातील मुले शिकलो त्या जिद्दीच्या मुळाशी मला वाटते या वाचनातून निर्माण झालेली ही बीच रूपाने वसत होती. माध्यमिक शाळेमध्ये तर वाचनाचे ही सवय हळूहळू वाढतच गेली. कॉलेज करत असताना आणि तंत्र शिक्षण घेत असतानाही या काळातही भरपूर पुस्तके मी वाचली.
वाचनाचा फायदा
मी औरंगाबादेत एन 6 मधील कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी वाचनालयाचे आणि नंतर पवन नगर मधील दुसाने काकांच्या घरपोच वाचनालयाचे सदस्यत्व घेतले होते. पुढे वाचनाची ही सवय एवढी वाढली की आठवड्यातून दोन पुस्तके मी वाचून काढत असे. या वाचनामध्ये कथा कादंबरी कवितासंग्रह चरित्रे इतिहास यासारख्या अनेक विषयांवरच्या पुस्तकांचा समावेश होता. मला आठवते की जेव्हा मी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलो तेव्हा मराठी साहित्य आणि इतिहास हे दोन वैकल्पिक विषय म्हणून मी निवडले. युनिक अकॅडमीच्या प्रवीण चव्हाण सरा जेव्हा या विषयांचे क्लास घेत तेव्हा अफाट वाचन आणि आकलन असलेल्या ह्या शिक्षकांच्या वक्तृत्वाने चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांची दमछाक होत असे. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी याची जाणीव सरांच्या लेक्चर मध्ये बसल्यानंतर होत असे. परंतु मला या वेळी प्रकर्षाने जाणवले की आपल्याला इतर विद्यार्थ्यां सारखे मराठी अवघड वाटत नाही. तसेच इतिहासाचा बराचसा भाग आपल्याला आधीपासूनच माहीत आहे. त्यामुळे याही ठिकाणी मला माझ्या वाचनाचा फायदा झालेला दिसला. आणि गावातल्या मुलांना मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की प्रत्येक संघर्षाच्या काळात आपल्याला सहजगत्या मार्गदर्शन देणारी माणसे लाभणार नाही परंतु आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे पुस्तकरूपाने आपल्याला बरेचसे मार्गदर्शन मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या हुशार विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जरूर अंगी बनवावी असे मला वाटते. माझ्या घडण्यामध्ये असा वाचनाचा आणि पुस्तकांचा ही फार मोठा वाटा आहे
प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबी
यानंतर माझ्यावर प्रभाव टाकणाऱ्या या गोष्टींमध्ये समावेश होतो मोठ्या,यशस्वी, आणि विचारवंत लोकांशी भेटीचा जो योग आला त्यामधून. आमच्या घरी पाहुण्यांची अतिथींचे नेहमी नेहमी वर्दळ असे आजोबांचा संपर्क दांडगा असल्यामुळे आमच्या घरी विविध प्रकारचे विविध भागातील लोक येईल मुक्कामी येत असे. मुलांना विशेष का मला त्यांच्याशी बोलण्याची त्यांच्यासोबत बसण्याचे मुभा असायची. थोड्याशा हुशारीमुळे म्हणा किंवा अनेक पणामुळे मला माझी त्यांच्याशी चांगली ओळख व्हायची. या लोकांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी कानावर पडायचा. मी चौथ्या इयत्तेत असताना आमच्या घरी ईशान्य भारतातल्या तीन चार राज्यातील विद्यार्थी मंडळी मुक्कामी थांबलेली होती. महाविद्यालयात आणि त्यांच्या प्रकल्पासाठी आमच्या गावात थांबली होती. मणिपूर नागालॅंड अशा राज्यातून आलेल्या या मंडळींकडे मी आयुष्यात पहिल्यांदा गिटार बुद्धिबळ आणि चित्रकलेचे सामान बघितले. याच विद्यार्थ्यांसोबत आयुष्यात देवगिरीचा किल्ला अजिंठा आणि वेरूळ लेण्या आणि पैठण च्या आसपासची पर्यटन स्थळे बघितली. या सारख्या अनेक प्रसंगाचा माझ्या बालपणावर अमिट ठसा उमटलेला आहे. त्याचबरोबर मी असून देखील आईच्या विना राहू शकत असल्यामुळे आजोबा मला बऱ्याच ठिकाणी सोबत घेऊन फिरायचे. वडील सुशिक्षित असल्यामुळे त्यांचे काही मित्र अधिकारी होते किंवा आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत होते. वडील जेंव्हा मला शहरात सोबत घेऊन जायचे तेव्हा आवर्जून या लोकांची भेट घडवून आणायचे. मला अजूनही आठवतय माझ्या वडिलांनी 6-7 वर्षाचा असताना मला जिल्हाधिकाऱ्यांची लाल दिव्याची गाडी दाखवली होती आणि मला सांगितले होते की हा बघ कलेक्टर चालला आहे. तो प्रसंग माझ्या मनावर आजही लख्खपणे कोरलेला आहे. लहानवयात मला कलेक्टर वगैरे काही कळत नव्हतं. परंतु मला वाटतं या गोष्टींनी कुठेतरी माझ्या मनात बीजरूपाने स्थान ग्रहण केले होते. व्यायामाची आवड असणारे माझे वडील आणि शिवाजी काका, शेतात कष्ट करणारे, स्वतः मेहनत करणारे आणि माझे लाड करणारे माझे शाम काका आणि संतोष काका, संस्कृत पाठांतर आणि गोष्टी शिकवणारी, लहानपणी माझा अभ्यास घेऊन माला घडवणारी माझी आत्या, माझी आजी, काकू, नातेवाईक आणि गावकरी मंडळी या सर्वांनी कोणत्या न कोणत्या प्रकारे मला घडवण्यामध्ये योगदान दिले आहे.
चित्ते-पिंपळगाव
आमचा गाव आजूबाजूच्या इतर गावांपेक्षा प्रगत होता पुढारलेला होता. गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्व कळत होते. किशोर आणि तरुण मुले संध्याकाळी खेळायची. विशेषतः कबड्डीच्या खेळामध्ये आमच्या गावचे नाव होते. गावातील कीर्तने, प्रवचने, हरिनाम सप्ताह यामुळे गावास एक ग्रामीण सांस्कृतिक संचित उपलब्ध होते. थोडे मोठे झाल्यावर पारावर होणाऱ्या चर्चांमधून आम्हाला गावचे शेतीचे प्रश्न, इतर समस्या कानावर पडायच्या. आज या टप्प्यावर पोहोचण्या मध्ये ज्या गोष्टींनी प्रेरित केले त्यामध्ये या गावच्या प्रश्नांची उत्तरे कशी सापडतील याचा विचार देखील कारणीभूत-आहे
मित्रमंडळी
माझ्याकडं नाही मध्ये नंतर महत्त्वाचे योगदान आहे ते माझ्या मित्रांचे. शाळेचे आणि कॉलेजचे मित्र तसे होतकरू होते. इंडो जर्मन टूल रूम ची प्रवेश परीक्षा अशा अखिल भारतीय परीक्षांमध्ये जेव्हा 40 जणांमध्ये माझी निवड झाली तेव्हा मात्र एक नवे विश्व नवे मित्र मंडळ मला लाभले. या मित्र मंडळींमध्ये औद्योगिक वारसा असलेली मोठ्या घरातील मंडळी होती तसेच ग्रामीण भागातून आलेली माझ्यासारखी शेतकऱ्यांची मुले देखील होती. आमचे गट्टी जमली अशाच ग्रामीण भागातून आलेल्या औरंगाबाद परभणी जळगाव सारखा ठिकाणाहून आलेल्या मध्यमवर्गीय किंवा शेतकर्यांच्या मुलांसोबत यात सचिन, सुरेश, कौशिक, सचिन शिंदे , सतीश, मनोज, राहुल मित्रांनी मला वेळोवेळी साथ दिली. स्पर्धा परीक्ष द्यायचा निर्णय माझ्या वडिलांच्या आकस्मित निधनानंतर जेंव्हा डळमळीत झाला तेंव्हा याच मित्रांनी माझ्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यावर दाखवला. तू हे करू शकतोस आणि त्यासाठी लागेल ती मदत आम्ही तुला करू असा भक्कम पाठिंबा देत त्यांनी मला तयारीला उद्युक्त केले. एव्हढेच नव्हे तर खरोखर मदत देखील केली. माझ्या सुरुवारीच्या अपयशाच्या कालखंडामध्ये याच मित्रांनी मला उमेद दिली हूंरूप दिलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला.
पुणे
मार्गी आणि प्रविण चव्हाण सरांचे मार्गदर्शन
माझ्या वैयक्तिक जडणघडणीमध्ये पुणे शहराचा फार मोठा वाटा आहे. या शहरात चार वर्षे नोकरी केली. याच शहरांमध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी देखील केली. पुणे शहराचे वातावरण काही वेगळेच होते. पुणे शहरामध्ये झालेला माझा वैचारिक प्रवास, वैचारिक संघर्ष याचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक आणि वैचारिक केंद्रामध्ये मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. प्रवीण चव्हाण सरांचे मार्गदर्शन सुदैवाने लाभले. सरांनी केवळ आमचा अभ्यासच घेतला असे नाही तर ज्ञानाची किलकिली असणारे कवाडे त्यांनी आमच्यासाठी उघड केली. मी व माझ्या सारख्या अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रवीण चव्हाण सर हे आधारवड होते आणि आहेत. जेव्हा जेव्हा परीक्षेत अपयशी झालो तेव्हा तेव्हा सरांनी मला परत उद्योगाला लावले. सरांनी माझ्या स्वतःवर माझा नसेल एवढा विश्वास माझ्यावरतीदाखवला. प्रोत्साहन आणि धीर दिला की “तू हे करू शकतोस आणि तू हे करायलाच हवे”. कणा मोडलेला असताना पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारे सर होते.बाहेरच्या जगाला आणि व्यवस्थेला उघड्या डोळ्यांनी पहायला शिकवणारे आणि व्यवस्थेमध्ये स्थान निर्माण करायला शिकवणारे आमचे हे गुरू माझ्या वैचारिक जडणघडणीमध्ये सर्वात महत्वाची व्यक्ती होय.
स्पर्धा परीक्षा कशी घडवते?
या सर्वां व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा ही तुम्हाला घडवते. या परीक्षण आम्हाला स्वप्न पाहायचे शिकवले. जिद्द असेल तर लाथ मारीन तिथे पाणी काढता येते याचे अनेक उदाहरणे या परिक्षे ने आमच्यासमोर ठेवली. जिद्द असेल आणि प्रामाणिक प्रयत्न केले तर यश मिळू शकते हे याच परीक्षणे आमच्यासमोर वारंवार सिद्ध केले
बाजारू क्लासेस जाहिरातींचा जमाना यांना बळी न पडता मध्यम मार्ग कसा अवलंबावा याचा अनुभव परिक्षेने दिला. अभ्यास करण्या सोबतच आहार आणि शरीर ही तितकेच लक्ष देण्याची गोष्ट आहे ते याच काळात चांगल्या रितीने समजून आले. मनाचा खंबीरपणा यासारखे परिस्थिती असतानाही खंबीर मनाने पुन्हा कसे उभे रहावे या परीक्षणे शिकवले.
अभ्यास करताना पेन कुठला वापरावा, अभ्यासाला बसण्यासाठी बैठक कशी असावी आणि किती वेळ असावी, व्यायामाला किती वेळ द्यावा अभ्यासकिती वेळ करावा, विश्रांती किती वेळ घ्यावी, छण्ड आणि मनोरंजन याचे महत्व काय याचा परिपाठ या परिक्षेनेने दिला. सूक्ष्म नियोजन काय असते ते या परिक्षेनेच शिकवले.माझ्या यशाची कथाहि एका अर्थाने माझ्या अपयशाची देखील कथा आहे. तीन वेळा वेगवेगळ्या टप्प्यावर मी या परीक्षेत अपयशी झालेलो आहे. त्याहीपेक्षा अपायशातून बाहेर पडून पुन्हा जिद्दीने उभा राहण्याची ती गाथा आहे. अशा प्रसंगी पुरंदरच्या ताहानंतरचे शिवाजी महाराज आठवायचे आणि प्रेरणा मिळायची.
सर्वांचेच योगदान
वरील सर्व बाबी व्यतिरिक्त कुटुंबाचा पाठिंबा, भावकी, गावातील मंडळी यांच्यापासून पासून आमच्या शेता शी संबंध आलेल्या शेतमजूरां पर्यंत, माझ्या जीवन प्रवासात भेटलेल्या अशा अनेकांचा पाठिंबा आणि सदिच्छा माझ्या पाठीशी सदैव होत्या. माझ्या पाठिशी खंबीर उभे राहणारे आणि घराची आघाडी सांभाळणारे माझी आई, धैर्यशील आणि निलेश हे माझे भाऊ, माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहणार माझा भाऊ दीपक, पुण्यातील ढमाळ कुटुंबीय अन उषा मावशी अशा अनंत हातानी मला घडण्यात मदत केली आहे. आपल्यात जर गुण असले तर विश्वास, संधी, पाठिंबा, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हे समाजातूनच मिळत असतात आणि सर्व गोष्टी संधी इतक्याच महत्त्वाच्या असतात.
वेळेची मर्यादा असल्यामुळे विषय थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा माझा प्रवास होता. कदाचित तुमचा प्रवास वेगळा असेल. तरीही माझ्या प्रवासाच्या, घडण्याच्या पाऊल खुणा माझ्या ग्रामीण बहीण भावाना मार्गदर्शक ठरतील, प्रेरणा देतील अशी मला आशा आहे. व्याख्यानमालेने आणि आमचे मित्र खोरे सरांनी मला येथे आमंत्रित केले आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आणि व्याख्यानमालेचे आभार मानतो. यापुढील काळात, अनेकांच्या घडण्यामध्ये या व्याख्यान मालेरूपी ज्ञान यज्ञाचे योगदान असेल अशी मला खात्री आहे. शेवटी आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना अशा सदिच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो.
धन्यवाद
It’s really great.. and heartly congratulations to you.. many times we see the things superficially, now I understand how a personality like you rise. Thank you sir , you are the inspiration to us and student fraternity not for only to being class 1 officer but also for being a good human.
धन्यवाद मॅडम,
लेख संपूर्ण वाचण्याची तसदी घेतल्याबद्दल आणि तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल देखील.